चूक कोणाची?

  • सौ. अस्मिता पांगम

तिथे गेटवर सुमारे दोनशे लोकं सकाळी सातच्या अगोदर हजर होती आणि ती सगळी गेटच्या त्या बाजूला जाण्यासाठी धडपडत होती. ओरडत होती. काही बायकांना बघून तर अक्षरशः रडू आलं. कारण त्या घोळक्यात कुणी गरोदर होती तर कुणाचं तान्हं बाळ भुकेनं कळवळत होतं.

‘लॉकडाऊन’ हा शब्द आता आपल्या रोजच्या वापरातला शब्द झालेला आहे किंवा लॉकडाऊनची आता आपल्याला सवयच झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नसावी. या लॉकडाऊनमुळे एका कुटुंबात राहूनसुद्धा दुर्मीळ असणारे सदस्य घरात वावरताना दिसू लागले. ‘‘आई, खेळायला जातो गं’’… असं म्हणून घरातून लंपास होणारा खोडकर बंडू आता घरातच दिसू लागला. तर कुटुंबातली लाडकी बाहुली, ‘‘आई, मैत्रीणीकडे जाते गं किंवा वाचनालयात जाऊन येते’’, म्हणणारी आता घरकामात आईला मदत करू लागली. वेगवेगळे पदार्थ आईच्या मदतीने बनवून घरातल्यांना खाऊ घालू लागली व त्यातच आपला आनंद शोधू लागली. हे सगळं बघून सर्वांत जास्त कुणाला आनंद होत असेल तर तो या घरातल्या माऊलीला… म्हणजेच आपल्या आईला. तिला बाहेरच्या जगातलं काहीच माहीत नसेलही कदाचित पण घरातली माणसं, मुलं हेच तिचं जग आणि हेच जग तिच्या अवती-भवती असलं म्हणजे ती सर्वांत सुखी. ही अशी परिस्थिती मध्यम वर्गातल्या कुटुंबातली, जे स्वतःच्या घरी आहेत, ज्यांच्याकडे जीविका चालवण्याची साधनं आहेत त्यांची. पण त्यांचं काय… ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत?
परवाच माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. इकडच्या- तिकडच्या गोष्टी झाल्या. बोलता- बोलता ती म्हणाली की ती परवा आमच्या घरासमोरून गेली. मला थोडं आश्‍चर्य वाटलं कारण आजची परिस्थिती ही साधीसरळ नसून लॉकडाऊनची आहे. तरीही तिला सहजतेने प्रश्‍न केला, ‘‘का? कशाकरता?’’
ती म्हणाली, ‘‘माझ्याकडे घरकामाला जी बाई आहे, तिला तिच्या घरी सोडायला आले होते. पण तिथे गेटवर सुमारे दोनशे लोकं सकाळी सातच्या अगोदर हजर होती आणि ती सगळी गेटच्या त्या बाजूला जाण्यासाठी धडपडत होती. ओरडत होती. काही बायकांना बघून तर अक्षरशः रडू आलं. कारण त्या घोळक्यात कुणी गरोदर होती तर कुणाचं तान्हं बाळ भुकेनं कळवळत होतं. परिस्थिती फारच वाईट होती.’’

ती बोलत होती आणि मी नुसतं ऐकत होती पण ऐकतानाही इतकं वाईट वाटत होतं तर समोर घडताना काय होत असेल?
पण या सगळ्यांत ‘ती’ची काय चूक होती? खरं तर या सगळ्या परिस्थितीत कुणाची काहीच चूक नाही. मग अपराधी कोण? हा अपराध नाही हा आहे प्रकृतीचा कोप जो माणसाने स्वतःच्या कर्माने ओढवून घेतला आहे. माणूस हा एक असा प्राणी आहे जो, ज्या गोष्टी करायच्या त्याही तो करतोच पण ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या तर आवर्जून करतो. म्हणूनच प्रकृती कोपली व संपूर्ण मानवजातीवर हा आघात झाला. हिंदीत म्हणतात ना, ‘लालच बुरी बला हैं|’
त्याचप्रमाणे माणूसही लालची, स्वार्थी बनला. माणूस हा नेहमीच लोभी होता, आहे. पण याच माणसाने थोडासा संयम राखला असता तर आज हे संपूर्ण जगावर जे संकट आलेलं आहे त्यापासून आपण नक्कीच दूर राहू शकलो असतो. कोरोनासारख्या आघातापासून वाचण्यासाठी अजूनतरी कोणताच उपाय समोर दिसत नाही. या भयंकर आपत्तीपासून वाचायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच उपाय – तो म्हणजे स्वतःची काळजी घेणे, घराबाहेर न पडणे, लोकांपासून, गर्दीपासून दूर राहणे.

माणसाने थोडासा संयम आणि मर्यादा पाळल्या तरच पुढेही यापेक्षाही भयंकर असणार्‍या अशा अनेक संकटांपासून आपण अलीप्त राहू शकतो, हे मात्र नक्की!