जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर लढवणार नाही

>> कॉंग्रेस विधिमंडळ गटाचा निर्णय

कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीवर चर्चा करण्यात आली असून भाजपकडून निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने पक्षीय पातळीवर निवडणूक लढवू नये असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक पातळीवर जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याची मोकळीक द्यावी व कॉंग्रेस पक्षाची ताकद त्यांच्यामागे उभी करावी, असे बैठकीत ठरविण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते कामत यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटाचा निर्णय कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीला कळविला जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाची कार्यकारी समिती जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढविण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मुक्त वातावरण नाही. निवडणुकीला महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला तरी मतदारसंघाचे आरक्षण जाहीर केले जात नाही. या बैठकीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझीन फालेरो यांची उपस्थिती होती. आमदार आलेक्स रेजिनाल्ड गोव्याबाहेर असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकला नाही, असेही कामत यांनी सांगितले.
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जिल्हा व पंचायत निवडणुकीतील आरक्षण ठरविण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आश्‍वासन विधानसभेत दिले होते. परंतु, या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. राज्य निवडणूक आयुक्तांना मतदारसंघ आरक्षण जाहीर करण्याचा अधिकार नाही. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी आरक्षणाबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे, असेही कामत यांनी सांगितले.