चतुरस्त्र

नाटककार, लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, अनुवादक, प्रशासक, पुरोगामी विचारवंत…! काल अनंताच्या यात्रेला निघून गेलेले गिरीश कर्नाड यांची ओळख ही अशी बहुपदरी. या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची कर्तबगारी. भाषेच्या मर्यादाही त्यांना नव्हत्याच. मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि अन्य दाक्षिणात्य भाषांमधून कर्नाड आपल्या प्रतिभेचा ठसा चौफेर उमटवत मुक्तपणे वावरले. गिरीश कर्नाड या नावाभोवती वलय निर्माण करणारी एक प्रदीर्घ कारकीर्द त्यातून घडत गेली. साहजिकच, पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ असे सन्मान त्यांच्यापर्यंत आपसूक चालत आले. अर्थात, ही वाटचाल सरळसोटही नव्हती. नानाविध वाद आणि वादळे त्यांच्याभोवती अधूनमधून घोंगावत राहिली. मात्र, कर्नाड स्वतःची अशी एक भूमिका घेऊन ताठ मानेने जगले. एक वैचारिक अधिष्ठान घेऊन लढले. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीला आपला एक आधारस्तंभ हरवल्यासारखे वाटते आहे. कर्नाड हे मूळचे कोकणी चित्रापूर सारस्वत कुटुंबातील. परंतु मराठीला ते जसे जवळचे वाटले, तसेच कन्नडला. इंग्रजीला तसेच हिंदीला. त्यांची नाटके, त्यांचा अभिनय, त्यांचे दिग्दर्शन यांच्यावर एक अस्सलपणाची मुद्रा दिसते. भारतीय इतिहास, पुराणांतील मिथकांचा सांधा आजच्या काळाशी जुळवणारी आणि मानवी जीवनातील कोडी उलगडू पाहणारी कर्नाडांची नाटके भन्नाट आहेत. महाभारतातील पांडवांचा पूर्वज असलेला, दुःखाच्या भोवर्‍यात सापडलेला ‘ययाती’ कर्नाडांनी रंगभूमीवर अवतरवला. लहरीपणाबद्दल बदनाम झालेला इतिहासातील ‘तुघलक’ त्यांनी आजच्या काळातील धर्म आणि राजकारणाच्या सरमिसळीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रंगमंचावर नवे प्रश्न मांडत आणला. कथा सरित्सागरातील धड आणि मस्तकांच्या अदलाबदलीच्या कल्पकथेवरील ‘हयवदन’ने मानवी मनाची पूर्णत्वाची आस दाखवली. चिं. त्र्यं. खानोलकरांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद गोवा हिंदू असोसिएशनसाठी रामकृष्ण नायकांच्या प्रेरणेने विजया मेहतांनी रंगभूमीवर आणला त्याने इतिहास घडवला. लोककथेच्या बाजाचे ‘नागमंडल’ असो, बसवण्णांच्या जीवनावरचे मूळ कन्नड ‘तलेदंड’ असो, कर्नाडांनी भारतीय रंगभूमीच्या प्रेक्षकांना नुसत्या मनोरंजनात रममाण न होता सतत विचारप्रवृत्त व्हायला भाग पाडले. इतिहास, पुराणातील कथानकांचे सूत्र धरून आजच्या काळातील प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. त्यासाठी प्रसंगी लोकरंगभूमीचा बाज स्वीकारला. अस्सल भारतीय परंपरेचा हात धरून एक आगळेवेगळे नाट्यभान घेऊन कर्नाड वावरले. खरे तर ते ऑक्सफर्डचेे उच्चशिक्षित होते. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा थाट आणि झगमगाट त्यांना मिरवता आला असता, परंतु आपली मुळे ते कधी विसरले नाहीत आणि हेच त्यांचे अस्सल भारतीयत्व त्यांचे मोठेपण अधोरेखित करते. ‘खेळता खेळता आयुष्य’ हे कर्नाडांचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित झालेले आहे, ते वाचनीय आहे. ‘नोडनोडता दिनमान, आडाडता आयुष्य’ ह्या द. रा. बेंद्रेंच्या एका कवितेची ओळ असलेल्या कन्नड म्हणीवरून त्यांनी आपल्या आत्मचरित्राला ते नाव दिले आहे. त्याच्या प्रकाशनावेळी विजया मेहतांनी त्याचे वर्णन ‘रंग रचना उधळणारा शोभादर्शक’ अशा सार्थ शब्दांमध्ये केलेले होते. आपल्या विधवा आईचे पाच वर्षे बेळगावच्या एका डॉक्टरच्या घरी निरुपायाने राहणे, त्यानंतर त्याच्याशी झालेला तिचा पुनर्विवाह, त्याचा आपल्या बालमनावर झालेला परिणाम आदींविषयी कर्नाडांनी त्यात मोकळेपणाने लिहिले आहे. मराठीमध्ये विजय तेंडुलकर, हिंदीमध्ये मोहन राकेश, बंगालीत बादल सरकार अशा दिग्गजांच्या जोडीने कर्नाडांचे नाव घेतले जाते, परंतु केवळ कन्नडपुरते नाही. वर म्हटल्याप्रमाणे भाषेच्या मर्यादा पार करीत केवळ लेखक म्हणून नव्हे, तर अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनही ते ज्या भाषेत गेले, तेथले होऊन गेले. म्हणूनच ‘उंबरठा’ मध्ये त्यांनी साकारलेला स्मिता पाटीलचा नवरा आजही आपल्या स्मरणात आहे. हिंदीत त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही विसरला गेलेला नाही. गिरीश कर्नाड हा अनेक भाषांना जोडणारा सेतू होता. समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीलाही ते आपलेच वाटले. कर्नाडांची प्रतिभा अशी चौफेर, चतुरस्त्र दौडत आली. आपली स्पष्ट, ठाम मते मांडायला ते कधी कचरले नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे. रवींद्रनाथ ठाकूर हे कवी म्हणून महान होते, परंतु ते दुय्यम दर्जाचे नाटककार होते, असे कर्नाडांचे म्हणणे होते. देशातील कथित असहिष्णुतेच्या वातावरणाला कर्नाडांनी आक्षेप घेतला होता, गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर ते आपणही ‘अर्बन नक्षल’ म्हणत निदर्शनांत उतरले होते. परंतु या सार्‍या वादग्रस्ततेपोटी, कर्नाडांनी भारतीय रंगभूमीला आणि एकूणच कलाजगताला दिलेली देण नाकारणे हा कृतघ्नपणा ठरेल. भारतीय परंपरेची उत्तम जाण, रंगभूमीचे सखोल भान, कसदार लेखन, अस्सल अभिनय, मूलगामी दिग्दर्शन यातून कर्नाडांनी भारतीय रंगभूमी आणि चित्रपटविश्व अतिशय समृद्ध केले आहे. अशा या चतुरस्त्र कलावंताला आपण कायमचे मुकलो आहोत!