जायकाची जलवाहिनी फुटल्याने दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा ठप्प

जायकाची जलवाहिनी फुटल्याने दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा ठप्प

शेळपे, सांगे येथे संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारी जायका जलशुद्धीकरण प्रकल्पाची १०० एमएलडी व्यासाची जलवाहिनी काल सकाळी ८.१५ च्या दरम्यान शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ केवळ दहा मीटरच्या अंतरावर फुटल्याने भर पावसात काल दिवसभर दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, रात्री उशिरा पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वास्को, शिरोडा, बोरी, फोंडा व सासष्टी तालुक्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांचे हाल झाले. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली जायकाची जलवाहिनी दोन वर्षांच्या कालावधीत सलग चौथ्या वेळा शेळपे येथे ङ्गुटण्याचा प्रकार काल घडला.
शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ काल सकाळी जलवाहिनी फुटण्यापूर्वी प्रकल्पाची वीज खंडित झाली होती. वीज आल्यानंतर अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दाबामुळे शेळपे येथे उतरणीवर जलवाहिनीच्या मेनहोलचे वेल्डिंग सुटले आणि सुमारे दहा मीटर उंच पाण्याचा फवारा उडाला. यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यासाठी धावपळ उडाली. या दरम्यान सुमारे वीस मिनिटे गेल्याने सुमारे पाच एमएलडी पाण्याची नासाडी झाली.

जलवाहिनी फुटून पाण्याचा लोट मुख्य रस्त्यावरून वाट मिळेल त्या दिशेने गेल्याने मुख्य रस्त्यावर चिखल साचला होता. सखल परिसरात वसाहतीभोवती कुंपण असल्याने निवासी गाळे सुरक्षित राहिले. गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनीच्या तोंडावर पाण्याची गळती सुरू होती. त्याच जागी वेल्डिंग सुटल्याने जलवाहिनी फुटली आहे. दरम्यान, जायकाची जलवाहिनी पुन्हा पुन्हा ङ्गुटत असल्याने कामाची चौकशी केली जावी अशी मागणी होत आहे.