चुरशीची लढाई

  •  प्रमोद ठाकूर

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे लोकसभा आणि तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकासुद्धा भाजप, कॉंग्रेस आणि मगोप यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत.

राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघ आणि तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्षांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी, लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी ही निवडणूक मोठे आव्हान बनलेले आहे. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. तथापि, भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांमधील नाराजी कायम असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान ठाकले आहे. या आव्हानावर शेवटच्या टप्प्यात कशा पद्धतीने तोडगा काढला जातो याकडे राजकीय निरीक्षकांचा लक्ष लागला आहे. कॉंग्रेस पक्षातसुद्धा रुसव्या-फुगव्याचे प्रकार सुरू आहेत.

राज्यातील लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये सत्ताधारी भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपचे लोकसभेचे दोन्ही उमेदवार पूर्वीच निश्‍चित झालेले असल्याने त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उशिरा जाहीर झाल्याने प्रचाराच्या बाबतीत थोडे मागे असल्याचे दिसून येत आहे. तरीही, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी विविध मतदारसंघांत दौरे करण्यात यश मिळविले आहे.

उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर, आम आदमी पार्टीचे दत्तात्रेय पाडगावकर, आरपीआयचे (कांबळे) अमित कोरगावकर, अपक्ष ऐश्‍वर्या साळगावकर, भगवंत कामत निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात पेडणे, मांद्रे, डिचोली, मये, साखळी, वाळपई, पर्ये, थिवी, हळदोणा, म्हापसा, शिवोली, कळंगुट, पर्वरी, साळगाव, पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांत आंद्रे, कुंभारजुवा, प्रियोळ या वीस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे श्रीपाद नाईक यांनी मतदारसंघात प्रचाराच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात केली आहे. नाईक यांना भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांची प्रचारात साथ मिळत आहे.
कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक प्रचार पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. चोडणकर यांना प्रचारासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागत आहे. आम आदमी पार्टीचे पाडगावकर व इतर उमेदवारांनीसुद्धा जोरदार प्रचारावर भर दिला आहे. खाण, रोजगार, सीआरझेड, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, मच्छीमारांचे प्रश्‍न हे चोडणकर यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे ऍड. नरेंद्र सावईकर, कॉंग्रेसचे फ्रान्सीस सार्दिन, आम आदमी पार्टीचे एल्वीस गोम्स, शिवसेनेच्या राखी नाईक, अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर आणि मयूर काणकोणकर निवडणूक रिंगणात आहेत. या लोकसभा मतदारसंघात फोंडा, मडकई, शिरोडा, मुरगाव, वास्को, कुठ्ठाळी, नुवे, कुडतरी, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी, कुडचडे, सावर्डे, सांगे, केपे, दाबोली, फातोर्डा, काणकोण या वीस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दक्षिण गोव्यात भाजपचे उमेदवार सावईकर यांची प्रचारात आघाडी आहे. कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने सार्दिन यांना प्रचारासाठी धावपळ करावी लागत आहे. ‘आप’चे एल्वीस गोम्स, शिवसेनेच्या राखी नाईक यांनी जोरदार प्रचार चालविला आहे.

भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी खाण हाच प्रचाराचा प्रमुख
मुद्दा बनविला आहे. भाजपने राष्ट्रीय स्तरावर जाहीरनामा तयार केला आहे. स्थानिक पातळीवर वेगळा जाहीरनामा तयार केलेला नाही. भाजपने केंद्रीय मंत्री नाईक यांच्या वीस वर्षांच्या काळातील कामकाजाचा आढावा घेणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे. भाजपचे उमेदवार नाईक यांनी आतापर्यंत विकासकामांवर भर दिल्याचा प्रचार केला जात आहे. भाजपने साधनसुविधा आणि मानवी विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविला आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या विकासाचे स्वप्न साकारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. खाण प्रश्‍न लवकरच सोडविण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत आपल्या प्रचारसभांतून सांगत आहेत.

कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील जाहीरनाम्याबरोबरच स्थानिक पातळीवर निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यात खाणबंदीची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. सीआरझेड, पर्यटन विकास, उद्योग, पारंपरिक मच्छीमारांचे संरक्षण व इतर मुद्यांना प्राधान्यक्रम देण्यात आले आहे. गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विकास बँकेमार्फत पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पर्यटन पूरक उद्योगांना खास सवलती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशात जास्तीत जास्त विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हिसा योजनेचा विस्तार केला जाणार आहे. तसेच तीन वर्षांसाठी पर्यटन व्हिसा शुल्क आकारले जाणार नाही. मच्छीमार बांधवांच्या मागणीनुसार केंद्रात खास मच्छीमार मंत्रालयाची स्थापना केली जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांना मिळणार्‍या योजनांचा लाभ मच्छीमारांना मिळवून दिला जाणार आहे. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाची अधिसूचना मागे घेतली जाणार आहे. सीआरझेड अधिसूचनेबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक मच्छीमारांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून उपाय-योजना केली जाणार आहे. स्थानिक क्षेत्र विकास योजना पारदर्शी, गुणवत्तापूर्ण आणि कालसुसंगत केली जाणार आहे. फॉर्मेलीनमुक्त मासे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गोव्यातील जमिनी आणि राज्याची ओळख जपण्यासाठी संसदेत खास कायदा करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा यावर भर दिला जाणार आहे. जीएसटीचा आढावा घेऊन त्यात काही नव्या तरतुदी सुचविल्या जातील. मूल्यवर्धित, अप्रत्यक्ष कर याबाबतीत फेरविचार केला जाईल. सीफेअरर्स वेल्फेअर असोसिएशनच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. दरमहा मिळणार्‍या एक्स-ग्रेसिया मॉनिटरी साहाय्य योजनेचा वेळोवेळी आढावा घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

मगो पक्षाने पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर, ताळगाव येथील माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कॉंग्रेसला निवडणुकीत लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोवा विधानसभेची शिरोडा पोटनिवडणूक लढविण्याच्या मुद्यावरून भाजप आणि मगोप यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर मगो पक्षाच्या दोन आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यामुळे मगो पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेसला मगोपचा पाठिंबा मिळाल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेसुद्धा कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने निवडणुकीत फायदा होण्यास मदत होणार आहे.
भाजपच्या उमेदवारांना भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. मगोपच्या कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा भाजपच्या उमेदवाराच्या मताधिक्क्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा मुख्यमंत्री सावंत याचा दावा आहे.

गोवा विधानसभेची शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप आणि मगोपसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मगोपला सत्तासुद्धा सोडावी लागलेली आहे. या मतदारसंघातून मगोपचे दीपक ढवळीकर निवडणूक रिंगणात आहेत. सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपने या मतदारसंघातून शिरोडकर यांना पुन्हा निवडणूक आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाचे महादेव नाईक निवडणूक रिंगणात आहेत. ढवळीकर आणि शिरोडकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात ढवळीकर आणि शिरोडकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार आणि कोपरा सभांवर भर दिला आहे. मतदारांकडून चांगला पाठिंबा लाभत असल्याचा दोघांचा दावा आहे. कॉंग्रेस पक्षात उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाल्याने कॉंग्रेसच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपचे शिरोडकर यांना पाठिंबा दिला आहे.

शिरोडा मतदारसंघात स्थानिक समस्या सोडविण्यावर उमेदवारांकडून प्रचारात भर दिला जात आहे. शिरोडा मतदारसंघात काही भागात पाणी, वीज, रस्ते यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिरोडकर आणि नाईक यांनी या मतदारसंघाचे यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे. ढवळीकर हा या मतदारसंघात नवीन चेहरा आहे.
भाजपला मांद्रे मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दयानंद सोपटे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना विश्‍वासात घेण्यात न आल्याने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर नाराज झालेले आहेत. पार्सेकर यांनी सोपटेंच्या विरोधात दंड थोपटण्याची घोषणा केली होती. परंतु, पार्सेकर यांनी विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले आहे. ही परिस्थिती असली तरी पार्सेकर यांची नाराजी दूर झालेली दिसत नाही. सोपटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पार्सेकर अनुपस्थित होते. तसेच भाजपच्या मांद्रे येथील प्रचारसभेलासुद्धा पार्सेकर अनुपस्थित होते. पार्सेकरांनी भाजपच्या म्हापसा येथील प्रचारसभेत भाग घेतला. परंतु, मांद्रेतील सभेत सहभाग न घेतल्याने चर्चेचा विषय बनलेला आहे. पार्सेकर यांच्या नाराजीचा पोटनिवडणुकीतील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मांद्रे मतदारसंघात भाजपचे सोपटे, कॉंग्रेसचे बाबी बागकर आणि अपक्ष जीत आरोलकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. कॉंग्रेसचे मांद्रेतील सर्व नेते एकत्र आले असून त्यांनी बाबी बागकर यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. जीत आरोलकर याला मगो पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. मांद्रेतीत तिरंगी लढत चुरशीची होणार आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या राजकारणातील घराणेशाहीच्या विरोधात भाजपने आवाज उठविला होता. परंतु, आज भाजपकडून घराणेशाहीला प्रोत्साहन दिले जात आहे. म्हापसा मतदारसंघात गेली कित्येक वर्षे भाजपचे कार्य करणारे सुधीर कांदोळकर यांना डावलून भाजपने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ याला उमेदवारी दिली. यामुळे कांदोळकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत. म्हापसा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आलेले प्रमुख दोघे उमेदवार भाजपमधील असल्याने त्यांच्यात रंगतदार लढत अपेक्षित आहे. कॉंग्रेसचे उमेदवार कांदोळकर यांना मगोपच्या स्थानिक गट समितीने पाठिंबा देऊन प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. म्हापसा मतदारसंघात पाणी, साधनसुविधा, बसस्थानक, रवींद्र भवन हेच प्रचाराचे मुद्दे बनलेले आहेत.
मगो पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मगोपचे नेते ढवळीकर यांच्यावर विविध प्रचारसभांतून आरोप करण्यास सुरुवात केली आहे. ढवळीकर बंधूंकडून भाजपच्या आरोपांना चोख उत्तर दिले जात आहे. शिरोडा मतदारसंघात दीपक ढवळीकर यांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेऊन भाजपने शिरोडा मतदारसंघाकडे जास्त लक्ष केंद्रित करून शिरोडकर यांना प्रचारात जास्तीत जास्त साहाय्य करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेऊन भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी एकाही स्टार प्रचारकाची प्रचारसभा झाली नाही. कॉंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते आपापल्या मतदारसंघात निवडणुकीमध्ये गुंतलेले असल्याने गोव्यात प्रचारासाठी येऊ शकलेले नाहीत. कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात गेले वर्षभर खाणबंदीचा प्रश्‍न गाजत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी खाण अवलंबितांनी अनेकदा धरणे आंदोलन केले. परंतु, खाण प्रश्‍न प्रलंबित आहे. खाणबंदीमुळे आर्थिक व रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. खाण प्रश्‍न सोडविण्याचे अनेकदा आश्‍वासन देऊनसुद्धा तो सुटलेला नाही. खाण पीडितांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.

लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सायलंट मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील मागील दोन वर्षातील एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थिती मतदार पाहत आहेत. राज्यातील विविध घडामोडींबाबत बरेच मतदार आपले मत व्यक्त करीत नाही. मतदार आपल्या मनातील भावना मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करतील, अशी अपेक्षा आहे.