ब्रेकिंग न्यूज़

चित्तरकथा मधुबाला, साबू आणि अमिताभची!

  • शंभू भाऊ बांदेकर

दोन-तीन हॉलिवूड चित्रपटांत भूमिका केल्या किंवा तीन-चार नाटकांतून प्रसिद्धी मिळाली की, आकाशाला हात टेकले अशा भावनेने झपाटलेल्या आपल्या कलाकारांपुढे मधुबाला, साबू दस्तगीर आणि अमिताभ बच्चन यांचा आदर्श असला तर तेही आकाशाला गवसणी घालू शकतील. गोव्यात संपन्न होत असलेल्या ‘इफ्फी’च्या निमित्ताने यावर विचार व्हावा..

गोव्यात संपन्न होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी उद्घाटन सोहळ्यात ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांची उपस्थिती काल अत्यंत लक्षणीय ठरली. चित्रपट, मग तो कुठल्याही भाषेतील असो, हे क्षेत्र कलाकारामधील प्रतिभेसाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर कलाकार आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि सततच्या तळमळीने, जिद्दीने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये यशाचे शिखर गाठताना दिसतात. अर्थात हे सर्वांनाच साध्य झालेले आहे असे नाही, पण अपयशावर मात करीत ‘जिएँगे तो और भी लढेंगे|’ या इर्षेने जे पुढे सरसावले ते यशस्वी झाले. त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
अमिताभची पार्श्‍वभूमी सांगण्यापूर्वी एक अभिनेत्री व एक अभिनेता यांची थोडक्यात माहिती देतो. त्यातून नवोदित कलाकारांनाही प्रेरणा मिळू शकते. ही अभिनेत्री आहे मधुबाला. फक्त सौंदर्याच्या शिदोरीवर ती हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायिका बनली. तीही वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी. अताऊल्लाखान पठाण हा मुंबईतील बॉम्बे टॉकीजमध्ये एका सिनेमाचे चित्रीकरण आहे असे समजल्यावर तेथे गेला व प्रवेशद्वारातील खाकी पोशाखातल्या दरवानाला म्हणाला,‘‘ये मेरी बेटी मुमताज. (नंतरची मधुबाला) आज सिनेमाचं शुटिंग चालू आहे ना? त्यात तिला काम मिळेल असं मला कोणीतरी सांगितलं. म्हणून हिला घेऊन आलोय.’’ त्यावर दरवान कडाडला,‘‘कोणीही सोमेगोमे येतात आणि सिनेमात काम शोधतात. ही काय भाजी मंडई आहे? कुणीही यावे, कुणीही जावे? चला चालते व्हा इथून!’’ अताऊलने खूप विनवणी केली, पण तो काही ऐकेना. शेवटी पैशांची लालूच दाखवून तो मुलीसह आत गेला. आत ‘बसंत’ या चित्रपटाचे शुटिंग चालू होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती व निर्माते राय बहादूर चुनीलाल होते. अताऊलने धाडस करीत, मुलीचं घोडं पुढं रेटलं. दिग्दर्शक, निर्मात्यांनी छोट्या मुमताजकडे नजर टाकली. तिचे आकर्षक व लोभस सौंदर्य तिच्याबद्दल खूप काही सांगून गेलं. स्क्रीन टेस्ट वगैरे झाल्यावर तिची निवड झाली. अजाण मुलीचे पालक म्हणून अताऊलनी करारावर सही केली. नऊ वर्षांच्या मुमताजला ‘वसंत’ या चित्रपटातील बालकलाकाराची भूमिका मिळाली आणि महिनाभरातच तो दरवान अताऊलला आणि त्याच्या छोट्या मुलीला सलाम ठोकू लागला. पंधराव्या वर्षी मग अनेक छोट्या मोठ्या चित्रपटांतून ती बेबी मुमताजची मधुबाला बनली आणि नंतर आपल्या सौंदर्याच्या आधाराने ती हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘व्हीनस ऑफ द स्क्रीन’ म्हणजे ‘रुपेरी पडद्यावरची सौंदर्य देवता’ ही उपाधी धारण करत हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायिका बनली.

दुसरे उदाहरण द्यायचे ते म्हणचे साबूचे. हा साबू दस्तगी म्हणजे शेलर शेख साबू. याचा जन्म म्हैसूरजवळील एका भल्यामोठ्या जंगलात १९२४ रोजी झाला आणि तिथंच तो मोठा झाला. त्याचा पिता म्हैसूरच्या महाराजांच्या पदरी असलेल्या अनेक हत्तींपैकी एका हत्तीचा माहूत होता. अशा परिस्थितीत वाढलेला साबू कधीतरी सातासमुद्रापार जाईल, आलिशान महालात राहून तितक्याच आलिशान गाड्यांतून फिरेल हे साबूला किंवा त्याच्या आईवडिलांना सांगितले असते, तर सांगणार्‍यालाही वेड्यात काढले गेले असते. पण तसे झाले मात्र खरे. काय झाले बरे? साबू वयाच्या दहाव्या वर्षीच पित्याच्या हाताखाली काम करण्यासाठी म्हैसूरच्या राजवाड्यावर गेला. जेवणखाण, वर्षाकाठी दोन कपड्यांचे जोड आणि रोजचा एक रुपया पगार एवढ्यावर त्याने पित्याच्या हाताखाली किरकोळ कामे करायची असे या नोकरीचे स्वरुप होते. त्यात साबू व त्याचा पिताही खूष होता. साबूने इमाने इतबारे काम करत तीन चार महिन्यांतच हत्तींना हाताळायचे कसब आत्मसात केले. ते १९३७ साल होते. माहितीपट काढणार्‍या एका ब्रिटीश फिल्म कंपनीचे काही लोक म्हैसूरमध्ये आले होते. त्यांचा प्रमुख होता रॉबर्ट फ्लो हार्टी. हत्तीच्या जीवनावर ते एक माहितीपट तयार करत होते. त्यावेळी पित्याच्या मदतीने हत्तीला उत्तमप्रकारे हाताळणार्‍या साबूने त्यांचे लक्ष वेधून घेतले. रॉबर्टने साबूची माहुतगिरी पाहिली आणि तो प्रभावीत झाला. त्याला चित्रपटात काम करण्यासाठी अमेरिकेत नेण्याची इच्छा त्याने प्रकट केली. पण आपल्या छोट्या मुलाला सातासमुद्रापार पाठवण्यास साबूचा पिता तयार होईना. शेवटी म्हैसूरच्या राजाने त्याची समजून काढली व साबू परदेशात गेला व वयाच्या फक्त १३ व्या वर्षी तो ‘एलिफंट बॉय’ या चित्रपटात चमकला. हा चित्रपट इतका गाजला की साबूचे नाव हॉलिवूडमध्ये गाजू लागले व नंतर १९३८ साली ‘दी ड्रम’ नावाचा जंगलपट व १९४० साली ‘दी थीफ ऑफ बगदाद’ या चित्रपटांत साबूला उत्तम भूमिका मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याची कीर्ती अमेरिकेत इतकी झाली की, १९४४ साली वीस वर्षांच्या साबूला अमेरिकेने सन्माननीय नागरिकत्व बहाल केले. एव्हाना त्याच्या चित्रपटात काम केलेल्या भूमिका सर्वतोमुखी झाल्या होत्या. मग त्याने १९४८ साली वयाच्या चोविसाव्या वर्षी मर्लिन कूपर या गौरकाय अभिनेत्रीशी प्रेमविवाह केला व तो तिथेच स्थायिक झाला. दैवाने साथ दिली व आपण आपली कला जिद्दीने, तळमळीने जोपासली तर रावाचा रंक करता येतो, त्याचे उदाहरण म्हणून आपण साबू दस्तगीर म्हणजे शेलर शेख साबू यांच्याकडे बोट दाखवू शकतो.

शहेनशहा अमिताभ बच्चनची गोष्ट तर न्यारीच आहे. के. ए. अब्बास म्हणजेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास. सतत नावीन्याचा शोध घेणारे सृजनशील लेखक आणि पत्रकारही म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी ‘सात हिंदुस्थानी’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यांना सात हिंदुस्थानीच्या भूमिकेसाठी विविध प्रकारचे कलावंत हवे होते. त्यात अमिताभ बच्चन यांचाही बायोडाटा होता. अमिताभचे पिताश्री हरिवंशराय बच्चन हे त्या काळात गाजत असलेले हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते. ते व अब्बास साहित्यामुळे एकमेकांना परिचित होते. थोड्याशाच कुतूहलाने अब्बासनी हरिवंशरायपुत्र अमिताभला स्क्रीन टेस्टसाठी बोलावून घेतले. राजकपूरचा लाडका कॅमेरामॅन मुकादम हा मराठी माणूस. त्याला अब्बासनी अमिताभची स्क्रीन टेस्ट घेण्यास सांगितले. मुकादमनी स्क्रीन टेस्ट घेतली आणि म्हणाले,‘‘या कुठल्या पोराला बोलावलंत तुम्ही? ताडमाड उंचीचा, सुमार रुपाचा आणि काहीसा ओबडधोबड माणूस. हा अजिबात फोटोजेनिक नाही. ही इज टोटल फेल्युअर.’’ अब्बासनी ते फोटो पाहिले. मुकादम जे बोलले ते चुकीचे आहे असे त्यांना वाटले नाही. मग समजावणीच्या सुरात म्हणाले,‘‘हे बघ दोस्त, नसेना का हा मुलगा फोटोजेनिक, आपण आपल्या ‘सात हिंदुस्थानी’त त्याला सातव्या हिंदुस्थानीची भूमिका देऊ. अरे बाबा, पोर मोठ्या माणसाचा- महाकवीचा बेटा आहे तो. त्याला नको म्हणणे बरे वाटत नाही.’’ अशा तर्‍हेने अब्बासनी अमिताभची निवड केली. काय नशिबाचा खेळ आहे बघा. किरकोळ यश मिळाले तरी आकाशाला हात टेकले अशा भावनेने झपाटलेल्या आपल्या कलाकारांपुढे मधुबाला, साबू दस्तगीर आणि अमिताभ बच्चन यांचा आदर्श असला तर तेही आकाशाला गवसणी घालू शकतील.