अभ्यंग, व्यायामाने घालवा पाठदुखी- कंबरदुखी 

–  डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी, म्हापसा)
नव्वद टक्के पाठदुखीवर शस्त्रक्रिया व औषधांचा उपयोग अल्प असतो अन् ती व्यायामानेच बरी होते असा अभ्यासाअंती निघालेला निष्कर्ष आहे. पाठदुखीवर फक्त शारीरिक व्यायाम अंतर्भूत नसून बौद्धिक- मानसिक व्यायामही महत्त्वाचे आहेत. म्हणून या विकारात ‘परिपूर्ण उपचारपद्धती’ म्हणून ‘भारतीय योगविद्ये’चा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. 
शरीर व धातु अतिशय रुक्ष- सुकलेले- निर्जीव असताना स्नेहन, अभ्यंग केल्यास पुन्हा पुष्ट होतात व प्राणवर्धन होऊन बल व अग्नी वाढतो.
जसे वाळलेल्या लाकडाला तेल- पाणी मिळाल्यास ते हवे तसे वाकवता येते. कातडे कमावताना वा टिकवून ठेवण्यासाठी तेलच कातड्यात जिरवावे लागते. घर्षण असणार्‍या ठिकाणी वंगण म्हणून तेलच वापरावे लागते.
कंबरदुखी व पाठदुखीचा त्रास हा कधी ना कधी तरी सगळ्यांनाच होतो. काही जणांकडे दिवाळसणाला येणार्‍या पाहुण्यासारखा येतो व जातो व काहींकडे मात्र दीर्घकाळ मुक्काम ठोकतो. तसेच दुखणे सहन करत आयुष्य घालविणारीही काही कमी नाहीत. खरं तर साध्या सोप्या उपायांनीही कंबरदुखी किंवा पाठदुखीवर आपण मात करु शकतो.
कंबरदुखी व पाठदुखी का व कशी होते हे समजून घेण्यापूर्वी कंबरेची आणि पाठीची रचना कशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पाठ म्हणजे स्नायूंची एक भक्कम भिंत आहे. तिच्यामध्ये ‘कणा’ असे आपण ज्याला म्हणतो ती ३३ मणक्यांची माळ आहे. या मणक्यांमधूनच मेंदूकडून आदेश घेणार्‍या जाणार्‍या मज्जारज्जूंचा गोफ कंबरेपर्यंत आलेला असतो. प्रत्येक मणक्यातून यातील काही मज्जारज्जू बाहेर पडून शरीराच्या त्या-त्या भागातील क्रियांचे नियंत्रण करतात. कंबरेतून हे मज्जारज्जू दोन्ही बाजूंनी पायात शिरतात व त्याचेही नियंत्रण करतात. ३३ मणक्यांच्या या माळेचा आकार इंग्रजी एस(ी) या आकड्यासारखा असतो वर मानेत बाक, खाली कंबरेजवळ बाक व मधोमध सरळ अशी साधारणपणे ही रचना असते.
प्रत्येक मणका हा एखाद्या ठोकळ्याप्रमाणे असतो. हे मणके हाडाचे बनलेले असतात दोन मणक्यांच्या मध्ये कूर्चा(डिस्क) असते. ही कूर्चा गादीसारखी पण लवचिक असते. त्यामुळे काणत्याही हालचाली करताना मणक्यांना बसणारे धक्के कूर्चा शोषून घेतात आणि दोन मणक्यात घर्षण होऊ देत नाहीत. थोडक्यात या कूर्चा शॉक ऍब्सॉर्वरचे काम करतात. कूर्चाचा बाहेरचा भाग टणक आणि वर्तुळाकार असतो. आतील जेलीप्रमाणे असणार्‍या पदार्थाभोवती गोलाकर संरक्षक कडे असते. कुर्चेमध्ये ९० टक्के भाग पाण्याचा असतो, तर उरलेल्या भागात लवचिक धाग्यांची गूंफण असते.
दोन मणक्यांमधील ही कूर्चा सरकू नये म्हणून तिला मागून व पुढून अनुबंधाचे संरक्षण असते. कूर्चा रात्री शरीरातून पाणी शोषून घेतात. दिवसभरात प्रत्येक हालचालीबरोबर येथील पाण्याचा अंश वापरल्या जातो.
मणक्याच्या मागच्या बाजूला मज्जारज्जू जाण्यासाठी एक पोकळी असते. प्रत्येक मणका एकमेकाला सांधा, अस्थिबंध, लिगामेंट आणि स्नायू यांनी जोडलेला असतो. त्यामुळे त्याला एकीकडे स्थिरता येते. पण विशिष्ट रचनेमुळे हालचालींसाठी आवश्यक असणारी लवचिकताही मिळते. कंबर हा भाग पाच मणक्यांचा मिळून बनलेला असतो. तेथूनच मज्जाकरज्जू व अन्य स्नायू पायांकडे जातात. पायात जाणार्‍या नसांमध्ये सायटीका नावाची नस अत्यंत महत्त्वाची असते. या नसेवर दबाव आल्यास ‘सायटीका’ हा आजार होऊ शकतो.
पाठ व कंबरदुखीची कारणे –
प्रत्यक्ष कारणे – जन्मतः सदोष मणके
– जंतूंचा प्रादुर्भाव उदा. पोलिओ, टीबी.
– अपघातात मणके तुटल्याने किंवा सरकल्याने
– विविध प्रकारच्या कॅन्सरमध्ये मणक्यांना पोचणार्‍या इजेमुळे
– वयोमानानुसार मणक्यांची होणारी झीज व बदल.
– लहानपणी ‘ड’ जीवनसत्व, कॅल्शिअम यांची कमतरता
– विविध प्रकारचे ताणतणाव, धक्के यामुळे कूर्चा खुंटणे.
अप्रत्यक्ष कारणे – बसण्याची, उभे राहण्याची आणि वाकण्याची चुकीची पद्धत.
– व्यायामाचा अभाव.
– जास्त वजन उचलणे
– व्यावसायिक कामामुळे जास्त वजन वाढणे
– नैराश्य, मानसिक तणाव, व्यावसायिक तणाव.
– एच.आय.व्ही.चा प्रादुर्भाव.
वरीलपैसी कोणत्याही कारणांमुळे कंबरदुखी वा पाठदुखी सुरू झाली तर खालील लक्षणे दिसतात.
– वेदना
– पायात जडपणा, बधीरपणा
– मुंग्या येणे
– दाह होणे
– स्नायुत कमकुवतपणा येतो
– पाठीत पोक येणे
– कमरेत व पाठीत काठीण्य
– शरीर एका बाजूला कलणे
– लघवी व शौचावर नियंत्रण न राहणे
हे किंवा या पद्धतीचा त्रास जाणवायला लागल्यास आपले दुखणे गंभीर आहे, हे लक्षात घेऊन तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.
उपचार
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ८० टक्के लोकांना होणारी कंबरदुखी व पाठदुखी तात्पुरत्या स्वरुपाची असते. त्या त्या वेळेला घडलेल्या घटना, वेड्यावाकड्या हालचाली, धक्के यामुळे ती सुरु होते आणि पुरेशी विश्रांती, मर्यादित हालचाली वेदनाशामक औषधे यामुळे ती बरी होते.
व्यायामात सातत्य असेल तर ती लवकर बरी होते वा पुन्हा उद्भवत नाही.
पंधरा टक्के दुखणी गंभीर स्वरुपाची असतात. त्यावरही बहुतेक वेळा साध्या उपचारांनी नियंत्रण ठेवता येते. यात बसण्याच्या, उभे राहण्याच्या, वाकण्याच्या चुकीच्या पद्धती बदलणे, वजन कमी करणे, मानसिक तणावातून दुखणे उद्भवले असेल तर तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करणे (स्ट्रेस मॅनेजमेंट), मसाज, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर यांचाही चांगला उपयोग होतो.
योगासने व विशिष्ट व्यायाम या उपचारात सर्वात महत्वाचे असतात.
या दुखण्यामध्ये औषधांचा उपयोग जास्त वेदना, दाह असतानाच होतो. दीर्घकाळ औषधांचा मारा शरीरावर करणे योग्य नाही व आवश्यकही नाही.
जर रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नाही किंवा खूप गुंतागुंत असेल तर अशा वेळी शस्त्रक्रिया करणे एवढाच एक मार्ग शिल्लक राहतो.
सरकलेली कूर्चा, कालवा अरुंद होणे, मणक्यांची अस्थिरता, क्षयरोग इत्यादी रोगांमुळे निर्माण झालेला दबाव.. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.
आयुर्वेदशास्त्रामध्ये मात्र वेदना शमनासाठी ‘अभ्यंग’ या उपक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेला अभ्यंग म्हणजे बोली व्यावहारिक भाषेत मसाज म्हणायला हरकत नाही. या क्रियेत मर्दन, संवाहन, उत्तादन, अब्यंग या सर्व क्रियांचा समावेश करावा लागतो.
अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराला तेल लावून आत जिरवणे व या बाह्य स्नेहनाबरोबरच स्नायू, संधी, नाडी संतुलनास मदत करते. तसेच गरजेप्रमाणे पादाभ्यंग, शिरोभ्यंग, कुंडलिनी मसाज असे अभ्यंगाचे प्रकार उपयोगात आणणे.
– उत्तादन म्हणजे पायांनी केलेली मर्दन क्रिया.
– संवाहन म्हणजे सर्वांगास मर्दन
– केशमर्दन म्हणजे डोक्याला तेल लावून चंपी-मर्दन करणे.
आयुर्वेदाप्रमाणे अभ्यंग ही रोज नित्य कर्मात करावयाची गोष्ट म्हणून सांगितली आहे.
शरीर व धातु अतिशय रुक्ष- सुकलेले- निर्जीव असताना स्नेहन, अभ्यंग केल्यास पुन्हा पुष्ट होतात व प्राणवर्धन होऊन बल व अग्नी वाढतो.
जसे वाळलेल्या लाकडाला तेल- पाणी मिळाल्यास ते हवे तसे वाकवता येते. कातडे कमावताना वा टिकवून ठेवण्यासाठी तेलच कातड्यात जिरवावे लागते. घर्षण असणार्‍या ठिकाणी वंगण म्हणून तेलच वापरावे लागते. रथाच्या गाडीच्या आसाभोवती सतत तेल सोडावे लागते. तसेच शरीररूपी रथास सांध्यांच्या ठिकाणी नियमित तेल जिरवावे लागते.
मेरूदंडातील मणके व मज्जारज्जू यांनाही नियमित तेल जिरवावे लागते आणि संपूर्ण शरीरात तेल जिरवावे लागते.
वेदना म्हटले म्हणजे वातदोष आला. तैलाभ्यांगामुळे वातदोष कमी होऊन वेदना कमी होते.
दुखणे खूप वाढल्यास उष्ण गुणधर्मीय बाम व क्रीम वापरल्याने वेदना तात्पुरती जरी कमी झाली तरी नंतर त्रास वाढतो. त्यातील उष्णतेने वंगण कमी होणे, स्नायू व हाडे कडक होणे, सूज येणे वगैरे त्रास होऊ शकतात. म्हणून आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वैद्यकशास्त्रात औषधांनी सिद्ध तेलाने किंवा तीळ तेलाने अभ्यंग करावे.
नियमित अभ्यंग केल्याने….
– शरीरातील अग्नी प्रदीप्त राहतो व कोष्ठाची शुद्धी होते. साहजिकच धातु उत्तम सारवान निर्माण होतात.
– शरीरातील मांस, स्नायू व अस्थि हे तीन प्रमुख घटक बलाशी संबंधित आहेत व अस्थिचा संबंध वाताशी आहे. अभ्यंग केल्याने अस्थिधातुतील वाताचे शमन होते. अस्थिची झीज होत नाही. अस्थीसंधी लवकर होते. मांस व स्नायू यांचे पोषण उत्तम होते. पर्यायाने शरीराची दृढता व कष्ट सहन करण्याची शक्ती वाढते.
त्वचा व वर्ण उत्तम होतात. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात. त्वचा उजळून कोमल व सुंदर होते.
– मेद कमी होतो. व्यायामासाठी ताकद मिळाल्याने व्यायाम केल्याने बांधेसूद, भरदार शरीरयष्टी प्राप्त होते.
– निद्राकर- वातशमन व कफप्रसादनामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
– दृष्टीप्रसाद – विशेषतः पायांना अभ्यंग केल्यामुळे डोळ्यांना ताकद मिळते. पायांचा खरखरीतपणा कमी होऊन बधीरता कमी होते. पायांच्या मसाजमुळे सायटीका होत नाही व व्हेरीकोज व्हेन्सचा त्रासही होत नाही.
– शिरोभ्यंग व डोक्यावर तेल लावल्याने केस गळत नाही, डोके दुखत नाही, चेहर्‍याची कांती सुधारते व ज्ञानेंद्रिये प्रसन्न राहतात.
– म्हातारपण लांबणीवर जाऊन तारुण्यशक्तीचा अनुभव अधिक घेता येतो व मनुष्य निरामय, निरोगी जीवनाचा उपभोग घेऊन शतायु होतो.
– नेहमी शरीरास तेल चोळणार्‍यास पाठदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांचे विकार टाळता येतात. हे विकार झालेले असल्यास आंतरस्नेहन व बाह्याभ्यंग मसाज करून बरे करता येऊ शकतात.
साधारणपणे मसाजसाठी औषधांनी संस्कारित तिळाच्या तेलाचा उपयोग करावा. चोळण्याची क्रिया अनुलोम दिशेने असावी. सांध्यावर, पोटावर गोलाकार जोर न लावता तेल आत जिरवावे.
नव्वद टक्के पाठदुखीवर शस्त्रक्रिया व औषधांचा उपयोग अल्प असतो अन् ती व्यायामानेच बरी होते असा अभ्यासाअंती निघालेला निष्कर्ष आहे. पाठदुखीवर फक्त शारीरिक व्यायाम अंतर्भूत नसून बौद्धिक- मानसिक व्यायामही महत्त्वाचे आहेत. म्हणून या विकारात ‘परिपूर्ण उपचारपद्धती’ म्हणून ‘भारतीय योगविद्ये’चा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. कारण योगविद्या ही शरीर, मन, बुद्धी या सर्व स्तरांवर कार्य करते.
यामध्ये आसनांपैकी पद्मासन, पश्‍चिमोत्तानासन, हलासन, शलभासन, भुजंगासन, वक्रासन, मत्स्येंद्रासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, चक्रासन अनेक आसने सांगितली आहेत. त्याचप्रमाणे अनेक आसनांनी युक्त असे ‘सूर्यनमस्कार’ हे महासन आहे. आसनांमध्ये पाठदुखीचा महत्त्वाच्या कारणांपैकी धावपळीचे जीवन, खुर्चीत बसण्याची अयोग्य पद्धत, सुखासीनता, दुचाकी वाहनांचे घातक परिणाम आदी सर्वच उपायांवर उपचार होतीलच पण कारणातील महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक- बौद्धिक ताणतणाव यावर ध्यानधारणा, शवासन, सर्वांगासन यांसारख्या महत्त्वाच्या उपयोग होतो.
योग्य आहार, शरीराचे योग्य वजन राखणे, योग्य व्यायाम, योगासने, प्राणायाम, हालचाल व बसण्याची योग्य पद्धती, वजन योग्य रितीने उचलणे… अशी काळजी घेऊन दुखणे शक्यतो दूर ठेवता येईल.