जोकोविचला कोरोनाची लागण

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मदतनिधी स्पर्धा खेळल्यानंतर काही कार्यक्रमांना उपस्थित राहताना पुरेशी खबरदारी न घेतल्याचा फटका त्याला बसल्याचे मानले जाते. आपल्याला झालेल्या कोरोनाविषयी माहिती देताना जोकोविच म्हणाला की, जेव्हा मी बेलग्रेड येथे आलो होतो तेव्हा माझी करोनाची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनंतर मी करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर माझ्या पत्नीलाही करोना झाला आहे, पण मुलं मात्र करोना पॉझिटीव्ह सापडलेली नाहीत. माझ्यामुळे जर कोणाला बाधा झाली असेल तर त्याची मी माफी मागतो.

आता १४ दिवस मला क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. पाच दिवसांनी माझी दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावरील ग्रिगोर दिमित्रोव व ३३व्या स्थानावरील बोर्ना कोरिक यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला होता. ही दुकलीदेखील जोकोविचने आयोजित मदतनिधी स्पर्धेत खेळली होती.