जल्लीकट्टूची अखेर

तामीळनाडूतील राजकीय जल्लीकट्टू अखेर काल तूर्त संपुष्टात आली. गेले नऊ – दहा दिवस जी राजकीय अस्थिरता या दक्षिणेतील महत्त्वपूर्ण राज्याला वेढून राहिली होती, ती सध्या तरी दूर झाली आहे. या नाट्यमय घडामोडींमध्ये स्वतःला जयललितांचे राजकीय वारसदार म्हणवणारे आणि अनपेक्षितरीत्या बंडाचा झेंडा रोवणारे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ओ. पनीरसेल्वम बाजूला फेकले गेले आणि कारावासात रवानगी झालेल्या शशिकला यांनी निवडलेल्या एडाप्पडी पलानीस्वामींकडे सत्तासूत्रे गेली आहेत. पलानीस्वामींच्या मुख्यमंत्रिपदी झालेल्या निवडीचा अर्थ तामीळनाडूची खरी सत्तासूत्रे शशिकला आणि नातलगांच्या गोतावळ्याकडेच राहणार आहेत असाच आहे. शशिकलांची रवानगी तुरुंगात झालेली असली, तरी त्यांनी स्वतः अभाअद्रमुकवरील पकड सोडलेली नाही. त्यात आपले नातलग दिनकरन वगैरेंना पक्षात पुन्हा स्थान दिलेले असल्याने तुरुंगात राहूनही शशिकला सत्तेचे सुकाणू सांभाळणार आहेत हे स्पष्ट आहे. पलानीस्वामी यांनी शशिकला यांच्याशी निष्ठा कायम ठेवताना आमदारांना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवण्यापूर्वी त्यांना पलानीस्वामींच्याच घरी नेण्यात आले होते. त्यांच्या या निष्ठेची बक्षिसी त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने मिळाली असली, तरी जोवर शशिकला यांची त्यांच्यावर मर्जी राहील तोवरच ते आसन त्यांचे असेल हेही तितकेच खरे आहे. बंडाचा झेंडा रोवणार्‍या ओ. पनीरसेल्वम यांनी लाख प्रयत्न करूनही त्यांच्या बाजूने मोजकेच आमदार व खासदार गेले. शशिकला यांनी आपल्या सर्व आमदारांना कडेकोट सुरक्षेत रिसॉर्टमध्ये ठेवल्याने फोडाफोडीची संधीही कोणाला लाभली नाही. आता जी मंडळी पनीरसेल्वम यांच्यासोबत गेली होती, त्यांना पुन्हा पक्षात माघारी बोलावून पनीरसेल्वमना एकटे पाडण्याची खेळी शशिकला आपल्या बगलबच्च्यांमार्फत खेळू शकतात. पनीरसेल्वम यांना त्यांच्या गद्दारीचे फळ दिले जाते की त्यांनाही क्षमा करून पुन्हा पक्षात घेऊन पक्ष बळकट केला जातो ते लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यांच्यासाठी व्यंकय्या नायडू मध्यस्थी करीत असल्याच्या वार्ता आहेत, कारण केंद्रातील भाजपा सरकारला अभाअद्रमुकसारखा सोबती सध्या हवा आहे. राज्यसभेत आणि लोकसभेत अभाअद्रमुकचे बळ कमी होऊ नये असाच भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी पलानीस्वामींना बहुमत सिद्ध करण्याची संधी देणे न्यायोचित ठरले आहे, कारण त्यांच्यापाशी किमान १२४ आमदारांचे पाठिंब्याचे पत्र होते. रीतीनुसार पंधरा दिवसांची मुदत त्यांनी पलानीस्वामींना बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली असली तरी आपले बहुमत काठावरचे असल्याने सावधगिरीचा भाग म्हणून लवकरात लवकर आपले बहुमत सिद्ध करण्याचा शहाणपणा ते दाखवू शकतात. शशिकला यांना न्यायालयाने दोषी धरले, त्या तुरुंगात गेल्या तरीही बहुतांशी आमदारांनी त्यांची साथ सोडली नाही याचे कारण या सार्‍या मंडळींना आमदारकी मिळाली तीच मुळी शशिकला यांच्या शिफारशीमुळे. जयललिता असताना शशिकला पडद्याआडून आपली सूत्रे हलवीत होत्या. त्यामुळे हे आमदार शशिकला यांच्याच पाठीशी राहिले. शशिकलांचे स्वतःचे मुख्यमंत्रिपद हुकले असले तरी सत्ता कायम राहिल्याने त्यांच्यासाठी पनीरसेल्वम यांच्यावर सूड उगवल्याचे समाधान मिळणार आहे. बर्‍याच काळानंतर एक पूर्णवेळ मुख्यमंत्री लाभल्याने, तामीळनाडूसारख्या महत्त्वपूर्ण राज्यामध्ये गेले दहा दिवस ठप्प झालेले प्रशासन आता नीट मार्गी लागावे अशी अपेक्षा आहे. जयललितांचा अभाअद्रमुक पक्ष या संकटाच्या घडीस फुटीच्या धोक्यातून मात्र वाचला आहे!