जम्मू-काश्मीरात अल्प मोकळीकीनंतर पुन्हा निर्बंध

जम्मू-काश्मीरात काल सकाळी ते दुपारपर्यंत लोकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार करू देण्याची मोकळीक देण्यात आल्यानंतर पुन्हा दुपारपासून पूर्ववत सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले. लोकांना घरी जाण्यास सांगण्यात आल्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. आजच्या ईद उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर काल सकाळी लोकांना दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोकळीक दिल्याने राज्यातील स्थिती सर्वसामान्य बनल्याचे दिसत होते. लोकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले होते. ईदच्या दिवशी निर्बंध शिथिल होतील की नाही याबाबत स्पष्ट झालेले नाही.

रविवारी दुपारनंतर दुकाने बंद झाल्यामुळे व लोकांवर निर्बंध आल्याने ईद उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून आले. तथापि प्रशासनाने राज्यभरातील स्थिती शांततापूर्ण असल्याचे म्हटले आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आज ईद सणानिमित्त निर्बंध शिथिल करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र मोठ्या संख्येने उपस्थितीच्या शक्यतेमुळे जमिया, मशीद, दर्गा हजरतबल आणि ईदगाह या मोठ्या मशिदींमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करू दिले जाणार नसल्याचेही वृत्त आहे.

भारतीय रेल्वेने केली
समझौता एक्स्प्रेस रद्द

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून समझोता एक्स्प्रेस ट्रेन बंद करण्यात आल्याचे काल भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात आले. पाकिस्तानने आपल्या बाजूने ही रेलसेवा बंद केल्यानंतर आता भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ही रेलसेवा दर रविवारी दिल्ली ते अत्तारी व परत अशी भारताच्या बाजूने व पाकच्या बाजूने लाहोर ते अत्तारी चालत असे. अत्तारी स्टेशनवर उभय बाजूंचे प्रवासी ट्रेन बदल करत असत.