चंद्रावर स्वारी

सोमवार १५ जुलैच्या पहाटे भारत व भारतीयांसाठी एक नवा इतिहास घडणार आहे. त्या दिवशी पहाटे ठीक २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचे दुसरे चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. चांद्रयान – १ अवकाशात झेपावले त्याला आता दशकभराचा काळ लोटला आहे. पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पूर्वी पाणी असल्याचे पुरावे जगापुढे सादर केले. आता हे दुसर्‍या टप्प्यातील चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात उतरणार असल्याने यासंबंधी अधिक काही माहिती उपलब्ध करू शकणार का, याबाबत वैज्ञानिक जगतामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. चंद्राचा दक्षिणेचा हा भाग कायम छायेखाली असतो. त्यामुळे तेथे पाण्याचे अंश सापडण्याची अधिक शक्यता वैज्ञानिकांना वाटते आहे. नियोजित कार्यक्रम व्यवस्थित पार पडला तर आपले हे दुसरे चांद्रयान ६ किंवा ७ सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरेल. विविध शास्त्रीय प्रयोगांसाठी वैज्ञानिक उपकरणांसह हे सुमारे ३.८ टनांचे चांद्रयान तेथवर घेऊन जाणारा एक भलाथोरला जीएसएलव्ही प्रक्षेपक सज्ज झाला आहे. ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी त्याला नाव दिले आहे, ‘फॅट बॉय’, परंतु तेलगू प्रसारमाध्यमांनी त्याचे नामकरण केव्हाच ‘बाहुबली’ करून टाकले आहे! ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे या चांद्रयानाचे तीन भाग आहेत. ऑर्बिटर उतरण्यापूर्वी चंद्राच्या कक्षेत फिरत राहण्यास मदत करील. लँडर म्हणजे प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचे साधन आणि रोव्हर म्हणजे प्रत्यक्षात चंद्रावर उतरल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावरून आजूबाजूला मार्गक्रमण करीत विविध शास्त्रीय प्रयोगांमध्ये साह्य करणारे साधन. या लँडरला नाव दिले आहे ‘विक्रम’, तर रोव्हरला नाव आहे ‘प्रोग्यान.’ चांद्रयानबाबत कौतुकाची बाब म्हणजे यापैकी बहुतेक तंत्रज्ञान देशी बनावटीचे आहे व आपल्या संशोधकांनी ते विकसित केलेले आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपक हा तर एव्हाना आपल्या ‘इस्रो’च्या हातचा मळ बनून गेला आहे. आजवर या प्रक्षेपकांच्या निर्मितीमध्ये ‘इस्रो’चा हात धरणारा कोणी नाही एवढ्या क्षमतेने हे प्रक्षेपक आपल्या संशोधकांच्या वर्षानुवर्षांच्या अथक मेहनतीअंती विकसित झालेले आहेत. आजवर आपले देशी उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी त्यांचा वापर व्हायचा, परंतु अलीकडच्या काळात अन्य देशांचे व संस्थांचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी त्यांचा व्यावसायिक वापरही केला जातो आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्येही या देशी प्रक्षेपकांचा व्यावसायिक लाभ उठविण्यावर भर दिला गेल्याचे दिसते आहे. केवळ प्रक्षेपक नव्हे, तर त्यावरून चंद्रावर पाठवले जाणारे हे चांद्रयान विकसित करण्यातही आपल्या संशोधकांनी अथक घाम गाळला आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केल्या गेलेल्या या चांद्रयानामुळे भारताची मान नक्कीच उंचावली जाईल. चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश ठरेल हे तर खरेच, शिवाय चंद्राची उत्पत्ती कशी झाली, तो कसा उत्क्रांत झाला, त्याच्या पृष्ठभागावर काय आहे, तेथील खडक कसे आहेत, माती कशी आहे, खनिजे कोणती आहेत या सर्वांची माहिती मिळवण्याचे काम या चांद्रयानावरील ‘रोव्हर’ करणार आहे. ही सगळी माहिती चंद्राविषयीच्या आजवरच्या संशोधनाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाईल. अशा प्रकारच्या मोहिमा खर्चिक असतात हे खरे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी अशा खर्चिक मोहिमा काढणे कितपत योग्य असा सवाल करणारेही आहेत, परंतु जगामध्ये आपल्या देशाची कीर्ती प्रस्थापित करायची असेल तर अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये आपण मागे राहून चालणार नाही. आपल्या वैज्ञानिकांच्या प्रतिभेचा, अभ्यासाचा फायदा आपण घेतला नाही तर अन्य देश तो उठवतील. ‘इस्रो’ हा तर भारताच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. अमेरिकेच्या ‘नासा’ ला तोडीस तोड आणि आपल्या देशाला आवश्यक आणि अनुरूप असे तंत्रज्ञान विकसित करण्यात ‘इस्रो’ नेहमीच योगदान देत आलेली आहे. आजवर अनेक मानाचे तुरे ‘इस्रो’ने भारताच्या शिरपेचात खोवले. दळणवळण उपग्रह असोत, पहिली चांद्रयान मोहीम असो, मंगलयान मोहीम असो, नानाविध मोहिमांमागे सतत कार्यरत असलेल्या ‘इस्रो’च्या पाठीशी आजवरची सर्व सरकारे राहिली. मध्यंतरी त्या संशोधन संस्थेला झाकोळून टाकणारे वादंग दुर्दैवाने निर्माण झाले. काही वैज्ञानिकांच्या राष्ट्रनिष्ठेप्रती संशय घेतले गेले. आरोप – प्रत्यारोपांची राळ उडाली. परंतु त्या सगळ्यातून तावून सुलाखून ‘इस्रो’ बाहेर पडलेली आहे. ‘चांद्रयान’ सारख्या मोहिमा आर्थिक आणि राजकीय पाठबळाविना शक्य नसतात. देशी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर ही या चांद्रयान मोहिमेतील सर्वांत अभिमानाची बाब आहे. जगातील पुढारलेल्या देशांच्या तुलनेत आपणही काही कमी नाही हे सिद्ध करणारी ही वैज्ञानिक प्रगती आहे. उद्या रविवारी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपासून या मोहिमेचे अंतिम काऊंटडाऊन सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय या नात्याने ‘इस्रो’च्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेला शुभेच्छा देऊया आणि ती सफल व्हावी अशी कामना करूया!