ब्रेकिंग न्यूज़

जि. पं. निवडणुका १५ मार्च रोजी

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० जागांसाठी येत्या १५ मार्च २०२० रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना पंचायत सचिव संजय गिहीर (आयएएस) यांनी काल जारी केली.

गोवा राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही पंचायतीच्या प्रत्येकी २५ जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाणार आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय हालचालींना गती प्राप्त झाली आहे. विद्यमान दोन्ही जिल्हा पंचायतींचा ५ वर्षांचा कार्यकाळ २४ मार्च २०२० ला पूर्ण होत आहे. त्यामुळे १५ मार्चला निवडणूक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी जिल्हा पंचायतींच्या पन्नास मतदारसंघांसाठी निर्वाचन अधिकारी आणि सहाय्यक निर्वाचन अधिकार्‍याची नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला खर्च मर्यादा ५ लाख रुपये निश्‍चित करण्यात आलेली आहे, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या हरमल, मोरजी, धारगळ, तोरशे, कोलवाळ, हळदोणा, पेन्ह दी फ्रान्स, रेईस-मागूश, सुकूर, कळंगुट, हणजूण, शिरसई, शिवोली, ताळगाव, सांताक्रुझ, चिंबल, खोर्ली, आगशी, लाटंबार्शे, कारापूर, पाळी, मये, होंडा, केरी, नगरगाव या मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या सांकवाळ, कुठ्ठाळी, राय, नुवे, कोलवा, बाणावली, वेळ्ळी, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली, रिवण, धारबांदोडा, सावर्डे, शेल्डे, बार्शे, खोला, पैंगिण, उसगाव- गांजे, बेतकी-खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा या मतदारसंघांत निवडणूक घेतली जाणार आहे.