ब्रेकिंग न्यूज़

जमेना, पण करमेना!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ वरील भेटीनंतरही उभय पक्षांमधील कटुता अद्याप हटू शकलेली नाही असे संकेत मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या आपल्या निर्णयापासून शिवसेना अद्याप मागे हटलेली नाही. शहा – ठाकरे भेटीत ‘सकारात्मक’ चर्चा झाली असे भाजपा नेते सांगत आहेत, याचा अर्थ एवढाच की भाजप आणि शिवसेना या महाराष्ट्रात आणि केंद्रात सोबतीने सत्ता उपभोगणार्‍या पक्षांदरम्यानचा तुटलेला संवाद पुनःप्रस्थापित व्हावा या दिशेने काही पावले टाकली गेली आहेत आणि यापुढे अशाच आणखीही काही बैठका घेतल्या जाणार आहेत. अमित शहा यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीच्या दिवशीच ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘चला, संपर्क खेळू’ या अग्रलेखातील परखड भाषा पाहिली तर या भेटीतून शहांच्या पदरात या भेटीतून फार काही पडणार नाही हे स्पष्ट झाले होते, परंतु तरीही स्वतःकडे आणि आपल्या पक्षाकडे कमीपणा घेऊन शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले, कारण आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे भाजपाला निदान महाराष्ट्रात तरी परवडणारे नाही. पालघरची नुकतीच झालेली पोटनिवडणूक भले भाजपने जिंकलेली असली, तरी शिवसेनेची राज्याच्या काही भागांमधील ताकद उणावलेली नाही आणि त्याकडे भाजप दुर्लक्ष करू शकत नाही. त्यात विविध पोटनिवडणुका आणि कर्नाटकातील निवडणुकोत्तर घडामोडींत सर्व भाजपविरोधी पक्ष एकवटू लागले असल्याने आणि दुसरीकडे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून एकेक मित्रपक्ष गळायला लागल्याने हे छिद्र बुजविणे भाजपासाठी आवश्यक ठरले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा खंदा समर्थक असलेला तेलगू देसम वेगळा झाला आहे आणि अलीकडेच विजयवाड्याच्या सभेमध्ये चंद्राबाबू नायडूंनी भाजप हा सर्वांत मोठा शत्रू असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना हा देखील भाजपचा वैचारिकदृष्ट्या सर्वांत निकटचा पक्ष असूनदेखील स्वबळाची भाषा बोलत असल्याने आपल्या संपर्क अभियानांतर्गत भाजपने त्याच्याशी संपर्क साधण्यात कमीपणा मानलेला नाही, परंतु म्हणून शिवसेनाही हुरळून गेलेली नाही. भाजपा उर्वरित देशांप्रमाणेच महाराष्ट्रातही आपल्यासारख्या समविचारी प्रादेशिक पक्षाला गिळंकृत करण्यासाठी धडपडत आहे हे सेनेला पुरेपूर माहीत आहे. त्यामुळे सतत भाजपचा पाणउतारा करून स्वतःला वरचढ ठेवण्याचा खटाटोप शिवसेना करीत असते. आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि दरारा राखण्यासाठीच सेना ही आक्रमक नीती अवलंबित असते. भाजपच्या प्रवाहात आपले मतदार वाहून जातील ही चिंता शिवसेनेला सदैव असते. त्यामुळेच वारंवार अशा बेटकुळ्या काढून दाखवल्या जातात. सेना भाजप युती सरकारच्या काळातही अशीच तणातणी होत असे, परंतु तेव्हा प्रमोद महाजन यांच्यासारखा बाळासाहेब ठाकरेंना शांत करणारा नेता भाजपापाशी होता. आज शिवसेनेला शांत करू शकणारा असा दुवा भाजपापाशी नाही. खरे तर महाराष्ट्रात मुंबई – ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रात भाजपने आपले काम चांगलेच विस्तारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देखील ते दिसून आले होते. तरीही भाजप शिवसेनेला स्वबळावर लढायला देऊन मतविभाजनाचा धोका पत्करायला तयार नाही. ‘मातोश्री’ भेटीच्या दिवशीच ‘सामना’तून आलेला अग्रलेख भाजपच्या जिव्हारी लागला असेल यात शंका नाही, परंतु प्रसंग पाहून वागण्याचे राजकीय शहाणपण असलेल्या शहांनी हा अपमान सध्या निमूट पचवला आहे. याच मुंबई भेटीत अमित शहा माधुरी दीक्षित आणि रतन टाटांना भेटले. लता मंगेशकर यांनाही ते भेटणार होते, परंतु लतादीदींची प्रकृती बिघडल्याने ती भेट होऊ शकली नाही. परंतु समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांपर्यंत संपर्क साधण्याच्या अभियानाचाच उद्धव यांची भेट हा एक भाग होता असे भाजपा भासवू पाहात असला तरी शेवटी उद्धव यांच्या भेटीला त्याहून वेगळी राजकीय किनार होती. शिवसेना आज स्वबळाची भाषा जरी बोलत असली, तरी शेवटी ती भाजपच्याच वळचणीला जाईल व फक्त स्वतः अधिकाधिक फायदा पदरात पाडून घेण्यासाठी सेनेची ही सौदेबाजी चालली आहे असे कॉंग्रेसला वाटते. भाजपवर कितीही तोंडसुख घेतले जात असले तरी रणांगणात उतरल्यावर कॉंग्रेसप्रणित विरोधकांच्या गोतावळ्यात शिवसेना जाऊन बसणे वैचारिकदृष्ट्या तरी शक्य नाही. त्यामुळे थांबा आणि वाट पाहा असेच सेना – भाजपच्या या संघर्षाबाबत म्हणायला हवे. यापूर्वीही अत्यंत आक्रमकपणे बोलणारा सेनेचा वाघ शेवटी ‘म्यांव’ करायला लागल्याची उदाहरणे आहेत. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी अमित शहांनी अशीच उद्धव यांची भेट घेतली होती आणि शेवटी सेना त्याला राजी झाली होती. त्यामुळे ‘तुझे माझे जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ असेच सेना – भाजपचे हे नाते आहे. हे नाते तुटावे यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजप विरोधकांच्या पदरी शेवटी निराशाच येण्याची अधिक शक्यता आहे.