जलमय जीवन

  •  विनायक विष्णू खेडेकर

जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख वृत्तपत्रातून जाहीरपणे व्यक्त करण्याची आज निर्माण झालेली प्रथा सांगते आहे, आसवे ढाळणे कालबाह्य झाल्याने डोळ्यातील पाणीही सुकत, आटत चाललेले आहे?

 

पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे संस्कृती. या संस्कृतीत न केवळ मानव तर यच्चयावत सजीव-निर्जीव, निसर्ग, सार्‍याचा समावेश. सृष्टिचक्राचे भ्रमण, संबंध ऋतुुचक्राशी, मानवासकट प्राणी, पशुपक्षी, जल-स्थिरचर व्यापून दशांगुळी ङ्गिरत राहणारे. म्हणूनच असेल, पण पाण्याने व्यापलेला पृथ्वीचा भाग भूमीहून अधिक, तरीही आज जगातील भूवासीयांना पाण्याची कमतरता भासत आहे.

जलसमृद्ध म्हटला गेलेला गोवाही याला अपवाद नाही. आज, आतापासून विचार, उपाययोजना; सतर्क राहण्याचे इशारे मिळत आहेत. तामिळनाडूला केरळकडून पिण्याचे पाणी घेण्याची वेळ आलेली आहे हे आपण विसरूया नको.
घरात पाट-पाणी, तसेच दोन गावची माणसे भेटल्यानंतर गोष्टी होतात त्या पाऊस-पाणी, पीक-पाणी, चारा-पाणी अशा ‘पाण्या’वरच्या. अवघे जीवन व्यापून राहिलेले पाणी अंत्यसमयी मुखात गंगाजलसम पाण्याचा थेंब पडावा यासाठी आसुसलेले असते. एकूणच जलमय जीवन, पाण्याचे महत्त्व सांगणारे. दैनंदिन व्यवहारातील भाषा, संवाद, वाक्‌प्रचार हेच अधोरेखित करतात.

‘ते दृश्य पाहून आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले’, ‘एक ठेवून दिली तर पाणी मागणार नाही,’ असे सांगणारे शूरवीर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ अशा गुर्मीत बोलणारे, एखाद्याला ‘पाणी’ दाखवल्याची भाषाही करतात. ‘त्याच्या अंगात पाणी नाही’ म्हणत हिणवतात. एखाद्याचे ‘पाणी जोखणे’ही होते. कुणाची ‘बिनपाण्यानं’ करायची झाली तर त्यासाठी नाभिकच हवा असे नाही. कोणत्याही जात-पात, व्यवसायातील कोणीही ती करू शकतो. एखाद्याच्या दुर्बलतेवर प्रहार करताना ‘कट्टें उद घेवन जीव दी’ हे खास या तांबडमातीचे.

‘या वस्तूला अमुक एवढी रक्कम मिळाली तर डोक्यावरून पाणी’, तर कधी ‘डोक्यावरून आंघोळ’ म्हणणाराच. उसनवार दिलेली वा कायद्याने येणे असलेलीही रक्कम मिळत नसते तेव्हा त्यावर ‘पाणी सोडले’, नाइलाजाने म्हणतो.
राम व कृष्ण या अवतारांना आदर्श मानणारी भारतीय संस्कृती. पुराणकाली रामाला शरयू तर कृष्णाला यमुना नदीची साथ-संगत होती. प्रगत अवस्थेतील ‘सिंधु-संस्कृती’ त्या सिंधू नदीच्या आश्रयानेच बहरली असे इतिहास सांगतो. प्राचीन ऋषी-मुनीनी पर्जन्यसूक्ते गायलीं. ‘अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती’ अशा शब्दांतील अनेक वेद ऋचांचा घोष केला. ‘उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया’ असे उद्गार समर्थ रामदासांनी काढले.

‘गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती| नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरू॥ म्हणत भारतातील प्रमुख सात नद्यांना आवतण दिल्याखेरीज कोणत्याच धार्मिक कार्याला सुरुवात होऊ शकत नाही ही आपली परंपरा- लग्नात ‘आगा आगा मायबापा| सोड पाणियाच्यो धारा’ म्हणनारी असते. सोहळा आटपून सासरी जाणार्‍या आपल्या मुलीला ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का?’ विचारणारी, कधी आईवडिलांसाठी पाणी आणायला गेलेल्या श्रावण बाळाची विद्ध कथा सांगते… ‘काले वर्षतु पर्जन्यः’ मागणे मागणारी. ‘अन्नासाठी दाही दिशा आम्हा ङ्गिरविसी जगदीशा’ म्हणायची, आज ‘पाण्यासाठी दाही दिशा’ म्हणण्याची पाळी येणार नाही ना? प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याची वेळ, हा विचार करायला लावतेय…
आधुनिक काळी ‘भाक्रानांगल, नर्मदा सरोवरांसह गोव्याला समृद्ध करणार्‍या सह्याद्री रांगात वसलेले महाराष्ट्रातील कोयना; नजीकच्या परिसरातून गोव्याला तेथूनच पाणी पुरविणारे तिळारी, दस्तुरखुद्द गोव्यातील साळावली, अंजुणे, चापोली अशी धरणे; धरण जलाशयात गाव बुडाल्याने विस्थापित कुटुंबांच्या ‘तोंडचं पाणी’ या धरणांनी पळवलं असा काहीसा ओरडा असला तरी धरणातील पाणी साठ्याने आसपासचेच नव्हे तर सुदूरचेही जनजीवन समृध्द केले. शेती-बागायती, उद्योग-धंदे पोसले, वाढविले; यासह शहरवासीयांनाही पिण्याचे पाणी पुरविले हे विसरता येणार नाही.

‘बारा गावचे पाणी प्यालेला’ असतो तद्वत या गोव्यातील कुंकळ्ळी ग्रामवासीयांना ‘बारा बांधांचे पाणी प्यायलेले’ म्हणतात. चिंबलच्या तळ्याचे पाणी राजधानी पणजीत पोचले होते. ‘शेणिल्लें गोरूं करमळे तळ्यार’ या कोकणी म्हणीतील खोर्ली-करमळीतील तळ्यावर आजही शेकडो मैलांवरून उडत येणार्‍या पक्ष्यांची गजबज असते. म्हणतात की वैजारी केरीचे तळे पूर्ण भरले नाही तर मंगेशीच्या विहिरी कोरड्या पडतात. लांबच्या गावातील, दूरवरची शेती पिकवण्यासाठी कुडतरीच्या तळ्याचे पाणी भूगर्भातून नैसर्गिक वाटचाल करत असते, हे बुजुर्ग गावकर्‍यानांच ठावूक. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पाण्याने भरून वाहणारी शिरोड्यातील बारा तळी पाहिलेले आजही हयात आहेत.

घरी आल्या पाहुण्यांना गूळ-पाणी देण्याची प्रथा होती. उत्तर भारतात घरातच नव्हे तर कचेरीतही आलेल्याला, चर्चा-बैठकीसाठी सभागारात शिरताच पाणी देण्याची प्रथा आहे. बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुऊनच घरात प्रवेश करण्याची प्रथा गोव्यासह इतर प्रदेशांतही; आज होती म्हणायला हवं. शब्द, त्यांचे अर्थही बदलले.
एखाद्याच्या ‘तोंडचे पाणी पळते.’ आज समस्त गोवेकरांच्या तोंडचेच पाणी पळायची वेळ येऊ घातलीय यावर चिंतेच्या रूपात विचारमंथन आणि उपाययोजना, यांची गरज निर्माण झालेली आहे. काळ बदललाय. ‘पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.’ आमच्या गोव्याच्या भाषेत ‘पाटातून बरेच पाणी वाहून गेले.’ आता विसरून चालणार नाही की, आणीबाणीप्रमाणे ‘पाणीबाणी‘ येऊ शकते, अन्नान्नदशा होते तशी ‘पाणाण्ण’ दशाही पाहावी लागू नये यासाठीच हा प्रपंच, ही सुरुवात.

डोळ्यातून घळघळा वाहणारे पाणी, अश्रू, आसवे म्हणतात याना. दुःखाचा कढ असह्य होतो तेव्हाच ते गळतात कौलारू छपरातून पागोळ्या गळाव्यात तशा. पाण्याने अस्वच्छता नाहीशी होते, आसवे ढाळल्याने दुःखाचा निचरा होतो.
तुमचा तो पाऊस आमच्या गावात कधी आलाच नाही,
सदरहू पीक काढलंय आमच्या डोळ्यातील आसवांनी|
कोण्या कवीचे हे त्या काळचे उद्गार, ज्या काळी ‘डोळ्यातून खरेखुरे पाणी वाहत होते. पाण्याचा, अश्रूंचा बांध ङ्गुटत होता, ते गळायचे थांबतच नव्हते. दुःखाची धग कमी होत होती. आजकाल अश्रुपातही हायब्रिड झाल्याचे आपण पाहातोय. याला ‘पंचतारांकित रुदन’ म्हणतो मी. यातही कधी गदगदून रडणे असले तरी टाहो ङ्गोडणे, काळीज चिरत जाणारा आक्रोश अशिष्टपणाचे मानणारा एक मोठा वर्ग आजच्या काळाने समाजात निर्माण केलेला आहे. मुसमुसणे, मुळूमुळु रडणे हे रुदनाचेच प्रकार असले तरी हे मूल वयातले असून त्यात ‘डोळ्यातून पाण्याचा टिपूस’ आला नाही तरी चालतो. तरुणपणातही करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे.

पाणीदार डोळ्यातही काही कारणाने पाणी उभे रहाते, तरळते. मात्र डोळ्यातून सतत पाणी वाहात असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हे बरे. कधी गुडघ्यात, मणक्यात, तर कधी कंबरेत पाणी होते ते डॉक्टरानाच दिसणारे. आजकाल काहीशा ग्रामीण वाटणार्‍या, असणार्‍या भागातून त्या काळी दिसणारे दृश्य म्हणजे ऊरी गदगदत, हमसून हमसून रडणारी, अश्रूंची खाण ङ्गुटून वाहाणारी आसवे. अशांच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते. हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, रडून रडून डोळे सुजले, अश्रूंचा लोट, आसवांचा महापूर; आजकाल वृत्तपत्रातूनच वाहतात. असे शब्द यथार्थतेने येण्याचा असा तो काळ.

आवाज अजिबात बाहेर येऊ न देता डोळ्यात अश्रू आल्यासारखे दाखवणे; सिनेमा-नाटकातल्याप्रमाणे कधी यासाठी ‘ग्लिसरीन’ वापरतात का? जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख वृत्तपत्रातून जाहीरपणे व्यक्त करण्याची आज निर्माण झालेली प्रथा सांगते आहे, आसवे ढाळणे कालबाह्य झाल्याने डोळ्यातील पाणीही सुकत, आटत चाललेले आहे?