ब्रेकिंग न्यूज़
ग्रामीण उन्नतीचा उत्सव रवींद्र महोत्सव

ग्रामीण उन्नतीचा उत्सव रवींद्र महोत्सव

– गोपीनाथ वि. गावस
ग्रामीण जीवन उन्नतीच्या दिशेने नेण्याचे स्वप्न पाहणार्‍या, कलेचा आविष्कार करत कलाकारांची आदर्श जीवनाकडे सांगड घालणार्‍या, मातीची नाळ माणसाकडे जोडणार्‍या, ग्रामीण विकास हेच माझे कूळ आणि मूळ सांगण्यासाठी तरुणांना ‘जागे व्हा..’ म्हणून हाक मारणार्‍या साखळी रवींद्र भवनाने आपले प्रथम वर्धापनरुपी महोत्सवी वर्ष २७ आणि २८ डिसेंबर २०१४ रोजी उत्साहाने साजरे केले असे म्हटल्यास वावगे ठरु नये. केंद्रीय संरक्षणमंत्री श्री मनोहर पर्रीकर, गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपसभापती अनंत शेट, पाळी मतदार संघाचे आमदार तथा साखळी रवींद्र भवनाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या रवींद्र महोत्सवाचे पारंपरिक उत्सवरुपी उद्घाटन झाले. हा रवींद्र महोत्सव म्हणजे गोव्यातल्या रवींद्र भवनाच्या खर्‍या कार्याची पावती देणारा हा महोत्सव ठरला. या महोत्सवात सहभागी होणार्‍या दरेक कला आणि लोककलाकाराला, शेती आणि संस्कृती जपण्याचे स्वप्न पाहणार्‍याला, ग्रामीण परिसराचे विकासात रुपांतर करणार्‍या तरुणांना शेती आणि शेतीपुरक अर्थशास्त्राची नाडी समजून देण्यासाठी सिंधूदुर्ग, झारपचे भागिरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद वा. देवधर यांचे मार्गदर्शनपर बीजभाषण हे खरोखरच खडकाळ सड्यावर घवघवीत ङ्गुले ङ्गुलवण्याचे धाडस प्रत्येकात निर्माण करणारे असेच होते. या बीजभाषणाला शेतकर्‍यांनी आणि तरुणांनी खरोखरच दाद दिली.
या सत्रानंतर झालेल्या ‘घे भरारी’ या कर्तबगार महिलांच्या मुलाखतीने तर अक्षरशः तरुण मुलींना आणि महिलांना ‘मी अबला नाही, सबला आहे’ हे पटवून दिले. यामध्ये सहभागी झालेल्या श्रीमती सुनीता सावंत (डिवायएसपी), लीना पेडणेकार आणि शिल्पा सावंत यांची नमन धावस्कर यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे स्त्री जगताला दिशा दाखवणारीच होती. तसेच ग्रामीण उद्योग आणि स्थिती या सत्रात सरकारी अधिकारी वर्गाने तर ग्रामीण जीवन बदलायचे असेल तर आम्ही नागरिकांना मातीची नाळ जोडण्याचाच मंत्र दिला.
‘ग्रामीण परिसर आणि विकास’ आणि ‘आमची माती आमची माणसे’ या सत्रात तर भाषणे देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आमचा ग्रामीण परिसर ङ्गुलवण्यासाठी कशी कसरत करावी लागते, तरुणांचे त्यामध्ये योगदान किती आणि कसे महत्वाचे आहे, तरुणांनी ग्रामीण जीवनाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे, ग्रामीण परिसराचा विकास होण्यास तरुणांची जबाबदारी कोणती आणि त्यांची कर्तव्ये यावर डॉ. प्रमोद सावंत, भाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वजरीकर, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे चर्चासत्र खरोखरंच ङ्गलदायी ठरेल यात शंका नाही. त्यानंतर झालेल्या ‘विकासाच्या मार्गावरील गाड्या आणि बेड्या’ या परिसंवादात तर प्रशांती तळपणकर, अँड. स्वाती केरकर यांनी केलेले मार्गदर्शन दरेक महिलेच्या जीवनातील विकासाला गती देणारेच होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तरुणांनो जागे व्हा या सत्रात पत्रकार संदेश प्रभुदेसाय, कालिदास घाटवळ, गोपीनाथ गावस, अन्वेषा सिंगबाळ आणि प्राध्यापिका सुलक्षणा सावंत त्यांनी उपस्थित तरुणांना अक्षरशः जागे केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जीवन सुंदर आहे. ते सुंदरतेने जगण्यासाठी आहे. संघर्षातूनच जीवनांत सुंगधरुपी ङ्गुले ङ्गुलतात याची गुरूकिल्लीच या सत्रातून उपिस्थितांना दिली असे म्हणावे लागेल.
हा रवींद्र महोत्सव म्हणजे नुसता उत्सव नव्हता. कलेची दालने मांडणारा मांड नव्हता. तो सत्तरी आणि डिचोलीतील शेतकरी, कलाकार, शिक्षक, उद्योजक, साहित्यिक, सामाजिक आणि कलात्मकतेला कलाटणी देणारा ग्रामीण उन्नतीचाच उत्सव होता असे म्हणावे लागेल. याचे श्रेय साखळी रवींद्र भवनाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, तसेच रवींद्र भवनचे संगळे संचालक यांना तर जातेच पण तितकेच साखळी, डिचोली आणि सत्तरीतील कलाकारांनाही द्यावे लागेल.
यात ङ्गक्त परिसंवादच नव्हते तर त्यामध्ये वनखाते, पर्यटनखाते, एड्स कंट्रोल सोसायटी, मत्सोद्योग खाते, खादी आणि ग्रामोद्योग खाते, कृषी खाते आणि इतर खात्यांची दालनांतून डिचोली आणि सत्तरी भागातील शेतकरी व उद्योजकांना मार्गदर्शन देण्यास तत्पर होती. यामध्ये सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील स्वयंसेवी संघटनांना आपली दालने मांडण्याची सोय करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील अनेक लोककला पथकांना आमंत्रित करून लोककलेचा आविष्कार करण्यात आला. ङ्गुगडी, धालो, चपय, माळेगान, मांडो, वीरभद्र, मोरुलो, सोकारती, व्होवयो, रणमालें, कालो, दशावतारी कालो आणि इतर लोककला सादर करून लोककलाकारांच्या कलेचा सन्मान करण्यात आला. शेकडो लोककलाकारांची सांगड घालून सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रमोद म्हाडेश्वर यांनी बहारदार कार्यक्रम सादर केले. दोन दिवस चालणार्‍या या रवींद्र महोत्सवात सत्तरीच्या लोक संस्कृतीची माहिती आणि जतनाचा संदेश देणारे ‘लोकादायज’ हे लोकवस्तु प्रदर्शन मांडण्यात आले होते. या दालनाला तर सुमारे पांच हजार लोकांनी भेट देऊन आमच्या पुरातन लोकवस्तुंचे दर्शन घेतले. शेकडो लोकवस्तु ज्या आज काळाच्या पडद्याआड होत चालल्या आहेत त्या लोकादायज मध्ये मांडण्यात आल्या होत्या. झिलू गांवकर आणि त्यांच्या लोककलाकारांनी प्रवेशद्वाराजवळ बांधलेली माटोळी म्हणजे पारंपरिक माटोळीचा मुर्तीमंत नमुनाच म्हणावा लागेल.
या दोन दिवसांच्या महोत्सवामध्ये डिचोली आणि सत्तरी केशव सेवा साधना विद्यालयाचे विद्यार्थी आणि बालवाडी व अंगणवाडीच्या मुलांनी सादर केलेले कार्यक्रम तर अक्षरशः कौतुकास पात्र ठरले. केशव सेवा साधनाच्या विशेष मुलांनी तर श्रोते वर्गाकडून कौतुकाचीच थाप घेतली. केशव सेवा साधना विद्यालयाच्या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, इतके सुंदर कार्यक्रम त्यांनी सादर केले.
खरच साखळीचा रवींद्र महोत्सव म्हणजे ग्रामीण जीवन, ग्रामीण उद्योग, ग्रामीण लोककला, ग्रामीण विकास, ग्रामीण परिसर आणि आमची माती आणि आमची माणसे, मुलांचे विश्व, मुलांच्या सुप्तकलागुणांना योग्य वाव देणारा खास यांच्या विकासाचाच हा महोत्सव होता असे म्हटल्यास ङ्गोल ठरणार नाही.