गोव्यात कोरोनाचे दोन बळी

>> मोर्ले व वास्को येथील रुग्णांचे निधन

>> दवसभरात ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

माजी आरोग्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह
उत्तर गोव्यातील एक माजी मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून त्यांना उपचारार्थ मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात काल दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून मोर्ले, सत्तरी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील एका ८५ वर्षीय वृद्धाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये काल पहाटे निधन झाले आहे. तर वास्को येथील ५८ वर्षीय व्यक्ती मडगाव कोविड इस्पितळात उपचार घेताना मरण पावला.

दरम्यान, राज्यात दिवसभरात नवीन ४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ७११ वर पोहोचली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

मोर्ले येथील सदर ८५ वर्षीय नागरिकाला शनिवारी जीएमसीच्या इस्पितळामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबियांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने त्यांना कोविड इस्पितळामध्ये यापूर्वीच दाखल करण्यात आलेले आहे. कुटुंबातील ही वृद्ध व्यक्ती घरीच होती. त्याची सरकारी यंत्रणेने दखल घेतली नाही. त्या वृद्धाचा आजार बळावल्याने इस्पितळात दाखल केल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले, सदर ज्येष्ठ नागरिक गेली चार वर्षे घरात अंथरुणाला खिळून होता. त्याला मधुमेह, अस्थमा व इतर व्याधी होत्या. या वृद्धाचा कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मडगाव येथील इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. या नागरिकाचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाणार नाही. तर, सरकारकडून कोविडच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात ५ कोविड सेंटर
राज्यात वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आत्तापर्यंत ५ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. म्हापसा येथील साई हॉस्टेल कोविड सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मडगाव, आंबावली,
कुडतरीत रुग्णांची वाढ
मडगाव, आंबावली, कुडतरी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. कुडतरी येथे ४ नवीन रुग्ण आढळून आले असून येथील रुग्णसंख्या २५ झाली आहे. मडगाव येथे नवीन ६ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १० झाली आहे. आंबावली येथे २ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १५ झाली आहे. जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात १२ कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले असून या वॉर्डात एकूण १८ संशयितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने ७४९ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतून ९३० नमुने तपासून अहवाल जाहीर केले आहेत. तसेच २६० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.