जाहीर प्रचाराची उद्या सांगता

येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता रविवार २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार असून अंतिम टप्प्यात निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे. अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय पक्षांनी शनिवारी अनेक ठिकाणी जाहीर प्रचार सभांचे आयोजन केले आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच दोन्ही जिल्ह्यात केंद्रीय राखील दलाच्या जवानांची नियुक्ती विविध ठिकाणी करण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस व केंद्रीय राखील दलाच्या जवानांकडून गस्त घातली जात आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. निवडणूक कार्यालयाकडे येणार्‍या तक्रारींची गस्ती पथकांकडून दखल घेतली जात आहे.

आत्तापर्यंत साडेआठ
कोटींचा ऐवज हस्तगत

भाजपकडून शनिवारी शिरोडा मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यानिमित्त संध्याकाळी ४.३० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.

निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार १७ एप्रिलपर्यंत २ कोटी ३१ लाखांचा रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तसेच २ कोटी ८१ लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण ८ कोटी ४६ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

काही सरकारी कर्मचारी राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे आढळून आले आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होई नये. राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिला आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या जवळील दुकाने, रेस्टॉरंट सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. नगरपालिका क्षेत्रातील १०० मीटर अंतरावरील आणि पंचायत क्षेत्रातील २०० मीटर अंतरावरील रेस्टॉरंट, दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. मतदान केंद्राच्या आसपास २०० मीटरमध्ये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.