ब्रेकिंग न्यूज़

चापेकरांचे ‘स्मृतिधन’

  •  माधव बोरकार

‘स्मृतिधन’ हे निखळ आत्मचरित्र नाही. तो मराठी रंगभूमीच्या चढ-उतारांचा इतिहास आहे. खरं आत्मचरित्र प्रांजळाच्या आरशासारखं असतं. म्हणूनच १९६६ साली प्रसिद्ध झालेलं हे आठवणीचं पुस्तक आजही नवीन वाटतं.

मराठी साहित्यातली काही पुस्तके आता दुर्मीळ होत चालली आहेत. त्यात महामहोपाध्याय पां. वा. काणे यांचे ‘युरोपचे प्रवासवर्णन’ किंवा नानासाहेब चापेकर यांचे ‘स्मृतिधन’- यांच्या आठवणींच्या पुस्तकांचा समावेश होतो. या पुस्तकांची नवीन आवृत्ती प्रसिद्ध होण्याची शक्यता दिसत नाही. ‘स्मृतिधन’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै १९६६ साली प्रसिद्ध झाली. याचा अर्थ, हे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेलं पन्नासपेक्षा जास्त वर्षं उलटून गेलेलं पुस्तक आहे.

आपल्याकडील नटांना आपले अनुभव लिहून ठेवायची सवय नाही. ऍलन होनेट या ब्रिटिश नटाची रोजनिशी वाचनीय आहे. पण आपल्याकडेही हे चित्र पालटताना दिसते. चापेकरांच्या काळात चिंतामणराव कोल्हटकरसारखे अपवाद आढळतात. नटवर्य नानासाहेब फाटक रोजनिशी लिहीत असत. आज मात्र फार मोठ्या प्रमाणात अशी आत्मचरित्रं लिहिली जात आहेत. डॉ. लागू, विजया मेहता यांनी लिहिलेली आत्मचरित्रं उल्लेखनीय आहेत. जुन्या काळातल्या या नटांनी लिहिलेल्या रोजनिशा त्या काळाचे दर्शन घडवणार्‍या ठरू शकतात. तसाच त्यांचा पत्रव्यवहारही. ‘विश्रब्ध शारदा’ हा ह. वि. मोटे यांनी संपादित केलेला रंगभूमीविषयीच्या पत्रांचा दुसरा खंड म्हणजे मराठी रंगभूमीचा इतिहास आहे.

‘स्मृतिधन’ हे नानासाहेब चापेकरांच्या आठवणीचे पुस्तक. शंकर नीळकंठ चापेकर म्हणजेच नानासाहेब. त्यांचे शंकर हे पाळण्यातले नाव विस्मृतीत जाऊन नाना हीच त्यांची ओळख झाली. खरं म्हणजे, गेल्या शतकाच्या सुरुवातीला काही सुशिक्षित तरुण नाट्य व्यवसायाकडे वळू लागले होते. त्या काळात अनेक कारणांमुळे या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती. अस्थिरता, व्यसनं अशी अनेक कारणं त्यामागे होती. नानासाहेबांकडे रूप होते व त्यापेक्षाही ते उच्चशिक्षित होते. अशा व्यक्ती या नाट्य व्यवसायात आल्यास या व्यवसायासही आपोआप प्रतिष्ठा येईल असं नाटक कंपनीच्या मालकाला वाटायचे. त्यामुळे केशवराव भोसले अशा नटांच्या शोधात असायचे. स्वतः ते फारसे काही शिकलेले नव्हते. त्याबद्दल केशवरावाना एक प्रकारचा न्यूनगंड होता.
एक नट म्हणून नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला तो केशवरावानी. अभिनय व गाणे या गोष्टीतल्या खुब्या त्यांनी चापेकरांना समजावून दिल्या. स्त्रीभूमिका करताना पोषक असे वातावरण त्यानी निर्माण केले. अधूनमधून दोघांमध्ये समज-गैरसमजाचे धुके दाटून यायचे; पण ते तात्पुरते. बालगंधर्व व केशवराव यांनी केलेले संयुक्त ‘मानापमाना’चे प्रयोग याविषयीच्या आठवणी ते सांगतात व त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतात. त्यानंतर त्यांच्या नाटक कंपनीची झालेली फाटाफूट याचा इतिहास वाचकांसमोर ठेवतात. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, हेवेदावे व अहंकार यामुळे अनेक नाटक कंपन्या फुटल्या अथवा रसातळाला गेल्या हा इतिहास ‘स्मृतिधन’ वाचताना आपल्या लक्षात येतो. त्यात पुन्हा बेहिशेबीपणा. कंपनीच्या व्यवस्थापकावर विश्‍वास टाकल्यामुळे अनेक मालक गोत्यात आले, हा नानासाहेबांचाही स्वानुभव दिसतो. नट असलेला कंपनीचा मालक असणे आणि या दोघामध्ये समतोल साधणे ही मोठी जिकिरीची गोष्ट असते. खुद्द नानासाहेबांना ते स्वतः उच्चशिक्षित असूनही कलेची व्यवहाराशी सांगड घालता आली नाही. यामुळेच जप्तीसारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं. गोव्याच्या दौर्‍यात दोन ऑर्गन्स कर्जाला तारण ठेवावे लागले. उत्पन्नाच्या तुलनेने खर्च जास्त ही परिस्थिती.
त्या काळात संस्थानं होती व काही राजे-महाराजांना कलेची आवड होती. त्यांच्या उदार आश्रयावर काही कंपन्या चालायच्या. पण हे सगळं त्यांच्या लहरीवर अवलंबून असे. याचा भरपूर अनुभव चापेकरांनी घेतला. त्यामुळे राजाश्रयापेक्षा लोकाश्रय हा कधीही चांगला असे त्याना वाटू लागले.

जो अस्सल नाटकवाला असतो तो अन्य व्यवसायात रमू शकत नाही. पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी चापेकरांना नोकरी करणं प्राप्त झालं. त्या काळात आकाशवाणीसारखं माध्यम देशात मूळ धरू पाहत होतं. त्याना मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नोकरी मिळाली व काही का होईना, निश्‍चित उत्पन्नाची सोय झाली. बा. सी. मर्ढेकर तेव्हा तिथे अधिकारी होते. पुढे दिल्लीच्या वृत्तविभागातही काही काळ मराठीतून बातम्या देण्याचे काम त्यांनी केले. या नोकरीत मात्र ते रमले.
आत्मकथन म्हणजे आयुष्याच्या अनुभवाचा लेखाजोगा नसतो. ‘स्मृतिधन’ हे निखळ आत्मचरित्र नाही. तो मराठी रंगभूमीच्या चढ-उतारांचा इतिहास आहे. म्हणून ते वाचावंसं वाटतं. खरं आत्मचरित्र प्रांजळाच्या आरशासारखं असतं. म्हणूनच १९६६ साली प्रसिद्ध झालेलं हे आठवणीचं पुस्तक आजही नवीन वाटतं. चापेकरांना अलंकारिक भाषाशैलीचा सोस नाही. आत्मकथनाची ती जमेची बाजू असते. चार्ली चॅपलीन किंवा इझाडोरा डंकन यांची आत्मचरित्रं त्याचमुळे वाचावीशी वाटतात. ‘स्मृतिधन’साठी चापेकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला हा त्यांचा लेखक व नट म्हणून उचित सन्मान झाला असं म्हटलं पाहिजे.