ब्रेकिंग न्यूज़
चिरतरुण सुरेश वाळवे

चिरतरुण सुरेश वाळवे

  •  ज. अ. रेडकरज्येष्ठ पत्रकार व दैनिक नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांच्या वयाला नुकतीच ७० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने उद्या रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या व्हाळशी गावी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने –

१ ऑक्टोबर २०१९ रोजी श्री. सुरेश वाळवे यांनी वयाची ७ दशके पूर्ण केली यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, कारण त्यांनी आपल्या आरोग्याची घेतलेली काळजी हे होय. मध्यंतरी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराची लागण झाली, परंतु त्यावर देखील त्यांनी मात केली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. आजही तेवढ्याच उमेदीने त्यांचा लेखनयज्ञ चालू आहे हे विशेष!
१९७२ ते २००८ हा तीन तपांचा प्रदीर्घ काळ त्यांनी पत्रकारितेत घालवला. सुरवात राष्ट्रमतच्या संपादकीय विभागापासून झाली आणि कारकिर्दीची अखेर नवप्रभा या सुटसुटीत दैनिकाचे संपादक म्हणून! पत्रकारांसाठी तो जिकिरीचा काळ होता, कारण आजच्यासारख्या तंत्रज्ञान आणि साधनसुविधा त्यावेळी नव्हत्या. सत्तरच्या दशकात पत्रकारिता शिक्षणाची सुविधा गोव्यात तरी उपलब्ध नव्हती. आज त्या विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय देशाच्या अनेक विद्यापीठांतून आणि मुक्त विद्यापीठांतून झाली आहे आणि अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत. पत्रकारिता हे ग्लॅमरस क्षेत्र बनले आहे.

सुरेश वाळवे या विशीतील तरुणाने पत्रकारिता हे आपले ध्येय ठरविले आणि त्यात उत्तुंग झेप घेतली. सुरुवातीचा काळ हा त्यांच्यासाठी अग्निपरीक्षेसारखाच होता. शिक्षण आणि दैनिकातील काम ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. १९७५ साली नवप्रभेत रुजू होताना केवळ ११ वर्षांत आपण नवप्रभेचे संपादक होऊ असे त्यांना वाटले देखील नसेल! सर्वश्री द्वा. भ. कर्णिक, शांताराम बोकील, लक्ष्मीदास बोरकर, तुकाराम कोकजे यांच्यासारख्या दिग्गज संपादकांनंतर व्यवस्थापनाने मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी १९८६ साली वाळवे यांच्यावर सोपवली आणि त्यांनी हा विश्वास सार्थ केला. १९८६ ते २००८ या कालखंडात अनेक नवोदितांना त्यांनी लिहिते केले. त्यासाठी अनेक सदरे सुरू केली. या सदरांतून लेखन करणार्‍यांची पुस्तके प्रसिद्ध झाली. आपले दैनिक अधिकाधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय कसे होईल याची दक्षता त्यांनी आपल्या संपादकीय कारकिर्दीत घेतली.
कोणत्याही दैनिकाचा अग्रलेख हा त्याचा आत्मा असतो. नवप्रभा हे दैनिक देखील त्याला अपवाद नव्हते व नाही. श्री. वाळवे यांनी आपल्या चतुरस्त्र अग्रलेखांनी अल्पावधीतच हे दैनिक अधिक लोकप्रिय आणि वाचकप्रिय बनविले.

६ एप्रिल २००८ रोजी वाळवे यांनी आपला निरोपाचा अग्रलेख लिहिला तोपर्यंत कुणाला कल्पनाच नव्हती की ते संपादकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. सळसळत्या उत्साहामुळे ते निवृत्तीच्या वयाचे झाले आहेत असे कुणालाच वाटले नाही. आजही ते ७० वर्षांचे झालेत असे वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्या तब्येतीची घेतलेली काळजी. कदाचित ज्या निसर्गाच्या आणि माणसांच्या सान्निध्यात ते राहतात, त्यामुळे हे चिरतारुण्याचे वरदान त्यांना लाभले असावे ! निवृत्त झाले तरी त्यांनी लेखनकार्याला निरोप दिला नाही. त्यांचे लेखनकार्य चालूच आहे. त्यांनी अशाच उत्साहात आपले नाबाद शतक पूर्ण करावे आणि त्यांच्या चोखंदळ लेखनाचा आस्वाद आम्हा वाचकांना निरंतर घेता यावा!
उद्या रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या व्हाळशी गावातील लोकांनी त्यांच्या वयाच्या सप्तदशकपूर्तीबद्दल सत्कार सोहळा आयोजित केला आहे. श्री. वाळवे यांनी आपल्या निवृत्तीनंतर आपल्या गावासाठी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत, त्याबद्दल हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मग येताय ना, या चिरतरुण मित्राचे अभिष्टचिंतन करायला?

– ज. अ. रेडकर..
सांताक्रुज