घरचा अहेर

कॉंग्रेस पक्ष आपल्या अस्तित्वाचीच लढाई सध्या लढत असून पक्ष चालवण्याचे जुने मंत्र यापुढे चालणार नाहीत; कॉंग्रेसला बदलावे लागेल, अशी परखड कबुली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नुकतीच जाहीरपणे दिली आहे. जयराम रमेश हे कॉंग्रेसचे एक बुद्धिमान नेते गणले जातात. त्यांच्यासारखी पक्षाची ‘थिंक टँक’ असलेली व्यक्ती जेव्हा अशा प्रकारची प्रतिक्रिया देते, तेव्हा पक्षाने ती गांभीर्याने विचारात घेणे अपेक्षित आहे. राहुल गांधी यांनी आता सक्रियपणे कॉंग्रेस पक्षाची धुरा स्वीकारण्याची वेळ आलेली आहे असे जयराम रमेश सातत्याने सांगत आले होते. २०१५ पासून आजवर अनेकदा त्यांनी राहुल आता पक्षनेतृत्व अधिकृतपणे स्वीकारतील असा आशावाद व्यक्त केला, परंतु ते घडले नाही. राहुल गांधींची राजनीती ‘हीट अँड रन’ अशाच स्वरूपाची राहिली. मध्यंतरी ते आत्मचिंतनार्थ गायब झाले. नंतर एक नवे राहुल प्रकटल्याची आवई उठवण्यात आली, परंतु त्यानंतरही त्यांच्याकडून परिपक्व नेतृत्वाचे दर्शन अद्यापही घडलेले नाही. मध्येच उगवायचे, काही तरी चमकदार विधाने करायची, पक्षामध्ये जान आणायची आणि पुन्हा अज्ञातवासात निघून जायचे असे काहीसे त्यांचे चालले आहे. वास्तविक सोनिया गांधींचे गंभीर आजारपण आणि त्यांच्या प्रकृतीवर पक्षकार्यामुळे येणारा ताण याची जाणीव होताच राहुल यांनी पक्षनेतृत्व स्वतःच्या हाती घ्यायला हवे होते. पक्षजनांमध्ये राहुल यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या, परंतु ते घडलेच नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवेळी राहुल पक्षाध्यक्षपद स्वीकारतील अशा ज्या अटकळी व्यक्त होत्या, त्यांनाही त्यांनी फाटा दिला. त्यामुळे राहुल यांच्या एकूण नेतृत्वक्षमतेविषयी पक्षजनांमध्येच संभ्रम आहे आणि तो आडून आडून व्यक्त होत असतो. या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. कॉंग्रेस पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहे हे सत्य त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवण्याचे धैर्य दाखवले आहे. आपली सल्तनत गेली तरी काही नेते सुलतान असल्यासारखे वागत आहेत. विचारांची, कृतीची, सादरीकरणाची आणि संवादाची आपली पद्धत संपूर्णतः बदलायला हवी. पक्षाला अजूनही जनसमर्थन आहे, परंतु नवी कॉंग्रेस ती अपेक्षिते आहे असेही जयराम रमेश म्हणाले. कॉंग्रेसचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी नेतृत्वाकडून धोरणामध्ये लवचिकता जरूरी आहे असेही त्यांनी सुनावले आहे. पक्षाने आव्हानांना तोंड देण्यासाठी सामूहिकपणे जबाबदारी उचलली पाहिजे असे जरी ते म्हणत असले तरी त्यांचा खरा रोख राहुल गांधींवर आहे. त्यांनी आता तरी पुढे व्हावे आणि पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या आघाडीवर राहून लढावे अशी अपेक्षाच ते व्यक्त करीत आहेत. निवडणुकांमधील जय -पराजय हे ऊनसावलीसारखे असतात. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यातून जावे लागते. कॉंग्रेसलाही यापूर्वी आणीबाणीनंतरच्या काळात, अयोध्या आंदोलनानंतरच्या काळात सत्तेपासून दूर जाण्यास जनतेने भाग पाडले होते, परंतु नंतर सत्तेवर आलेल्यांच्या चुकांचा फायदा उठवीत पक्षाने पुन्हा उसळी घेतली होती, परंतु नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यापासून एकेका राज्यांतून कॉंग्रेस हद्दपार होत चालली असताना अशा प्रकारे पुन्हा लढत देण्याचे धैर्यच पक्षात राहिलेले दिसत नाही. केवळ सत्ताधार्‍यांच्या ‘अँटी इन्कम्बन्सी’ मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतील या भ्रमात पक्षाने राहू नये असे जयराम रमेश म्हणाले ते खरे आहे. नुकत्याच झालेल्या अहमद पटेल यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाने थोडी समयसूचकता दाखवली, त्याचा त्यांना फायदा झाला, परंतु अशा सकारात्मक घटनांतून पक्षजनांचे मनोबल उंचावून पक्षकार्याला पुन्हा चालना देण्यासाठी नेतृत्वाने पुढे येण्याची आवश्यकता असताना पक्षाला एकसंध ठेवू शकणारा सद्यपरिस्थितीतील एकमेव नेता असलेल्या राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदापासून दूर राहणे पक्षाला हानीकारक ठरत चालले आहे.