ग्रंथपाल बडतर्फ

>> विद्यार्थी मारहाणप्रकरण

ढवळी येथील इंदिराबाई ढवळीकर (आयव्हीबीडी) विद्यालयाच्या ग्रंथपालाने दोघा विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी या विद्यालयाचा ग्रंथपाल अमित रंगनाथ सावंत (३१) याला ङ्गोंडा पोलिसांनी अटक करून न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली.

दरम्यान, अमित सावंत याला इंदिराबाई ढवळीकर विद्यालयाच्या एस. एस. समिती व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.
संशयित अमित सावंत याच्याविरोधात मंगळवारी ङ्गोंडा पोलिसांत जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या आईने तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या विद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अशाप्रकाराविरुद्ध विद्यालय व्यवस्थापनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची असून विद्यादान करणार्‍या सरस्वतीच्या मंदिरात अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाऊ नये, अशीही मागणी पालकांनी केली आहे. व्यवस्थापनाच्या निर्णयाचे पालकांनीही स्वागत केले आहे.