ब्रेकिंग न्यूज़

ग्रेटर पणजी पीडीए स्थापनेचा आदेश आज

माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित ग्रेटर पणजी ह्या नव्या नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या स्थापनेसाठीचा आदेश आज दि. १३ रोजी येणार असून त्यासाठीची फाईल यापूर्वीच कायदा खात्याकडे पाठवण्यात आली असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांना ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद देण्यात येणार असून त्यावरील इतरांची नावेही निश्‍चित झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य सदस्यांमध्ये पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर, ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांतआंद्रेंचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याबरोबरच ताळगांव, चिंबल, सांताक्रुझ, ओल्ड गोवा, कुडका – बांबोळी या पंचायतींचे सरपंच तसेच कार्यकारी वरिष्ठ नगर नियोजक पेद्रू कुतिन्हो, मारियो फर्नांडिस, विवेक आंगले, राज मलीक, अत्रेय सावंत हे या पीडीएवर सदस्य असतील. तर नगर नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली. दरम्यान, ग्रेटर पणजी ही नवी पीडीए स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यापासून काही ग्रामस्थांनी ह्या पीडीएला विरोध दर्शविला होता. सांताक्रुझ मतदारसंघातील ग्रामस्थांनी तर ह्या पीडीएला जोरदार विरोध करताना त्याच्या विरोधात निदर्शनेही केली होती. सांताक्रुझ मतदारसंघ ग्रेटर पणजी पीडीएखाली आला तर या मतदारसंघातील सर्व गावांचे कॉंक्रिटीकरण होण्याची भीती ह्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. मतदारसंघातील बोंडवल हा सजीव सृष्टीच्या नजरेने अत्यंत संवेदनशील असलेला तळ्याचा परिसर धोक्यात येण्याची भीतीही ह्या ग्रामस्थानी व्यक्त केली होती.

पर्रीकर व सरदेसाई
यांचा आभारी ः बाबुश
ग्रेटर पणजी जीडीएचे अध्यक्षपद आपणास देण्यास आले असल्याचे वृत्त आपणाला काल कळले. त्यासंबंधीची अधिकृत घोषणा उद्या होणार असून या नियुक्तीबद्दल आपण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया काल बाबुश मोन्सेर्रात यांनी दिली.