जागवू या स्मृती वीर जवानांच्या….

जागवू या स्मृती वीर जवानांच्या….

  • नागेश सरदेसाई
    (वास्को)

२५ ते २७ जुलै – ‘कारगील दिवस’ ज्याचे नामकरण ‘दिल्ली ते द्रास- कारगील’ असे केले असून ते साजरे करताना आपल्या देशवासियांना या वीर शहीद जवानांच्या स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करून कठीण प्रसंगी एकजूट राहण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करता येईल. यंदाची कारगील युद्धाची द्विदशकपूर्ती साजरी करण्याची घोषणा आहे- ‘रिमेंबर – रिजॉइस – रिन्यू’.

ज्यावेळी आपल्या वीर जवानांनी कारगीलला मुक्त करण्यासाठी, १९९९च्या मधल्या काळात, दीर्घकाळपर्यंत म्हणजे जवळपास दीड महिनेपर्यंत चाललेल्या युद्धात शत्रूंचा पराभव करून आपल्या देशाचा तिरंगा पुन्हा फडकावला, या गोष्टीला आता वीस वर्षं पूर्ण झाली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय विज्ञान, जय किसान’ असा नारा देऊन भारतीय लष्कराने योजिलेल्या ‘ऑपरेशन विजय’ला हिरवी झेंडी दाखवली होती. त्यावेळी श्री. जॉर्ज फर्नांडिस हे रक्षामंत्री होते आणि जेव्हा त्यांनी मे १९९९ मध्ये कारगीलला भेट दिली होती तेव्हाच तिथे शत्रूंच्या काहीतरी उचापती चालू झाल्या आहेत, असे त्यांच्या लक्षात आले होते. लेहलडाख ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्ग एनएच-१ वर कारगील वसलेले आहे. लडाख परिसराला सर्व पुरवठा या महामार्गाद्वारे कारगीलमधून केला जातो.

भारतीय लष्कराने पुढाकार घेऊन सर्व शत्रूंना बाहेर हाकलून लावण्याची जी मोहीम त्यावेळी फत्ते केली त्यामध्ये आपल्या देशातील एकूण ५२७ वीर जवानांनी वीर गती प्राप्त केली. त्यानंतर भारताच्या या वीर सुपुत्रांना अनेक शौर्यपदके बहाल केली गेलीत. या वीर जवानांची शौर्य गाथा ऐकल्यानंतर आपलीही छाती अभिमानाने भरून येते व आपल्याला त्यांच्या पराक्रमाची जाणीव होते. कॅप्टन सौरभ कालिया यांना, त्यांच्या इतर पाच जवानांसोबत गस्त घालतेवेळी जिवंत पकडले गेले त्यामुळे शत्रूच्या लष्कराने त्यांची अतिशय क्रूरपणे छळणूक केली आणि जिवे मारले. याची राष्ट्रीय पातळीवर कसून चौकशी करण्यासाठी त्यांचे वडील डॉ. नरिंदर के. कालिया हे आजही सुप्रिम कोर्टात केस लढत आहेत. ११ राजस्थान रायफलचा कॅप्टन हनीफ-उद-दीन हा यार्कंडी व्याघूरमधील श्योक नदीजवळील तुर्तुकमध्ये शहीद झाला होता, याला मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. तसेच त्याच्या सन्मानार्थ, त्याच्या शूर आत्म्याला नमन करून या ठिकाणाचे नाव ‘सबसेक्टर हनीफ’ असे ठेवण्यात आले आहे, कारण प्रशिक्षण पूर्ण करून त्याला फक्त दोनच वर्षे झाली होती. मुस्लीम वडील व हिंदू आईच्या पोटी जन्मलेला हा वीर सुपुत्र म्हणजे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा खरा मानबिंदू ठरलेला आहे.

ल्युटिनंट विजयंत थापर हा आणखी एक शूरवीर आहे ज्याने आपल्या शेवटच्या पत्रात असे लिहून ठेवले आहे की ‘जर माणूस म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला तर त्याची इच्छा पुन्हा लष्करमध्ये जाण्याची आणि देशासाठी लढण्याची आहे.’ त्यालाही मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले. त्याचे वडील कर्नल थापर दरवर्षी आपल्या मुलाच्या स्मृतिदिनी कारगीलच्या परिसराला भेट देतात आणि आपल्या मुलाच्या स्मृतींना उजाळा देतात. खरं म्हणजे फसवं, धोकादायक चढण असलेल्या टेकडीवर दर वर्षी चढून जाणं खूप कठीण आहे, पण जोपर्यंत त्यांना शक्य आहे तोपर्यंत ते त्यांचे कर्तव्य करत राहणार. अशा आणि अशा अनेक आपल्या वीर देशबांधवांच्या कथा ऐकल्यावर त्यांच्या सन्मानार्थ आपला माथा नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाही.

भारतीय लष्कराने टायगर हिल, द हेल्मेट, इंडिया गेट, र्‍हायनो हॉर्नो आणि इतर अनेक ठिकाणे – जी बर्‍याच उंचीवर (जवळपास १६,००० फूट), आहेत अशा सगळ्या ठिकाणांवर आपला तिरंगा पुन्हा फडकवला. आज आपण शत्रूवर चपखलपणे मिळवलेल्या आपल्या विजयाची दोन दशकांनंतर स्मृती जागवत असतानाच, आज कारगील डिस्ट्रिक्टमध्ये द्रास या गावी या वीर शहीद जवानांच्या सन्मानार्थ मार्टीयर्स वॉर मेमोरीयल उभे ठाकलेले आपण पाहतो. तसेच भारतीय लष्कराने द्रास या ठिकाणी एक पूल बांधलेला असून त्याचे नाव ‘मैत्री’ असे ठेवले आहे.
त्यानंतरच्या काही वर्षानंतर कारगीलच्या युद्धावर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट निघाले. २००३ मध्ये जे.पी. दत्ताचा ‘द एल.ओ.सी.’ (लाईन ऑफ कंट्रोल) ज्यामध्ये अभिषेक बच्चन, सुनिल शेट्टी, अजय देवगण या कलाकारांनी कारगीलच्या कटू आठवणी थोड्याशा सौम्य करण्याचा प्रयत्न केला.

२५ ते २७ जुलै – ‘कारगील दिवस’ ज्याला ‘दिल्ली ते द्रास- कारगील’ असे नाव देऊन साजरे करताना आपल्या देशवासियांना या वीर शहिदांच्या स्मृतीला विनम्रपणे अभिवादन करून कठीण प्रसंगी एकजूट राहण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करता येईल. यंदा द्विदशकपूर्ती साजरी करण्याची घोषणा आहे- ‘रिमेंबर – रिजॉइस – रिन्यू’ जी आपल्याला आपल्या शत्रूच्या विरोधात देशबांधवांसोबत एकजुटीने राहण्याची प्रेरणा देतात आणि भारताची एकता व अखंडतेवर घाला घालणार्‍या दुष्ट शक्तींवर विजय मिळवण्याची शक्ती देतात, ज्यामुळे २१ व्या शतकात भारतच सार्‍या जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने पुढे सरसावेल. आपल्या लष्करातील वीर पराक्रमी सैनिकांना दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या पंतप्रधानांचा मंत्र- ‘सबका साथ- सबका विकास- सबका विश्‍वास’ आपल्या सर्वांना सर्वार्ंथाने एकजूट ठेवो!!