ब्रेकिंग न्यूज़
चमत्कार निसर्गाचा

चमत्कार निसर्गाचा

आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. शरद पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा अशा अनेक नावांनी तिला सगळे ओळखतात.
आश्विन पौर्णिमेस होणार्‍या प्राचीन लोकोत्सवास वासायनाने ‘कौमुदी जागर’ व वामन पुराणाने ‘दीपदान जागर’ म्हटले आहे. बौद्ध काळातही हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत असे. त्याचे वर्णन ‘उन्मादपंती’ जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे.
या दिवशीच्या व्रतात, रात्री लक्ष्मीची व म्हशीवर बसलेल्या बळीराजाची पूजा करतात. मग दोघांना पुष्पांजली अर्पण करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी, आप्तेष्टांना देऊन, स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसर्‍या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून, सर्वांना भोजन घालून पारणं करतात. या व्रतात उपोषण-जन-जागरण या तीनही अंगांना सारखेच महत्त्व आहे. या रात्री जितके दिवे लावावे तितके कल्प मानवाला सूर्यलोकात प्रतिष्ठा मिळते, असे शास्त्र सांगते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे?’ असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. ‘को जागर्ति’चा खरा अर्थ केवळ ‘कोण जागत आहे’ असा नसून ‘आपल्या कर्तव्याप्रति कोण जागृत आहे?’ असाही होतो.
ब्रह्मपुराणात या व्रताची थोडी निराळी कृत्ये सांगितली आहेत. रस्ते झाडावेत, घरे सुशोभित करावीत, दिवसा उपास करावा, गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, चंद्राची पूजा करून दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र – स्कंद – नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणार्‍यांनी वरुण, हत्ती बाळगणार्‍यांनी विनायक व घोडे बाळगणार्‍यांनी रेवत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. या रात्री ज्येष्ठ अपत्यास औक्षण करण्याची प्रथाही प्रचलित आहे. यास ‘अश्विनी’ साजरी करणे, असेही म्हणतात.
या दिवशी दूध आटवून त्यांत केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधांत मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग प्रसाद म्हणून ते दूध प्राशन करतात.
आश्‍विन महिन्यात केल्या जाणार्‍या कोजागिरीस एक व्रतकथा आहे. पुराणातल्या या कथेत असे सांगितले आहे की एकदा एका सावकारास दोन कन्या होत्या. दोघी जणी कोजागिरी व्रत करायच्या. परंतु ज्येष्ठ कन्या, ते व्रत पारायणापर्यंत संपूर्णपणे करायची व कनिष्ठ कन्या व्रतपूजेस अर्ध्यातच सोडून द्यायची. त्यापायी असे झाले की लग्नानंतर कनिष्ठ कन्येला मूल झाल्याबरोबर दगावू लागलं. तिनं ज्योतिष्यांना विचारून कोजागिरी व्रत पूर्ण केले. त्यानंतर तिला पुत्रप्राप्ती झाली. पण काही दिवसातच त्याचाही मृत्यू झाला. कन्येनं एक युक्ती केली. त्याला ओट्यावर निजवून त्यावर एक शुभ्र वस्त्र पांघरलं व ज्येष्ठ भगिनीस बोलावलं. बहीण नेमकी ओट्यावरच बसायला गेली. तिच्या वस्त्राचा स्पर्श होताच, मूल जिवंत झाले व रडू लागले. बहीण घाबरली व धाकट्या बहिणीस बोल लावू लागली- ‘‘तू मला ह्याच्यावर बसायला लावून ह्याची खुनी म्हणून कलंकित करणार होतीस?’’ तेव्हा धाकटीने उत्तर दिले- ‘नाही ग, हा तर आधीच मृत होता उलट तुझ्या स्पर्शाने तो जिवंत झालाय.’ तेव्हापासून धाकटी हे व्रत पूर्णत्वाने करू लागली.
कृषी संस्कृतीत या दिवसाला फार महत्त्व आहे. तसेच आश्‍विन महिन्यांत पावसाळा संपून आकाश निरभ्र होते. अशावेळी इष्टमित्रांसह चांदण्या रात्रीची मौज लुटता यावी म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा.
प्रत्येक प्रांतात, कोजागिरी वेगवेगळ्या रीतींनी साजरी होते. गुजरातमध्ये रास व गरबा खेळून, शरद-पूनम नावाने कोजागिरी साजरी होते. बंगाली लोक याला लोख्खि पूजा म्हणतात व लक्ष्मीपूजन करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकर्‍यांना शर्करायुक्त दूध देतात. हरयाणामध्ये आश्‍विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.
हिरकणीच्या साहसाची कथाही कोजागिरी पौर्णिमेलाच घडल्याची बखरीत नोंद आहे. संध्याकाळी पौर्णिमेलाच गडाचे दरवाजे बंद झाल्यावर दुधाचे रतीब घालायला गडावर आलेली हिरकणी, तिथेच अडकून पडते. पहारेकर्‍यांच्या हातापाया पडूनदेखील ते गडाचे दरवाजे क्षणभराकरताही उघडत नाहीत. तान्हुला भुकेनं कासावीस झाला असेल असा विचार मनात आल्याबरोबर, तिच्यातली आई जागी होते. दूध वाटपाकरता गडावर नेहमीच फिरल्यामुळे, तिला सगळे बुरूज, सगळ्या वाटा पाठ झालेल्या असतात. तान्हुल्याच्या ओढीनं ती पदर खोचते व सरळ बुरूज उतरायला सुरुवात करते. अत्यंत अवघड चढणीचा तो बुरूज उतरायलादेखील तितकाच अवघड असतो. कोजागिरीच्या स्वच्छ प्रकाशात हिंमत करून ती तो उतरते. दुसर्‍या दिवशी शिवरायांना ही कहाणी कळताच ते तिचा यथोचित सन्मान तर करतातच, पण त्या बुरुजालाही नाव देतात – ‘हिरकणी बुरूज!’
लंकाधिपती रावण, शरद पौर्णिमेच्या रात्री, आरशाच्या साहाय्याने चंद्राच्या किरणांना आपल्या नाभीवर प्रतिबिंबित करायचा. त्यामुळे त्याला पुनर्यौवन प्राप्त व्हायचे. अशीही एक दंतकथा आहे.
कोजागिरी पौर्णिमेचा प्रसाद म्हणजे आटीव दूध किंवा पायस (तांदळाची खीर) चंद्राच्या चांदण्यात ठेवण्याचा प्रघात आहे. विज्ञान सांगतं की दुधात लॅक्टिक अम्ल व अमृततत्त्व असतं. हे तत्त्व चांदण्यातून जास्तीत जास्त शक्तीला शोषून घेतं. चांदीच्या पात्रात जर हे दूध वा खीर बनवली तर ते जास्तच पौष्टिक बनतं. चांदीत प्रतिरोधिता जास्त असते. त्यापासून विषाणू दूर राहतात. वर्षातून एकदा येणारी शरद पौर्णिमा दम्याचा त्रास असलेल्यांकरतादेखील खास वरदान घेऊन येते. चांदण्यात ठेवलेल्या आटीव दुधात दम्याचे औषध घेतल्यास फार फायदेशीर ठरते. हे औषध घेण्यापूर्वी रोग्याने कमीत कमी तीस मिनिटे, चांदणे अंगावर घ्यायला हवे. रात्री १० ते १२ पर्यंतची वेळ औषध घेण्यास उपयुक्त अशी सांगितलेली आहे. उत्तम परिणामकारक अशी ती वेळ ठरते. मात्र असे औषध घेतल्यावर रोग्याने कमीत कमी दोन-तीन मैल चालणे अपरिहार्य ठरते.
माझ्या लहानपणी कोजागिरीची सांगड फक्त आटीव दुधाशी नव्हती. उघड्या खुल्या मैदानात, एक-से बढकर एक कलाकारांच्या मैफली झडायच्या तेव्हा. अगदी परवीन सुलताना, बेगम अख्तर पासून ते भीमसेन, कुमार, प्रभा अत्रे, गंगुबाई हनगलपर्यंत सर्व… मी लहान वयातच मनसोक्त ऐकलेत. गाण्यातलं काहीही कळत नव्हतं त्या वयापासून! लाईव्ह गीतरामायणाचा थरार, आटीव दुधाला जास्त माधुरी आणतो की लीला गांधींचं संपूर्ण स्टेज गदागदा हलवून टाकणारं लावणी नृत्य की सुलोचना चव्हाणजींच्या रांगडी आवाजातलं नखरेबाज लावणीगायन त्या दुधाला जास्त चटकदार करतं. अशा पैजा लागायच्या. कळत्या नकळत्या वयात कोजागिरीचं गारूड मनावर खूप खोलवर परिणाम करून गेलं.
कोजागिरी शिकवते मनुष्याला – की उत्तमातल्या उत्तमालाच निवडा. ज्ञानेश्‍वर माऊली ही ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायात २३१ व्या ओवीत शब्द विपर्याचे निमित्त घेत, जन माऊलीला सांगतात-
‘‘सकर्दमु, सरोवरू, अवलोकुनिया चकोरु,
करुनी अव्हेर – निघोनी जाये….’’
माऊली म्हणतात- ‘‘चकोर व्हा… चांदण्यातल्या अमृताचा भोक्ता … रसोवरु म्हणजे श्रेष्ठ चांदणं … त्या रसोवरुचा विपर्यय करून ‘सरोवरु’ केलंय. सकर्दम म्हणजे चिखलयुक्त नव्हे. चिखलासारखा लडबडलेला, धुळवडलेला म्हणजे धूसर. अशा त्या धूसर चांदण्याला नाकारून (त्यांत अमृतकण न मिळाल्याने) चकोर ते नाकारून निघून गेला. त्या चकोराप्रमाणे तुम्ही उत्तम त्याच गोष्टींचा ध्यास घ्या. (इतर पौर्णिमांच्या चांदण्याला न भुलता, केवळ कोजागिरीच्या चांदण्यात विरघळून जा. इतकी ह्या कोजागिरीची अमूल्य महत्ता आहे. कोणी कवी, त्या पूर्णचंद्राला बघून म्हणतोच-
‘‘वाटे मनास जेव्हा, घ्यावा जरा विसावा,
खिडकीतूनी समोरी, शशी हांसरा दिसावा.
आभाळ तारकांचे, खाली झुकून यावे
ओढाळ आठवांचे – जमती मनांत रावे
ही रात्र धुंद वेडी, गंधात चिंब व्हावी,
स्वप्नातल्या सुखांना, तेव्हाच जाग यावी….’’
नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेली ही सुगंधी पौर्णिमा, जिवाभावाच्या सर्व आप्तेष्टांना एकत्र आणते.