जीवन वाट…!

जीवन वाट…!

– कृतिका दीपक मांद्रेकर, सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा

आजच्या या धावपळीच्या जीवनात सकाळ ते रात्रीपर्यंत सर्व जीव-जंतू, वस्तू, माणसे जळीस्थळी फिरत असतात. कुणीच एका जागेवर टिकून राहत नाही. मग लहानसा साखरेचा तुकडा घेऊन जाणारी ती मुंगी असो किंवा वार्‍याबरोबर फिरणारा तो निर्जीव कागद असो. पण तुम्ही त्या डेरेदार झाडाकडे कधी बारकाईने बघीतलंय का? कधी तुमचं लक्ष गेलंय का त्या झाडाकडेे? असहनीय ऊन असो, मुसळधार पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी असो, ते झाड मात्र आपल्या एकाच जागी स्तब्ध ऊभे असते. तळपत्या उन्हात स्वत: ऊभे राहून इतराना ते सावली देते. त्या मुसळधार पावसाच्या थेंबाच्या स्पर्शाने ते झाड हर्षाने हरखून जाते. थंडित वाहणार्‍या त्या गार वार्‍याबरोबर त्या झाडाचे पाननपान छान गप्पागोष्टी करत आपली एक वेगळीच दुनिया निर्माण करतात. आयुष्यात येणार्‍या परिस्थितीत बदल न घडवता स्वत: त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न ते झाड करते. लहान-लहान गोष्टीत सुख शोधण्याचा प्रयत्न ते सतत करीत असते. मोडेन पण वाकणार नाही अशी वृत्ती त्या झाडात असते. अशा या वृत्तीसाठी सहनशीलता लाखमोलाची असते. स्वत:चे धैर्य खचू न देता ते वृक्ष सैतानी वादळातही आपल्या मुळांच्या आधारे ठामपणे ऊभे राहतात. आपण कुठलीही गोष्ट मनापासून केली तर त्या कामात आपलं यश निश्‍चित असते. आपण फळाची आशा न ठेवता नि:स्वार्थ प्रयत्न करत रहायचं व स्वत:वरचा विश्‍वास कायम ठेवायचा. ‘आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ या बहिणाबाईंच्या ओळींची कास धरण्याचा संदेश हे वृक्ष जणू आपल्याला देतात.

वृक्ष प्रत्येकाला जीवनातील अनेक अनोखे धडे शिकवत असतात. पण आपल्याला कुठे वेळ असतो, हे धडे शिकायला?? प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या मागे खूप वेगाने पळत असतो. आणि या धावपळीत आपण अनेक मौल्यवान गोष्टी मागेच टाकतो. आपलं ते नि:स्वार्थ हास्य कुठं तरी हरवून जाते. आपण खूप स्वार्थी बनून जातो. नकळत आपण आपल्या हृदयाजवळ असलेल्या माणसांचे मन दुखवतो, आणि मग जीवनाचा गोडवा कधी नाहीसा होऊन जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. शेवटी पश्‍चातापाशिवाय दुसरा पर्याय आपल्या हातात उरत नाही. वेळ ही कुणासाठीच थांबत नाही, हे एकदम खरं आहे. पण म्हणून त्या वेळेच्या वेगाबरोबर जीवन वाट चालताना आपण आपल्या अनमोल जीवनावर प्रेम करायला विसरू नये. स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांचा विसर कधीच पडता कामा नये. त्या निळ्या आसमंतात आपली भरारी केवढीही मोठी असो; पण आपले घरटे धरती मातेच्या सहाय्याने उभ्या असलेल्या वृक्षावरच आहे, हे कधीच विसरू नये!!
मित्र हो, अजून वेळ गेलेली नाही. दु:खाचे आभाळ जरी तुमच्यावर कोसळलेय तरी आपण हार ही मानू नका. तुम्ही उठून निर्धाराने परत उभे राहा. जीवनाची नव्याने सुरूवात करा. स्वत:वर विश्‍वास ठेवा, तेव्हाच तुम्ही इतरांवर विश्‍वास ठेवू शकाल. तुमच्या जीवनावर प्रेम करा. स्वत:त लपलेल्या एका नव्या व्यक्तीचा शोध घ्या. स्वत:बरोबर इतरांनाही सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा आदर करा. मग पहा, जशी पावसाच्या आगमनाने चोहीकडे हिरवळ पसरते तद्वत तुमच्या सकारात्मक विचारांमुळे आनंदाची हिरवळ तुमच्या आयुष्यात पसरेल, आणि त्यासाठी तुमचं नि:स्वार्थी गोड हास्य मात्र कायम ठेवा!!!
……….

Leave a Reply