चित्रपश्चिमा –भरकटलेल्या मुलाच्या शोधात वयोवृद्ध पिता ‘ऍन ऍपल फ्रॉम पॅराडाइझ’

चित्रपश्चिमा –भरकटलेल्या मुलाच्या शोधात वयोवृद्ध पिता ‘ऍन ऍपल फ्रॉम पॅराडाइझ’

  •  यती लाड

आपल्यालाही गुंतवणारी आणि मन हेलावून टाकणारी ही कथा जरी चित्रपटाच्या माध्यमातून समोर आली असली तरी एका अर्थी आज जगभरातील भरकटलेल्या आणि परतीचा मार्गच हरवून बसलेल्या असंख्य तरुणांचीच ही शोकांतिका आहे.

धर्म ही अफूची गोळी आहे या शब्दांत कार्ल मार्क्स यांनी धर्म या संकल्पनेवर कठोर टीका केली आणि वर्तमान स्थिती पाहता याच धर्म संकल्पनेच्या जोखडात अडकलेल्यांकडून धर्माच्या आधारे कशा पद्धतीने सामाजिक कलह निर्माण केले जातात, याची केवळ आपल्या देशातच नव्हे तर शेजारील आणि पुढारलेल्या देशांतही अनेक उदाहरणे आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती अशा विविध धर्मपंथांमध्ये मानवजात जरी विभागलेली गेली असली, तरी सगळेच धर्म मानवतेचाच संदेश देतात. असे असतानाही इस्लामसारखा धर्म आज जगात वादग्रस्त ठरला आहे!
धर्माचा विपरीत अर्थ लावला जातो तेव्हा त्यातून दहशतवादी रूप कसे धारण केले जाते यावर आधारित चित्रपट आहे, ‘ऍन ऍपल फ्रॉम पॅराडाइझ’.
सन २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा अफगाणी चित्रपट आणि हूमायूँ मोरावत त्याचे लेखक दिग्दर्शक. अफगाणिस्थान भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या आशियाई खंडातील एक ऐतिहासिक महत्वाचा देश. मात्र हा देश कालप्रवाहामध्ये नेहमीच अस्थिर राहिला. त्या देशावर नेहमीच इतर देशांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठी आर्थिक मदत तेथील कट्टरपंथियांना केली. १९७९ मध्ये सोव्हिएत अफगाण युद्धापासून सुरु झालेला अफगाणिस्तानचा हा खडतर प्रवास आजही सरलेला नाही. रशियन गेले आणि अमेरिकन आले एवढाच काय तो फरक झाला.

गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ या देशात युद्धजन्य परिस्थिती कायम असली तरी या देशावर सर्वस्वी अधिकार गाजवणे कुणालाही अद्याप शक्य झालेले नाही. मात्र या परिस्थितीमुळे इथे अतोनात धार्मिक आणि सामाजिक नुकसान झालेले आहे. ही हानी किती अपरिमित आणि भयावह आहे हे दाखवण्यासाठी अर्थातच, चित्रपटाशिवाय दुसरे माध्यम नाही.

‘ऍन ऍपल फ्रॉम पॅराडाइझ’ ही एका आत्मघाती बॉम्बरच्या वयोवृद्ध पित्याची ह्रदयद्रावक कथा. आपला मुलाने इस्लाम धर्माचा अचूक अभ्यास करून धर्मगुरु बनावे अशी पित्याची इच्छा. मात्र एक दिवस त्याला आपला मुलगा मागील तीन दिवसांपासून मदरशात गेलेला नाही याची खबर मिळते. इथूनच सुरू होतो या वयोवृद्ध पित्याचा आपल्या मुलाला शोधण्यासाठीचा प्रवास. दरम्यान, एक धर्मगुरू त्याचे अभिनंदन करतो आणि त्याच्या मुलाचा ‘जन्नत’ प्राप्त होण्यासाठीचा प्रवास सुरु झाल्याचे त्याला सांगतो. संतप्त बनलेला पिता आपल्या या भरकटलेल्या मुलाच्या शोधात काबुलपर्यंत जाऊन धडकतो. सोबत असतात ती त्याच्या मुलाला प्रिय असलेली काही सफरचंदे!
दहशतवादाच्या परतीचा मार्ग नसलेल्या वाटेने निघालेल्या आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पित्याचा प्रवास चित्रित करताना दिग्दर्शकाने अफगाणिस्तानच्या राकट प्रदेशाचे सौंदर्य, संस्कृती आणि तिथल्या सामाजिक समस्याही अत्यंत कलात्मकतेने कॅमेर्‍यात कैद केलेल्या आहेत.

वयोवृद्ध पित्याच्या त्या प्रवासादरम्यान अनेक अडथळेही येतात. मात्र, आपल्या एकुलत्या एक मुलाला शोधण्याची त्याची जबर इच्छाशक्ती कायम असते. पण त्याचे हे प्रयत्न विफल होत जातात, हे त्याच्या झोळीमधून एक एक करून पडणार्‍या सफरचंदांमुळे स्पष्ट होत जाते आणि शेवटी या दुर्दैवी पित्याच्या हाती उरते ते एक कुजके सफरचंद!

आपल्यालाही गुंतवणारी आणि मन हेलावून टाकणारी ही कथा जरी चित्रपटाच्या माध्यमातून समोर आली असली तरी एका अर्थी आज जगभरातील भरकटलेल्या आणि परतीचा मार्गच हरवून बसलेल्या असंख्य तरुणांचीच ही शोकांतिका आहे.
धर्म आपल्याला सन्मार्गाने घेऊन जाण्यासाठी असतो, परंतु त्यातील शिकवणीचा चुकीचा अर्थ लावला गेला, विपर्यास केला गेला, तर चुकीच्या मार्गानेच जाणे होते आणि तेथून परत फिरणे अशक्यप्राय होऊन बसते हेच या कहाणीचे सार आहे. धर्म हा आत्मिक उन्नतीस कारण होतो तसाच तो विनाशासही कारण होऊ शकतो.
येथे आठवतात १९५९ साली प्रदर्शित झालेल्या ‘धूल का फूल’ या चित्रपटातील महंमद रफी यांनी गायलेल्या साहीर लुधियानवी यांच्या ओळी… ‘‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा…’’