ब्रेकिंग न्यूज़

ग्रेटर पीडीएतून गावे वगळण्यावर आजच्या बैठकीत निर्णय शक्य

नगरनियोजन मंडळाची बैठक बुधवार १६ मे रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएतून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे या दोन्ही मतदारसंघांतील गावे वगळण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत पीडीएमध्ये गावांच्या समावेशाच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांतआंद्रे मतदारसंघातील पंचायत क्षेत्रातील संबंधितांच्या घेतलेल्या बैठकीत पीडीएतून गावे वगळण्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते.
सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएमध्ये सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघांतील अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पीडीएतून गावे वगळण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत या दोन्ही मतदारसंघांतील गावे वगळण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप पीडीएतून गावे वगळण्याबाबत सरकारी पातळीवर निर्णय घेण्यात आलेला नाही.

पीडीएतून गावे वगळण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी ९ ते १३ मे दरम्यान येथील आझाद मैदानावर पाच दिवस धरणे आंदोलन केले होते. पीडीएतून गावे न वगळल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.