जोकोविच ठरला विंबल्डन चॅम्पियन

जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने आठवेळचा विंबल्डन चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचा ७-६ (७-५),१-६,७-६ (७-४),४-६,१३-१२ (७-३) असा पराभव करत पाचव्यांदा विंबल्डन किताब आपल्या नावे केला. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ५७ मिनिटे रंगला. कधी जोकोविचचे पारडे जड तर दुसर्‍याच क्षणी फेडररच्या बाजूने खेळ झुकत होता. पहिल्या दोन्ही सेटमध्ये दोघांनी बरोबरी केल्याने पाचव्या सेटसाठी दोघांनी कडवी झुंज दिली. पाचवा सेट ८-८ असा बरोबरीत असताना फेडररने जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करून ९-८ अशी आघाडी घेतल्यामुळे फेडररला सामना जिंकण्याची संधी होती. परंतु जोकोविचनेसुद्धा फेडररची सर्व्हिस ब्रेक केल्यामुळे पुन्हा ९-९ असा सामना रंगला. त्यानंतर १२-१२ अशा गेममध्ये सामना पोहचल्यानंतर सुपर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि त्यामध्ये जोकोव्हिचने बाजी मारली. जोकोविच आणि फेडरर यांच्यातील हा ४८ वा सामना होता. जोकोविच फेडररविरुद्ध मागील सहापैकी पाच सामने जिंकला होता आणि हा सामनाही जिंकून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले.
जोकोविच याचे हे एकूण १६ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. फेडररच्या नावावर पुरुष एकेरीची एकूण २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत.