चार हजार लिटर दूध पर्वरीतील रस्त्यावर ओतले

चार हजार लिटर दूध पर्वरीतील रस्त्यावर ओतले

>> सुमूलच्या निषेधार्थ उत्पादकांची कृती

सुमूलने दूध नाकारल्याने संतप्त बनलेल्या साळ-डिचोली येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी काल गोवा विधानसभेवर आणलेला मोर्चा पर्वरी येथील पोलीस स्थानकाजवळ अडविण्यात आला. यावेळी दूध उत्पादकांनी सुमुल कंपनी आणि सरकारचा निषेध करून सोबत आणलेले हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत सुमूलचे अधिकारी, पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी आणि दूध उत्पादक शेतकरी यांची बैठक मंगळवारी बोलावली आहे.

सुमूलने केलेल्या दुधाच्या तपासणीमध्ये दुधाचा दर्जा योग्य नसल्याचे आढळून आल्याने सुमूलने दूध स्वीकारण्यास नकार दिला. सुमूलने सुमारे ४ हजार लीटर दूध स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकरी अडचणीत आले. सुमूलने केलेल्या दुधाच्या तपासणीबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दिली.
दूध रस्त्यावर ओतून शेतकर्‍यांचे नुकसान करण्यात आले आहे. हा प्रश्‍न योग्य पद्धतीने मांडायला हवा होता. मंगळवारी होणार्‍या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. शेतकर्‍यांना दीड वर्षाचा बोनस देण्यात आलेला नाही यावर बोलताना सदर बाब यापूर्वी कुणीही आमच्या निदर्शनास आणून दिलेली नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. साळ, डिचोली येथील शेतकर्‍यांच्या दुधाचा दर्जा योग्य नसल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यांना ९ जुलै रोजी पत्र पाठवून याबाबत माहिती देण्यात आली होती, अशी माहिती सुमूलचे अधिकारी उत्कल दुबे यांनी दिली.