ब्रेकिंग न्यूज़
गौरवप्राप्त कलाकारांनी तरुण कलाकारांना घडवावे

गौरवप्राप्त कलाकारांनी तरुण कलाकारांना घडवावे

>> कला – संस्कृती मंत्र्यांचे आवाहन

>> ३० कलाकारांना पुरस्कार प्रदान

आजच्या कला गौरवप्राप्त कलाकारांनी कलेच्या जतनासाठी, प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी यापुढेही तरुण कलाकारांना घडवून गोवा कलेने समृद्ध आहे हे दाखवून द्यावे असे आवाहन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी येथे केले.

कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात काल मंत्री गावडे यांच्या हस्ते विविध कला क्षेत्रात योगदान दिलेल्या तीस कलाकारांना कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख पंचवीस हजार रुपये असे त्याचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर कला गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ गायक नट पद्मश्री प्रसाद सावकार, कला-संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर, उपसंचालक अशोक परब उपस्थित होते.

गावडे यांनी विविध क्षेत्रातील कलाकारांचा हा महामेळावाच आहे असे सांगून दैनंदिन प्रापंचिक जीवनातही आपण कलेचा आविष्कार कशा प्रकारे घडवत असतो हे सोदाहरण स्पष्ट केले. शब्दांचे सामर्थ्य सांगणारी वामन निंबाळकर यांची कविता उद्धृत करून त्यांनी शब्दांचे सामर्थ्य संवादाच्या माध्यमातून प्रभाकर पणशीकर, मा. दत्ताराम यांच्यासारख्या गोमंतकीय कलाकारांनी कशा प्रकारे आविष्कृत केले आहे हे सांगितले. कलेच्या घराला भिंती असून नयेत याचीही जाणीव त्यांनी दिली.
प्रसाद सावकार यांनी कला संस्कृती मंत्र्यांनी गोव्याचे कलाकार मागे का पडतात याविषयी विचार करावा असे आवाहन केले. गुरुदास पिळर्णकर यांनी स्वागत केले. अशोक परब यांनी आभार मानले. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. गौरव पुरस्कार प्राप्त झालेल्यांच्या वतीने विजयकुमार कामत व बॉस्को मिनेझिस यांनी मनोगत व्यक्त केले.

कुठलीही कला प्रथम आत्मसमाधानासाठी असते असे स्पष्ट करून कामत यांनी सांगितले की, नाट्यक्षेत्राने मला अनुभव देऊन समृद्ध केले. तातोबा वेलिंगकर यांचे मार्गदर्शन लाभले हे मी माझे भाग्य समजतो. मिनेझिस म्हणाले, साधन-सुविधा नव्हत्या त्या काळात ज्येष्ठ कलाकारांनी कलेची सेवा केली आहे. कला-संस्कृती खात्याने अशा गावागावांतील कलाकारांचा शोध घेऊन ते हयात असताना त्यांचा यथोचित गौरव करावा असे ते म्हणाले.

कला गौरव पुरस्काराचे मानकरी
काल कला गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या कलाकारांत अप्पा यशवंत शेटये, दत्तात्रेय कृष्णा जोशी, नरसिंह शिवराम नागवेकर, सुदन वैकुंठ नाईक, लीला केशव कदम, उस्मान मोहम्मद खान, विजयकुमार पांडुरंग कामत (नाटक), रामनाथ अत्मा परब, भानुदास शाणू कोरगावकर, दामोदर गंगू गावडे, रत्नाकर रामा परब (भजन), चंद्रकात बाबुराव नाईक (नेपथ्य), रोहिदास तुकाराम नाईक (भजन व नाट्य), दत्ता पालकर, प्रकाश यशवंत साळगावकर, हरिदत्त सतरकर, आनंदी अनंत गावडे (लोककला), सिताराम वासू पिळर्णकर (लाकूड हस्तकला), कृष्णनाथ वासुदेव च्यारी, रामनाथ नाईक शिरोडकर, अमान्सिवो डिसोझा (संगीत), मिलिंद हरिश्‍चंद्र काकोडकर, जॉन चार्ल्स फर्नांडिस (साहित्य), हिलारिओ ब्रागांझा, ऍन्ड्रे मिस्किता, जोज फिलीप नोरोन्हा, आंतोनिओ डायस, बॉस्को मिनेझिस, श्रीमती मिका डिसोझा, जोवो फ्रान्सिस डायस (तियात्र) यांचा समावेश होता.