ब्रेकिंग न्यूज़

चतुरंगची अभिजात शास्त्रीय संगीताची ‘शोधयात्रा’

  • डॉ. दत्ताराम देसाई
    (चतुरंग कार्यकर्ता)

    चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेने महाराष्ट्र व गोव्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याच्या दालनात अनेक नवीन पायंडे पाडले आहेत. सुरवातीच्या काळात संस्थेचे मार्गदर्शक सोळंकी मास्तर यांनीच कार्यकर्त्यांना ‘रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःची नवीन पायवाट निर्माण करा’ असा कानमंत्र दिला होता. त्यानुसार एखादा लोकप्रिय उपक्रमसुद्धा ठरावीक काळानंतर थांबवणे संस्थेने उचित मानले होते. रंगसंमेलन, जीवनगौरव पुरस्कार, त्यासाठीची जनक योजना, दिवाळी पहाट, अभिमानमूर्ती सन्मान इ. उपक्रमांचे जनकत्व चतुरंग या संस्थेकडेच जाते हे अभिमानाने नमूद करण्याचा मोह आम्हा कार्यकर्त्यांना झाल्याशिवाय रहात नाही. या संस्थेचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे तो आहे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत. वर्षातील बर्‍याचशा उपक्रमांमध्ये शास्त्रीय संगीत मैफिलीचा अंतर्भाव असतोच. मग ते रंगसंमेलन असो, दिवाळी पहाट असो किंवा एखाद्या गायकाची ‘मुक्तसंध्या’ कार्यक्रमानिमित्ताने झालेली मुलाखत असो.

उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ
विसाव्या शतकाच्या अखेरीस एक काळ असा आला होता की हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या भवितव्याविषयी सार्‍यांनाच चिंता लागून राहिली होती. नवीन पिढी पॉप, जाझ इ. पाश्चात्त्य संगीत प्रकारांच्या आहारी जातेय असे चित्र दिसू लागले होते. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी लागणारी जिद्द, निष्ठा, रियाझ याकडे नवी प्रतिभा तुच्छतेने पहातेय का? या क्षेत्रात उच्चतम स्थान गाठण्यासाठी लागणारी चिकाटी त्यांच्याकडे असेल का? या प्रश्नांची उत्तरे संदिग्ध होती. या पार्श्वभूमीवर अभिजात भारतीय संगीत परंपरेची जोपासना करू पाहणार्‍या, गुरूंकडून त्याचे रीतसर शिक्षण घेणार्‍या उदयोन्मुख युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणे व त्यांची तयारी रसिकांपर्यंत जाणे गरजेचे होते. यात नवोदित कलाकारांना रसिकांची मिळणारी दाद आणि संगीत रसिकांना पुढच्या पिढीची संगीत क्षेत्रातील प्रगती या गोष्टी परस्पर पूरकतेने प्राप्त होऊ शकल्या असत्या. सोबत एखाद्या बुजुर्ग कलाकाराचे सादरीकरण नवोदितांसाठी मार्गदर्शक तर रसिकांसाठी ‘सोनेपेे सुहागा’!

प्रेक्षक प्रथम
चतुरंग संस्थेच्या वैचारिकतेचा आणखी एक पैलू म्हणजे रसिक प्रेक्षक सर्वप्रथम ! प्रत्येक उपक्रमातून रसिकांचा मान राखला गेला पाहिजे. अक्षय तृतीया हा चतुरंग संस्थेचा स्थापनादिन. त्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते एकत्र येतात, त्या त्या ठिकाणच्या एखाद्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, पीयूष किंवा त्या ठिकाणी मिळणारे एखादे सरबत पिऊन पांगतात. वर्धापनदिनाचा हा आनंद स्वतःपुरताच सीमित न ठेवता रसिक प्रेक्षकांच्या सोबतीने साजरा केला तर? या विचारातून निघाली ‘चैत्रपालवी संगीतोत्सव’ ही संकल्पना व त्यामुळेच या कार्यक्रमात पेढा व चैत्रातील खास पेय म्हणजे पन्हे! या कार्यक्रमासाठी रंगमंच सजावटसुद्धा वैशिष्ट्‌यपूर्ण म्हणजे वसंत ऋतूला साजेशी केली जाते. कुंड्यांची, विविध पानाफुलांची सजावट गाण्याला एक सुंदर महिरप प्रदान करते. असा वर्धापनदिनाचा कार्यक्रम या नवप्रतिभेच्या स्वागताशी जोडला गेल्यामुळे रसिकांना व कार्यकर्त्यांना परस्परांच्या आनंदामध्ये सहभागी होता येते.

१९९५ साली उपक्रमास प्रारंभ
‘चैत्रपालवी संगीतोत्सव’ या उपक्रमाची सुरुवात २९ एप्रिल १९९५ या दिवशी गिरगाव-मुंबई येथे झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटक होत्या सौ. माणिक वर्मा व त्या कार्यक्रमाचे उभरते कलाकार होते – संजीव जहागीरदार (गायन), प्रतिमा टिळक (गायन) तर बुजुर्ग कलाकार होते पं. सुरेश तळवलकर (तबला).
दुसरा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी येथे २१ एप्रिल १९९६ रोजी -उद्घाटक- प्रभाकर पंडित. उभरते कलाकार – संजीव अभ्यंकर (गायन), मंजूषा कुलकर्णी (गायन), रूपक कुलकर्णी (बासरी), मिलिंद तुळणकर (जलतरंग वादन) व प्रथितयश कलाकार होते पं. उल्हास कशाळकर (गायन).
त्याकाळच्या उभरत्या कलाकारांमध्ये आता नावारूपास आलेले सौ. देवकी पंडित नंबियार, उस्ताद रशिदखान, पुष्कर लेले, उपेंद्र भट, राहुल देशपांडे, महेश काळे, शिल्पा पुणतांबेकर, दीपिका भिडे, रमाकांत गायकवाड, स्वरांगी मराठे, रवींद्र च्यारी (सतार). तर तेव्हाच्या प्रथितयश कलाकारांमध्ये पं. यशवंतबुवा जोशी, पं. विजय कोपरकर, श्रीमती माणिक भिडे, सौ. अश्विनी भिडे -देशपांडे, पं. रोणू मुजुमदार (बासरी), श्री. ब्रिज नारायण (सरोद). या व इतर अनेक प्रतिभावान कलाकारांनी रुपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर इ. ठिकाणी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

म्हैसकर फाउंडेशनचा आर्थिक आधार
२००६ पर्यंत अशा पद्धतीने मुंबईमध्ये दरवर्षी चैत्रपालवी संगीतोत्सव केला जात होता. मुंबईमध्ये तपपूर्ती करून हा कार्यक्रम डोंबिवलीत आला. ‘म्हैसकर फाउंडेशन’चा भक्कम आर्थिक आधार मिळाल्यावर या उपक्रमाला एक वेगळा आयाम मिळाला. म्हैसकर फाउंडेशनच्या मदतीने या कार्यक्रमात एखाद्या व्रतस्थ विद्यार्थ्यासाठी २५००० रु. ची संगीत शिष्यवृत्ती व एखाद्या संगीत शिक्षकाचा ७५०००रु. देऊन ‘चतुरंग संगीत सन्मान’ ज्याने आपले संपूर्ण आयुष्य संगीत विद्यादानासाठी वाहून घेतलेले आहे. त्यातूनही सरकार दरबारी मान प्रतिष्ठा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीपेक्षा एखाद्या व्रतस्थ वृत्तीने प्रसिद्धीपासून दूर असलेल्या संगीत शिक्षकाचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. आत्तापर्यंत ह. भ. प. दत्तदासबुवा घाग, दशरथ पुजारी, पं. वि. रा. आठवले, पं. यशवंतबुवा जोशी, पं. धोंडूताई कुलकर्णी, पं. शंकर अभ्यंकर, पं. तुळशीदास बोरकर, पं. बबनराव हळदणकर, पं. अरविंद मुळगावकर, पं. वसंतराव आजगावकर, पं. नाथ नेरळकर यांना व यंदाचा संगीत सन्मान पुरस्कार श्री. भाई गायतोंडे यांना प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार तसेच शिष्यवृत्ती धारकाची निवड करण्यासाठी संगीताच्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आणि तटस्थ व्यक्ती असतात. त्यामुळेच कधीही निवडीसंदर्भात वाद निर्माण झाला नाही. डॉ. विद्याधर ओक, श्री. विश्वनाथ शिरोडकर, सौ. आशा खाडिलकर, पं. उल्हास बापट, श्री. अशोक पत्की, पं. सुरेश तळवलकर, सौ. देवकी पंडित, श्री. यशवंत देव, श्री. मुकुंद संगोराम, सौ. विजया धुमाळे, श्री. अमरेंदू धनेश्वर, श्री. नारायणराव बोडस, श्री. मुकुंद भावे, सौ. आशा पारसनीस, सौ. शुभदा पावगी, श्री. रवींद्र साठे, सौ. शुभदा दादरकर, पं. सदाशिव बाक्रे, इ. अनेकांनी निवड समितीमध्ये काम करून आपले योगदान दिलेले आहे. संगीत शिष्यवृत्ती मिळालेल्यांमध्ये श्री. ओंकार दादरकर, श्री. ओंकार दळवी, श्री. कृष्णा बोंगाणे, श्री. प्रसाद पाध्ये, श्री. आदित्य मोडक, नूपुर काशीद, रमाकांत गायकवाड, सुधांशू घारपुरे, कु. भाग्यश्री पांचाळे, कु. प्राजक्ता मराठे, चि. गंधार राम देशपांडे यांचा समावेश आहे. यंदाची संगीत शिष्यवृत्ती कु. अनुजा बोरुडे या मुलीला पखवाजवादनासाठी मिळाली आहे. वरील कलाकार व तज्ज्ञ व्यक्तींच्या यादीवरूनच या कार्यक्रमाच्या दर्जाची कल्पना यावी.

गोव्यातही सुरूवात
गेल्या वर्षापासून अक्षय तृतीयेदरम्यान गोवा शाखेनेही हा कार्यक्रम सुरू केलाय. गोव्यात कितीतरी मुले संगीतसाधना करताहेत. त्यातील संगीत विषयाला वाहून घेतलेल्या व पुढेही संगीत विषयाचा गांभीर्याने विचार करणार्‍या नवनवोन्मेषशाली प्रतिभेला वाव देण्याचा चतुरंगचा प्रयत्न आहे. गोव्यात संगीत सन्मान पुरस्कार व संगीत शिष्यवृत्ती अजूनपर्यंत देण्यात येत नाही. पण कुणी सांगावे, गोव्यातही म्हैसकर फाउंडेशनसारखा कुणी दाता तयार झाला तर अशा प्रकारचा पुरस्कार व शिष्यवृत्ती देणे आमच्यासाठी आनंद देणारी गोष्ट असेल.