घरकामासाठी आणून छळ; लैंगिक शोषण

गिरी येथे एकास अटक 
अल्पवयीन मुलीला अन्यायकारकरीत्या कोंडून ठेवून शरीरावर जळत्या सिगारेटचे चटके देऊन, तिचा लैंगिक छळ करून वेश्या व्यवसायासाठी तिच्यावर जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रविवार रात्री विजय राठोड (२३) यास अटक केली. संशयित आरोपी मूळचा विजापूर येथील असून सध्या तो गिरी येथे राहतो. आपल्या पत्नी सोबत घरकाम करण्यासाठी संशयिताने त्या अल्पवयीन मुलीला पंधरा दिवसापूर्वी विजापूरहून गिरी येथे आणले होते.
म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा चाईल्ड लाईन गोव्याच्या केंद्र समन्वक सुझान यांनी म्हापसा पोलिसात संशयिताविरुध्द रितसर तक्रार दिल्यानंतर दखल्यात गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली. संशयित आरोपी आपल्या पत्नीसह गिरी येथे राहतो. संशयित आरोपी तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. संशयिताने तिच्या शरीरावर जळत्या सिगारेटचे चटकेही दिले होते. याशिवाय तिचा लैंगिक छळ करून वेश्या व्यवसायासाठी तो तिच्यावर जबरदस्ती करीत असे, अशी माहिती मिळाली आहे. चाईल्ड लाईन गोव्याच्या केंद्र समन्वक श्रीमती सुझान डिसोझा यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यानी म्हापसा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची सुटका करून अपना घरामध्ये तिची रवानगी केली व संशयित आरोपी विजय राठोड यास अटक केली. दरम्यान, काल त्याला रिमांडसाठी बाल न्यायालयासमोर उभे केले असता आणखी दोन दिवसाचा रिमांड देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.सं.च्या ३४४, ५०६, ३३४, ५०९, ३५४, ३७०, ३७६ कलमाखाली तसेच गोवा बालकायदा कलम ८ बालगुन्हेगार व बालसंरक्षण कायदा कलम २३ व अनैतिक व्यवहार कायदा कलम ५ खाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply