ब्रेकिंग न्यूज़

जावे ‘ती’च्या वंशा …

  • कालिका बापट

घरातली बिकट परिस्थिती. घरात कमावणारा कुणीच नाही. वडील अंथरुणावर खिळलेले. आई खचलेली. केवळ पाठीमागच्या भावंडांसाठी ती बोहल्यावर चढलेली. मला आजही गर्दीतून वाट काढत जाणारी ती, मध्येच एकदा मागे वळून पाहणारी ती नजरेसमोर दिसते.

सशक्तीकरण, सबलीकरण तर आहेच. त्याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाची आहे ती मानसिकता, संवेदनशीलता, निर्णयक्षमता. स्त्री शिक्षणाची असंख्य दालने खुली होताच स्त्री कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक विकासाबरोबरच राष्ट्रहितासाठीही झटू लागली आहे. स्त्री आता मागे नाहीच. ती पुढे पुढे जाते आहे. यशोशिखरे गाठत आहे. एवढेच नव्हे तर पुढे जाताना इतरांनाही आदर्श ठरत आहे. तरीही स्त्री कधी तडजोडीच्या नावाखाली तर कधी सहनशीलतेच्या नावाखाली जीवन रेटत आहे. याला जीवन रेटणे हेच म्हणावे लागेल कारण त्या स्वत:च्या मनाने नाही तर कुणाचा तरी धाक किंवा भिती किंवा मग प्रेमाखातर केवळ जगायला पाहिजे म्हणून जगत असतात. काही पेटून उठतात आतल्या आत आणि त्याच परिस्थितीत आयुष्याच्या संघर्षाला सामोरे जात आपल्या जीवनाला सार्थकी लावतात.

अशावेळी स्मिता पाटीलांचा ‘उंबरठा‘ चित्रपट आठवतो. समाजासाठी, महिलांसाठी कार्य करायचे हा हेतू नजरेसमोर ठेवून चित्रपटातील स्मिता पाटीलने साकारलेली सुलभा घराचा उंबरठा ओलांडून जाते. सासूच्या, नवर्‍याच्या विरोधाला न जुमानता ती जाते, मागे मुलीला ठेवून. त्या नोकरीत केवळ संघर्षच असतो. महिलाश्रमात कार्य करीत असतानाच समाजद्वेष्टे, महिलांना बळी बनवणार्‍यांचा विरोध पत्करून ती लढत असते इतर भगिनींसाठी. हे सारे करतानाच तिचेही आयुष्य पणाला लागलेले असते. महिलांसाठी झटणारी, संघर्ष करणारी सुलभा नोकरीचा राजीनामा देऊन घरी परतते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपला नवरा दुसर्‍या कुणातरी स्त्रीच्या प्रेमात अडकलेला आहे. चित्रपटातील तो शेवटचा प्रसंग प्रेक्षकांचे मन हेलावणारा, मन हादरवणारा, तरीही अशा समाजाप्रति क्रोध व्यक्त करणारा. नवर्‍याच्या वागण्यातील बदल, त्याची मानसिकता तिच्या लक्षात येते. तिच्या लक्षात येतं की आपली आता कुणालाच गरज नाही. परंतु ती बोलत नाही. संसार तर विस्कटलेलाच. ती तशीच बॅग भरते आणि स्थिर मनाने त्याचा निरोप घेऊन पुन्हा एकदा उंबरठा ओलांडते. चित्रपट जुना असला तरी अशा स्त्रियांचे जगणे आजही तसेच आहे.
हा झाला स्त्रीच्या जगण्यातील सकारात्मक दृष्टिकोन. परंतु सार्‍यांनाच हे जमणारे नसते. मनाने दुर्बल असणार्‍या स्त्रिया खचून जातात. काही तडजोड करतात. काही निमूटपणे मूग गिळून संसाराचा गाडा रेटत असतात. काही आवाज उठवतात. काही घटस्फोट घेऊन आपला वेगळा मार्ग चोखाळतात. काही परित्यक्त्या, काही केवळ जगत असतात.

परवाच फोंड्यातील जयश्रीची मन हेलावून टाकणारी बातमी वाचली आणि अशाच उंबरठा न ओलांडलेल्या खर्‍या आयुष्यातील नायिका नजरेसमोरून गेल्या. केसर, भीमा, मिनीका, विमल यांची कथा काही वेगळी नव्हती. त्यांचे जगणेही स्मृतीतच विलीन झाले असे म्हणावे लागेल. त्यांची वेगळी अशी कथा नक्कीच आहे. वेगळी व्यथाही आहे. परंतु त्या जगण्याला अर्थ देणारी माणसे आणि माणसांची माणुसकी दुर्लभ होती. नवर्‍यानेच दूर केल्यावर कुणाकडे बघणार? तरीही भावाभावजयांच्या, बहिणींच्या घरी घरातली कामे करून आयुष्य घालवले या चौघींनीही. या चौघींची कथा वेगळी असली तरी साम्य एवढेच होते की त्या जगल्या. दुसर्‍यांच्या आधारावर, तरीही जगल्या. खचल्या नाही. उतारवयात नवरा गेल्याचे कळताच भाळावरचे कुंकू, ओझे उतरवल्यागत उतरवून पुन्हा कंबर कसत आयुष्याला जवळ केले त्यांनी. ज्यांनी बायको म्हणून कधीच नांदवले नाही त्याच्या नावाचे कुंकू लावून मिरवणार्‍या या भगिनी इतरांना आपल्या जगण्याचा त्रास होऊ नये म्हणून निमूटपणे जगत होत्या. माझ्या आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेले हे त्यांचे जगणे जवळून पाहिलेय मी. आईच्या मांडीवर डोके टाकून झोपता झोपता, किंवा उशिरा अभ्यास करता करता विमल आणि आईच्या हळू आवाजातील कानावर पडलेल्या गोष्टी आठवताहेत मला. कष्ट करणारी भीमाही आठवते. कपाळावर मोठ्ठं कुंकू. परंतु गोष्टी मात्र आपल्या तालेवार वडिलांच्या. कधीच तिच्या तोंडून नवर्‍या विरुद्धच्या किंवा चांगल्याही गोष्टी ऐकल्या नाहीत. परंतु हा…तिची मेहनत, तिचे कष्ट पाहून, दु:खालाच जगणे असा अर्थ लावलेल्या भीमाची कथा आईकडून माहीत होती. या चौघींनाही त्यांच्या तरुण वयापासून मी पाहत आलेय. तशा दिसायलाही सुंदर होत्या. परंतु का असले भोग त्यांच्या नशिबी असा प्रश्‍न तेव्हा पडायचा.

सुमनची आणि माझी ओळख अशीच झाली. आमच्या घरासमोरून ती शाळेला जायची. येता जाता मी दिसले की वहिनी म्हणून हाक मारायची. कधी यायची अधून मधून माझ्याकडे. गप्पा मारायची. त्या अनेक भेटींमध्ये कुणाला प्रत्यक्ष भेटले नसले तरी, घरातल्या सार्‍यांची ओळख तिने करून दिली होती. एकदा अशीच जाताना तिने आपल्या मोठ्या बहिणीची ओळख करून दिली. सुमन काळी सावळी असली तरी दिसायला नीट नेटकी. बहीण मात्र गोरीपान. बाहुलीसारखी. असेल तेव्हा तिचे वय १९-२०. आम्ही घर बदललं तशी सुमनही दूरच झाली. आषाढातले दिवस होते. धो धो पाऊस पडत होता. अशा भर पावसात गर्दीतल्या बाजारात सुमनची बहीण भेटली. कपाळभर कुंकू. मानेवर रुळणारा अंबाडा. त्यावर एकच मोगर्‍याची वेणी. हातात हिरवा चुडा भरलेला. भरजरी साडी. अगदी महालक्ष्मी समोर उभी दिसावी तशी ती दिसली. सोबत एक म्हातारा माणूस होता. मला वडील वाटला आणि मी काही विचारायच्या आतच तिने त्याची आपला नवरा म्हणून ओळख करून दिली. मी तिच्याकडे बघतच राहिली. माझा प्रश्‍नांकित चेहरा ओळखून ‘सुमन तुमची आठवण काढते‘ असे सांगून त्या गर्दीत ती मिसळली. मी तशीच उभी. मनात काहूर, अनेकानेक प्रश्‍नांनी डोकं भणभणत होतं. काही दिवसांनी सुमनला मी मुद्दामहून बोलवून घेतलं. तेव्हा तिच्याकडून कळलं. घरातली बिकट परिस्थिती. घरात कमावणारा कुणीच नाही. वडील अंथरुणावर खिळलेले. आई खचलेली. केवळ पाठीमागच्या भावंडांसाठी ती बोहल्यावर चढलेली. मला आजही गर्दीतून वाट काढत जाणारी ती, मध्येच एकदा मागे वळून पाहणारी ती नजरेसमोर दिसते.

अशीच केसर आठवते कधी कधी. वृद्धत्वाकडे झुकलेली, तरीही ताठ, नऊवारी नेसलेली. भाळावर लख्ख लाल मोठ्‌ठं कुंकू. हातभर काकणे. आईकडून ऐकलेली तिची करुण कथा. परंतु ती आपली व्यथा कुणाशी मांडत नसे अशीही आई सांगायची. प्रपंच सोडून परमार्थाकडे वळलेल्या केसरला कधी नवर्‍याने सुखाने नांदवलंही नाही. वैवाहिक जीवन कुठलं, जगणं कसं असायला हवं, हेही तिच्या नशिबी नव्हतं. केसर एकटी पडलेली. परंतु आपल्या दु:खाचा बाजार नव्हता तिने मांडलेला. ती सहन करत होती लोकांचे टोमणे. परंतु आपल्या नवर्‍याला काही म्हणू द्यायची नाही. उलट भांडायला जायची. त्यामुळे लोकं तिलाही जवळ करीत नसत. कुठल्या मंगलकार्यात तिला क्वचितच बोलावले जायचे. बाराव्याच्या जेवणाला मात्र केसर जायची. निमूटपणे जेवायची आणि माघारी फिरायची. केसर अंथरुणाला खिळून होती तेव्हा आणि गेल्यानंतरही लोकं तिची आठवण काढायची. हे कसलं आयुष्य? हे कसलं जगण? आपला एखाद्याला उपयोग होतो नं, मग सार्थकी लावायचं आयुष्य. म्हणूनच का ती वागायची अशी? आपल्यावरून आपल्या नवर्‍याला कुणी काही म्हणू नये म्हणूनच काय ती कुणात मिसळत नसे? अनेक प्रश्‍न सतावतात. त्या वयात, त्या परिस्थितीत मला असे प्रश्‍न मांडता आले असते तर केसरच्या बाजूने असते का मी?
समाज… नियोजनबद्धरीत्या, नियमाप्रमाणे वागणारा शिस्तप्रिय समाज.

या समाजातच अशा आखून दिलेल्या नियमांचे भंग करून स्त्रियांना तडजोडीने जगायला लावणार्‍या व्यक्ती याच समाजात ताठ मानेने जगतात. कळूही देत नाहीत त्यांच्या संसारामध्ये स्त्रीवर होत असलेले आघात आणि तीही लोकलज्जेसाठी, कधी आपल्या कोवळ्या जिवांसाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावते. कधी तिने आईवडिलांना दिलेली शपथ आडवी येते. तर कधी मुलांवरची माया. कधी कमकुवत मन, ‘आहे ना नवरा, मग राहू दे. कपाळावर कुंकू तरी लावता येईल. खोटं का असेना समाजात ताठ मानेने जगता येईल. मुलांना आपल्यावरून त्रास नको व्हायला’, असे सांगणारे भाबडे मन.‘ या अशा महिलंाच्या व्यथा मांडताना मन द्रवतंही, त्यांचा रागही येतो. म्हणतात नं… जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. परंतु ही तडजोड कितपत करावी, हे देखील आपल्या भगिनींच्याच हातात आहे. अशावेळी माझ्या एका मैत्रिणीचं म्हणणं मला आठवतं. असेच एकदा बोलता बोलता ती म्हणाली होती, तारुण्याचा तोरा असेतोवर साराच खेळ. हे शरीर खिळखिळे झाल्यावर स्क्रॅपमध्येच जायचंय. पडला स्क्रॅपध्ये की आठवण येईल घराची. समाजातील स्त्रियांचा अजून एक असा घटक आहे ज्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असते. आपण त्यांचे जगणेही नगण्य मानतो. त्यांना गरज असते ती केवळ आपल्या जवळच्या माणसांच्या आधाराची, मायेची, प्रेमाची. अशा भगिनींविषयी नक्कीच बोलायला हवे.