ब्रेकिंग न्यूज़

चर्चिलवरील विजयासह धेंपो पुन्हा टॉपवर

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने चर्चिल ब्रदर्सवर काल रविवारी ३-२ असा निसटता विजय मिळवक गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील सामन्यात पूर्ण तीन गुणांची कमाई केली. उतोर्डा येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. धेंपोने या विजयासह गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. या विजयानंतर त्यांचे २१ लढतींतून ५१ गुण झाले आहेत. गोवन एफसी व त्यांचे समान गुण असले तरी सरस गोलसरासरीवर ‘गोल्डन ईगल्स’ंम्हणून सुपरिचित धेंपोचा संघ अव्वल आहे. धेंपोचा संघ जेतेपदाचा अजूनही प्रबळ दावेदार असून शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना गोवन एफसी संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. गोवन एफसीला धेंपोव्यतिरिक्त स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाशीदेखील सामना खेळावा लागणार आहे.

पराभवामुळे चर्चिल ब्रदर्सचे २१ सामन्यांतून ३९ गुण कायम आहेत. स्पोर्टिंग क्लब दी गोवाविरुद्ध ते आपला अखेरचा सामना खेळतील.
काल झालेल्या लढतीत धेंपोचा २० वर्षांखालील खेळाडू फ्लॉईडने हवेतून दिलेल्या पासवर ज्योकिमने दाबा मिळवत गोल करताना ४८व्या मिनिटाला धेंपोला आघाडीवर नेले. लामगुलेम याने ६८व्या मिनिटाला चर्चिलला बरोबरी साधून दिली. बरोबरीमुळे जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागणार हे ध्यानात ठेवून धेंपोने सामन्याचा वेग वाढवला. सूरज हडकोणकरने घेतलेल्या कॉर्नर किकवर अब्रांचिसने लगावलेला हेडर पेद्रो गोन्साल्विसला चाटून चर्चिलच्या गोलजाळीत विसावल्याने धेंपोने २-१ अशी आघाडी घेतली. बदली खेळाडू क्लेन्सियो पिंटो याने दिलेल्या अचूक पासवर उत्तमने ८०व्या मिनिटाला गोल करत चर्चिलला पुन्हा बरोबरीत आणले. धेंपोचा संघ शर्यतीच्या रेसमधून बाहेर जाण्याची चिन्हे दिसत असताना ८८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर सूरजने गोलजाळीचा वेध घेत धेंपोला विजयी केले.