जपा नात्यांचे बंध

  •  अनुराधा गानू
    (आल्त सांताक्रूज)

ही सगळी भावनिक, रक्ताची- बिनरक्ताची, अबोल- बोलकी, कडू- गोड नाती जपण्यानंच माणसाच्या जगण्याला खरा अर्थ येतो, खरी रंगत येते. म्हणूनच वाटतं, की सगळी नाती आहेत तशीच जपावी. घट्ट धरुन सांभाळावी.

नाती-गोती हा शब्द नेहमीच जोडीनं वापरला जातो. पण यातलं नातं या शब्दाचा आणि गोतं या शब्दाचा अर्थ आपल्याला कुठे माहीत्येय. नातं हा शब्द मूळ ‘नात्र’ या शब्दावरुन आलाय. नात्र म्हणजे नाळ. एकाच आईच्या नाळेशी जोडलेले म्हणजेच एकमेकांशी रक्ताच्या नात्याने जोडलेले. म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण ब्लड रिलेशन्स म्हणतो. तसेच गोत हा शब्द मूळ ‘गोत्र’ या शब्दावरुन आलाय. गोत्र म्हणजे एका कुटुंबातले, एका घरातले. म्हणजे एका नाळेने जोडलेले ते नाती आणि एकत्र कुटुंबातले म्हणजे गोती म्हणजे गोतावळा. म्हणजे आजी-आजोबा, काका -काकू, मामा- मामी, मावशी, आत्या सगळे. किंवा त्याचा दुसरा अर्थ म्हणजे एका गोत्राचे म्हणजे एका ऋषिचे वंशज ते सगळे म्हणजेही गोतावळा, म्हणून नाती-गोती.
आता यापेक्षाही आपली अनेक नाती… ती कशी जुळतात हे आपल्याला कळतच नाही. आपण वर्षोन् वर्षे एका वाड्यात किंवा एका चाळीत किंवा गावाच्या, शहराच्या एकाच भागात राहात असतो. त्यामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतो. कोणताही आनंदाचा प्रसंग असो वा दुःखाचा असो आपण सगळेच त्यात सहभागी झालेले असतो. किंवा एखाद्याला कसलीही मदत हवी असेल तर आपण लगेच एकमेकांच्या मदतीला तयार असतो. आपला एकमेकांवर अधिकार असतो. हक्क असतो. असं का होतं तर आपण सगळे ‘शेजारी’या नावाच्या नात्याने एकमेकांशी बांधले गेलेले असतो म्हणून.

समाजात वावरताना आपल्याला अनेक माणसं भेटतात. कधी रोजच्या प्रवासात, कधी नेहमीच्या रस्त्यावर, कधी आपल्या कामाच्या ठिकाणी नेहमी आपण एकमेकांना भेटतो. मग आपण हळूहळू एकमेकांना ओळख दाखवू लागतो. मग थोडे दिवसांनी हाय हॅलो सुरु होतं. एकमेकांची विचारपूस करायला लागतो. मग एखादे दिवशी आपल्याला त्यातलं कोणी दिसलं नाही तर आपल्याला हूरहूर लागून राहते. बरे-वाईट विचार (आधी वाईटच विचार येतात) मनात येतात. याचं कारण कळत नकळत आपल्यामध्ये एक अदृश्य असं सामाजिक नातं निर्माण झालेलं असतं. आणि मग नकळत आपण कोणाला काका, मामा, मावशी अशी नाती चिकटवून टाकतो आणि त्या नात्यामध्ये आम्ही गुरफटून जातो.

अनेकदा आपल्या नकळत आपली कोणाशी मैत्री होते. त्या मैत्रीला जात, धर्म, वय कशाचीही अडचण येत नाही. अगदी लहानपणापासून एकाच वर्गात शिकत असलेल्या आपल्या मैत्रीणींमध्ये असंच एक नातं निर्माण झालेलं असतं. मग पुढे आपण जरी वेगवेगळ्या व्यवसायात, वेगवेगळ्या गावात गेलो तरी ते नात्याचे बंध सुटत नाहीत. एकमेकींची, त्यांच्या घरच्यांची ख्याली खुशाली कळेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही.
काही वेळेला आपल्या मैत्रीणी आणि आपले आईवडिल एका गावात असतात तर आपण दुसर्‍या गावात असतो. तेव्हा आपल्या आईवडिलांच्या गरजेला आपल्या मैत्रीणी आधी धावून जातात. मग आपण आपल्या मनातली गुपितं जी आपण आपल्या घरांतल्यांनाही सांगत नाही ती गुपितं या मैत्रीच्या नात्यात उघडली जातात. मन हलकं करायची ती एक निश्‍चित जागा असते. हे मैत्रीचं नातं प्रेमावर, विश्‍वासावर उभारलेलं असतं. म्हणून वाटतं, समज-गैरसमज कितीही झाले तरी हे मैत्रीचं नातं तुटत नाही.

कधी आपण एकाच विचारांची माणसं एकत्र येतो आणि आपला गट तयार होतो. आपली एक संस्था तयार होते. आपण एकाच विचाराने, एका ध्येयाने, एका मनोवृत्तीने एकमेकांशी जोडले गेलेलो असतो. त्या विचारांचा एक अटळ सेतू आपल्या मधला दुवा असतो. हे बंध एका विचारसरणीचे असते. यालाच आपण म्हणतो वैचारीक नातं.
आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांशी आपलं असंच एक भावनीत नातं असतं. आपल्याकडचा कुत्रा दिवस दिवस मालकांची वाट बघत दारात बसलेला असतो. मालकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होतो. तसंच आताच बघा ना, सगळीकडे खूप पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर आले. ज्यांची गाई -गुरं गोठ्यात बांधली होती, त्यांनी रात्री बे-रात्री, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली गुरं सोडवली आणि घरांत आणून ठेवली आणि त्यांचा जीव वाचवला. टी.व्ही.वर मालिकेत बघितलंय ना राणा आणि साहेबरावाचं नावं. हे सगळं का? तर त्या प्राण्यांच्यात आणि आपल्यात एक भावनीक नातं असतं.

अहो, हे तर काहीच नाही. आपला जन्म ज्या घरांत झालेला असतो, जिथं आपलं बालपण, तारुण्य आपण घालवलेलं असतं, ज्या घरात आपण वर्षानुवर्षे राहात असतो, त्या घराच्या प्रत्येक विटेशी, प्रत्येक भिंतीशी, त्या वातावरणाशी एका अबोल अतूट नात्यानं आपण बांधले गेलेले असतो. म्हणूनच ते सोडताना आपलं मन गहिवरुन येतं. डोळ्यांतून अश्रू कधी ओघळतात कळतच नाही. परत – परत आपलं मन त्या घराकडे ओढ घेतं.

ही सगळी भावनिक, रक्ताची- बिनरक्ताची, अबोल- बोलकी, कडू- गोड नाती जपण्यानंच माणसाच्या जगण्याला खरा अर्थ येतो, खरी रंगत येते. म्हणूनच वाटतं, की सगळी नाती आहेत तशीच जपावी. घट्ट धरुन सांभाळावी. ही नाती निरगाठीसारखी असतात. सुरगाठीसारखी नाहीत. त्या निरगाठीची जर सुरगाठ झाली तर माणसाचं आयुष्यच निरर्थक निरस होऊन जाईल. म्हणूनच प्राणपणानं जपा ही सगळी नाती.