ब्रेकिंग न्यूज़

जीवन रथाचा सारथी बुद्धी, पण आत्मा स्वामी

आपले रामायण, महाभारत, इतर पुराणग्रंथ यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे ग्रंथ सर्वस्पर्शी आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी विविध शास्त्रं – त्यांचे नियम, त्यात केलेलं जीवनविषयक मार्गदर्शन यामुळे हे ग्रंथ चिरंतन संदेश देणारे, सदाहरित म्हणजे एव्हरग्रीन, सर्वकाळ प्रदेश यांना सुसंगत असे बनले आहेत.
निसर्ग, पर्यावरण, ऋतुचक्र यांची वर्णनं येतातच पण खगोलशास्त्र, ज्योतिष, समाजजीवन, आरोग्य, नीतिशास्त्र अशा सर्व अंगांचा परिचय या ग्रंथांतून आपल्याला होतो. म्हणून एखाद्या ज्ञानकोशासारखे संदर्भग्रंथ अशा सर्व अंगांचा परिचय या ग्रंथांतून आपल्याला होतो. म्हणून एखाद्या ज्ञानकोशासारखे संदर्भग्रंथ म्हणूनही हे ग्रंथ आपल्याला उपयोगी पडू शकतात. आपल्या जीवनाचे मित्र, तत्त्वज्ञ नि वाटाडे बनू शकतात.
रामायणातील एक प्रसंग पाहू या. श्रावणाच्या अंध मातापित्यांनी मरताना दिलेला शाप दशरथ राजाच्या मनात घर करून बसला होता. राज्यात सारी व्यवस्था ठीक असूनही नि कौटुंबिक पातळीवरही सारं आनंदी असूनही दशरथ राजा मात्र खिन्न, उदास असायचा. त्याची ही विमनस्क अवस्था सर्वांच्या लक्षात येण्यासारखी होती. रामाचं वय नि जीवनानुभव काही फार मोठा नव्हता. अवघा वीसपंचवीस वर्षांचा असेल तो. आपल्यावर अत्यंत प्रेम करणार्‍या पिताश्रींची ती अवस्था पाहून तो एक दिवस विचारतो-
शारीरो मानसो वाऽपि कच्चित् एनं न बाधते |
संतापो वाऽभितापो वा, दुर्लभं हि सदा सुखम् ॥
रामायणातील या श्‍लोकात जो प्रश्‍न विचारला गेलाय त्याला ‘कच्चित’ प्रश्‍न असं म्हणतात. ‘(र्‍हेटॉरिकल्) हे प्रश्‍न असे असतात की त्या प्रश्‍नातच उत्तर अपेक्षित असतं. इथं राम दशरथ राजाला विचारतोय -‘आपणास काही शारीरिक ताप वा मानसिक संताप (अभिताप) वगैरे तर त्रास देत नाही ना? कारण सतत आरोग्य व सुख दुर्लभच असतं’.
रामाला विचारायचंय आपल्याला कोणतीतरी शारीरिक व्याधी किंवा मनातील चिंता (समस्या) त्रास देत असली पाहिजे. रामाला स्वतःला तर त्यावेळेपर्यंत अशा दुःखचिंतेचा स्वानुभव नव्हता. मग त्याला एवढं मानसशास्त्राचं, शरीरशास्त्राचं किंवा आरोग्यविषयक ज्ञान कुठून मिळालं? अर्थातच गुरूदेव वसिष्ठांच्या आश्रमात शिक्षण घेताना वाचन-मनन-चिंतन-चर्चा-वादविवाद यातूनच जीवनाबद्दल आत्मविश्‍वासानं नि अधिकारवाणीनं विचारलेल्या या प्रश्‍नाला दशरथानं जरी हसत हसत ‘तसं काही नाही रामा’ असं उत्तर दिलं असलं तरी ज्यांना पार्श्‍वभूमी माहीत होती त्यांना या प्रश्‍नाचं गांभीर्य कळलं असतं. त्यावेळेपर्यंत राजानं सुमंत, गुरू वसिष्ठ अशा जाणत्या विश्‍वासू मंडळींकडेच श्रावणवध – त्याच्या मातापित्यांचा मृत्यू नि त्यांनी तळतळाटानं दिलेला शाप याविषयी चर्चा केली होती. कौसल्यादी राण्यांनादेखील या घटनेची कल्पना नव्हती. दशरथ राजा निश्चितच मनात अस्वस्थ होता, रामाचा वियोग होणार – तो क्षण जवळजवळ येतोय या कल्पनेनं त्याचं काळीज पोखरून निघत होतं. रात्रंदिवस झोप नाही, कशातच रस नाही, राज्यकारभारातही लक्ष नाही अशी अवस्था दशरथ राजाची झाली होती. ही गोष्ट संवेदनशील नि पित्यावर नितांत प्रेम असलेल्या रामाच्या लक्षात आली नि थेट प्रश्‍न न विचारता त्यानं अप्रत्यक्ष कच्चित्‌प्रश्‍न विचारला. त्याबरोबर जीवनविषयक एक सिद्धांतही सांगितला की सतत आरोग्य, समाधान, सुख, मनःशांती लाभणं दुर्लभच असतं.
अशाच प्रकारचे प्रश्‍न ‘गरुडपुराणा’त विचारले आहेत. गरुडपुराण म्हटलं की आपल्याला मृत्यू, मृत्यू झालेल्या जीवाची पुढची गती (पुढचा प्रवास), त्यापासून इतरांनी (जिवंत असलेल्यांनी) घ्यावयाचा बोध या गोष्टींचं स्मरण होतं. अनेक ठिकाणी पुराणिकांना (पुरोहितांना) बोलवून गरूड पुराणाचं यथासांग वाचन-श्रवण केलं जातं. दुर्दैवानं बोध मात्र विशेष करून घेतला जात नाही. ते असो. कोणते प्रश्‍न विचारलेयत?
कस्य दोषः कुले नास्ति, व्याधिना को न पीडितः |
केन न व्यसनं प्राप्तः, श्रियः कस्य निरन्तरा ॥
हे प्रश्‍न सर्वांना – विशेषतः ज्या घरात मृत्यू घडलेला आहे त्या परिवारातील मंडळींना – उद्देशून आहेत. कोणत्या कुलात दोष नसतो? असा कोण आहे ज्याला रोगव्याधीसारख्या पीडा त्रास देत नाहीत? ज्याच्यावर संकटं येत नाहीत असा कोण आहे? अन् कोणाची संपत्ती सदैव टिकते? – खरं तर या चार प्रश्‍नात आपलं सारं जीवन येऊन जातं.
* कोणत्या कुलात दोष नसतो?- धीमताम् म्हणजे ज्ञानी व्यक्तींचं, योगिनाम् म्हणजे योगी मंडळींचं, शुचीनाम् म्हणजे पवित्र वर्तन असलेल्या, पवित्र कर्म करणार्‍या व्यक्तींचं, श्रीमताम् म्हणजे धनधान्यसंपन्न श्रीमंत मंडळींचं कुटुंब अशा प्रकारच्या परिवारात पुढचा जन्म येण्याची शक्यता असते. अर्थात् त्यानुसार या जन्मात, निदान जीवनाच्या अंतिम भागात आपली जीवनचर्या, राहणी-करणी असावी लागते. इतकं असूनही प्रत्येक कुटुंबात कुठला ना कुठला तरी दोष, कुठलं ना कुठलं वैगुण्य किंवा उणीव (कमतरता) असतेच. हे जीवनातील महासत्य आहे.
* व्याधिग्रस्त कोण नसतो? – म्हणजे सर्व असतात. गर्भाशयात जीव आल्यापासून, त्याचा जन्म, सारं जीवन संपेपर्यंत कोणती ना कोणती व्याधी प्रकट किंवा गुप्त रूपात असतेच. आजचे अनेक असाध्य रोग जेव्हा लक्षात येतात तेव्हा उशीर झालेला असतो. कारण त्या व्याधी आपल्या देहात खूप दिवस घर करून असतात.
* केन न व्यसनं प्राप्तः? – व्यसन या शब्दाचे दोन अर्थ- संस्कृतमध्ये मुख्य अर्थ संकट नि व्यसन म्हणजे एखादी सवय, चटक. चांगल्या गोष्टींचंही (उदा. वाचन, निसर्गभ्रमण, बागकाम इ.) व्यसन असू शकतं. ज्याच्याशिवाय आपण आरामात, स्वस्थ राहू शकत नाही, बेचैन होऊन जातो ते व्यसन. दारू, तंबाखू, जुगार ही व्यसनं तर माहीत असतातच. प्रत्येकाला कसली ना कसली तरी चटक, ‘लत’ असतेच असते. पण या प्रश्‍नाचा मुख्य रोख संकटांवर आहे. अगदी मोठी उदाहरणं द्यायची झाली तर रामसीतेचा, पांडवांचा वनवास, द्रौपदीची विटंबना ही काय संकटं नव्हेत? साधुसंतांना तर समाजाकडून किती छळ, त्रास, बहिष्कार सारं सोसावं लागलं ना? मग सामान्य माणसाची काय कथा? म्हणून संकटं ही जीवनात असणारच. आज नसली तरी भविष्यात येणारच.
* श्रिया कस्य निरन्तरा – कुणाची संपत्ती, सत्ता, वैभव, सौंदर्य निरंतर, अखंड टिकतं. ‘सुख है एक छाव ढलती, आती है जाती है, दुःख तो अपना साथी है’, ही वास्तवता आहे. जगात श्रीमंत घराणी, राजवंश यांच्या वैभवात चढउतार (राइज् अँड फॉल) असतातच.
हे प्रश्‍न आले आहेत ‘गरूडपुराणात’, जीवन – मृत्यू – मृत्युनंतरचं जीवन (अस्तित्व)- जीवाची गती – प्रगती – सद्गती – मुक्ती यांचं वर्णन -विवरण करणार्‍या या पुराणग्रंथाचा संदर्भ अतिशय महत्त्वाचा आहे. या सार्‍या प्रश्‍नांच्या मुळाशी शरीराच्या नि मनाच्या स्वास्थ्याचा म्हणजेच एकूण आरोग्याचा विचार आहे. इकडे दुर्लक्ष करून मेल्यानंतर तो जीव किती दिवस कुठं कुठं असतो, त्याचा वास कोणत्या रूपात – स्वरूपात कोणत्या लोकात असतो याची अतिरंजित, आजच्या काळात अद्भुत वाटणारी, आजच्या माणसाच्या दृष्टीनं अविश्‍वसनीय, काल्पनिक वर्णनं वाचण्या-ऐकण्यात काही अर्थ नाही. अशा वचनांवर (उपदेशावर) सखोल मनन-चिंतन करून आपलं उर्वरित जीवन सुधारलं पाहिजे. आपल्या जीवनातील दुःख, भोग यावर उगीच विचार करून मनात कुढण्या-झुरण्यापेक्षा आनंदात, (कोणतीही तक्रार कोणाबद्दलही, अगदी आपल्या नशिबाबद्दलही न करता) आरामात जगलं पाहिजे. पूर्ण आरोग्याचा खरा अर्थ नि मंत्र हाच आहे.
आनंदाचे नऊ पैलू सांगणारं एक सुभाषित आहे. आनंद हे जीवनसर्वस्वच नव्हे तर साक्षात् जीवनच आहे.
दानं, धर्मश्च, विद्या च रुपं, शीलं, कुलं तथा |
सुखम् आयुर्यश्वैव न गोप्यानि यत्नतः ॥
चाणक्यनीतिशास्त्रातलं हे सुवचन आहे. त्यावेळचे ग्रंथ हे सूत्ररूप असत. चाणक्यासारख्या बुद्धिमान, देहापेक्षा, देवापेक्षा देशावर प्रेम करणारा ज्यावेळी जीवनसूत्रं सांगतो तेव्हा त्याच्यामागे त्याचं दीर्घ चिंतन, प्रत्यक्ष कार्य तशीच कठोर तपश्चर्या असते. म्हणून अशा व्यक्तींचं भाषण-संभाषणसुद्धा मार्गदर्शक असतं. मुख्य म्हणजे त्यांचे विचार हे सर्वस्पर्शी असतात आणि त्यांचा आचारही तसाच असतो. जे नऊ पैलू आदर्श, पूर्णजीवनाचे सांगितलेयत ते असे-
१. दान – राखणारा राक्षस, देणारा देव नि देणारा-घेणारा मानव. देण्यात कर्तव्य असतं तर घेण्यात अधिकार म्हणजे हक्क असतो. मानवानं देवत्वाकडे जाण्याचा ध्यास घेतला पाहिजे. त्यासाठी ‘द्यायला’ शिकलं पाहिजे. श्रमदानासाठी शक्ती नसेल, अर्थ (अन्न, वस्त्र इ.) दानासाठी संपत्ती नसेल, तरी रक्तदान, मृत्यूनंतर अवयवदान (देहदान) करता येतं. काही नाहीतरी आपल्या वेळातला वेळ इतरांच्या सेवेसाठी वापरून समयदान तरी करता येतंच. दान हा धन्य जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे.
२. धर्म – म्हणजे कर्तव्यपालन. देहधर्माचं (भूक, तहान, निद्रा इ.) पालन तर सर्वच प्राणी करतात. वर्णाश्रमधर्माचं म्हणजे जीवनातील अवस्था ब्रह्मचारी, गृहस्थ, निवृत्त (ज्येष्ठ) इ. नि त्यानुसार कर्तव्यपालन करायलाच हवं. पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जात, धर्म, वंशकुल, शिक्षण, पराक्रम या सर्वांच्या पलीकडे असलेल्या माणुसकीच्या धर्माचं आचरण तर केलंच पाहिजे ना?
३. विद्या – म्हणजे शिक्षणसंस्थातून दिलं जाणारं औपचारिक शिक्षण नव्हे. पुस्तकं-परीक्षा-पदवी-प्रमाणपत्रं यात बंदिस्त झालेलं ज्ञान नव्हे. जीवन अर्थपूर्ण रीतीनं जगण्यासाठी कोणतंही ज्ञान-कला-कौशल्य-तंत्र अंगी असणं नि त्याचा आनंद निर्माण करण्यासाठी उपयोग करणं ही खरी विद्या. अशा विद्येत स्वार्थ-सिद्धी-प्रसिद्धी यांचा अंशही नसतो.
४. रूप – म्हणजे सौंदर्य नाही. तर व्यंग नसलेला देह, त्याला प्रयत्नपूर्वक स्वच्छ, नीटनेटकं ठेवणं मुख्य म्हणजे आरोग्य राखणं म्हणजे खरं रूप आहे. यासाठी हवं ज्ञान, सौंदर्य-प्रसाधनं नकोत. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे – ‘वस्त्रे अलंकारे शृंगारे शरीर | चातुर्ये शृंगारावे अंतर (मन) ॥ ही गोष्ट खूप मोलाची आहे.
५. शील – म्हणजे चारित्र्य. सामाजिक नीतिशास्त्राच्या दृष्टीनं चारित्र्य हे स्त्रीपुरुषसंबंधांवर अवलंबून असतं. पण आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या अंगचे गुण, चांगल्या सवयी, आपली तत्त्वं यातून आपलं शील संपन्न होतं. शीलवान व्यक्तीचं जीवनच धन्य बनून जातं.
६. कुल – कुल म्हणजे कुळ, वंश, घराणं इ. याचा संबंध जातिव्यवस्थेशी म्हणजे जन्माशी नाही तर कुटुंबात मुलांवर केल्या जाणार्‍या संस्कारांशी आहे. आईवडील अशिक्षित जरी असले, कोणत्याही जातीचे – वर्णाचे असले तरी जीवनमूल्यांचे (उदा. प्रेम, सेवा, त्याग इ.) संस्कार आपल्या मुलांवर करू शकतात. त्यामुळे सुसंस्कृत कुल हे जीवनाचं महत्त्वाचं अंग आहे.
७. सुख – जीवनातील सुख हे मूलतः आरोग्याशी जोडलेलं आहे. शरीराचं, मनाचं आरोग्य हे जसं व्यक्तीचं असतं तसं कुटुंबाचं नि व्यापक अर्थानं समाजाचंही असतं.
८. आयुः – म्हणजे दीर्घायुष्य. ‘जीवेत् शरदः शतम्’ अशी शुभकामना देताना हाच विचार असतो. ‘उदंड आयुष्य नि उत्तम आरोग्य लाभो’ हाच भाव आपल्या मनात असतो.
९. अश्‍व – म्हणजे केवळ घोडे नाहीत. अश्‍व हा शब्द सत्ता, संपत्ती यांचाही निर्देश करतो. पण उपनिषद्वाङ्‌मयात अश्‍व हे शक्ती (अश्‍वशक्ती), जोम, उत्साह तसेच या सार्‍यांनी युक्त अशा इंद्रियांचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे पूर्णजीवन जगण्यासाठी चैतन्य, ऊर्जा, सर्व प्रकारची शक्ती यांचीही गरज असते. हे जे रूपक किंवा चित्र ऋषींनी उभं केलंय ते आजही तितकंच प्रभावी आहे. देहाचा रथ, जीवनातील मार्गावरून धावताना योग्य मार्गावर ठेवायचा असेल तर इंद्रियांच्या अश्‍वांचे मनोरूपी लगाम बुद्धी या सारथ्याच्या हातात द्या. पण विसरू नका की देहाच्या रथाचा खरा स्वामी इंद्रिय-मन-बुद्धी यांच्या पलीकडे असलेला आत्माच आहे. ‘आत्मानं रथिनं विद्धि ॥