जपानची बुलेट ट्रेनसाठी मदत

जपानची बुलेट ट्रेनसाठी मदत

अणू करार नाही; आर्थिक गुंतवणूक दुप्पट
जपान व भारता दरम्यान, अपेक्षित नागरी अणू करार होऊ शकला नाही मात्र भारतात खासगी व सार्वजनिक मिळून ३४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा जपानने दिली. येत्या पाच वर्षात ही गुंतवणूक करण्यात येणार असून आतापर्यंतच्या गुंतवणुकीपेक्षा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही जपान मदत करणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिझो अबे यांच्यात टोक्योत झालेल्या शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंध मजबूत करणार्‍या संरक्षण, धोरणात्मक भागीदारी, तंत्रज्ञान सहकार अशा विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर सहमती झाली.
भारताच्या समुद्री सुरक्षेसाठी मदतगार ठरणार असलेल्या यूएस-२ ऍम्फिबियन विमानांची भारताला विक्री करण्यासंदर्भातील बोलणी विनाविलंब पूर्ण करण्याचेही ठरले.
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना जपानचे पंतप्रधान अबे यांनी, मोदींचे स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेनसाठी आर्थिक तसेच तंत्रज्ञान सहाय्य करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, नागरी अणू करार झाला नसला तरी याबाबत चर्चा गतीशील ठेवण्याचे निदेॅश आपल्या अधिकार्‍यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. भारत-जपान दरम्यानचे संबंध केवळ राजनीतीक नसून आध्यात्मिकही असल्याचे अबे म्हणाले.
पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, २१ वे शतक हे आशिया खंडाचे असेल, पण त्याचबरोबर भारत व जपान एकत्र आल्याशिवाय आशियाचे नेतृत्व असंभव आहे. त्यासाठीच हा पुढाकार असल्याचे ते म्हणाले. भारताच्या विदेश नीतीत जपानला विशेष प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply