गोव्यात कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये

गोव्यात कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये

 

  • कर्नाटक पाठोपाठ राज्यात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाला मोठे भगदाड
  • भाजपचे संख्याबळ २७ वर; कॉंग्रेसमध्ये उरले फक्त ५
  • बाबू कवळेकर, मोन्सेर्रात दांपत्य, नीळकंठ, सिल्वेरा, डिसा, क्लाफासियो, फिलीप नेरी, इजिदोर व टोनी फुटले!

>> राजकीय घडामोडींना गोव्यात वेग
>> मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित
>> राज्यपाल तातडीने गोव्याकडे
>> गोवा फॉरवर्डवर गंडांतर येणार?
>> नवे पाहुणे अमित शहांच्या भेटीस
>> दोन तृतीयांशमुळे पक्षांतर वैध

काल झालेल्या एका मोठ्या राजकीय घडामोडीअंती गोव्यातील कॉंग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी एक स्वतंत्र गट विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करून काल सत्ताधारी भारतीय जनता पक्षात तो लगोलग विलीन केला. त्यामध्ये कवळेकर यांच्यासमवेत बाबूश मोन्सेर्रात, जेनिफर मोन्सेर्रात, टोनी फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्स, क्लाफासियो डायस, नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे.

कॉंग्रेस विधिमंडळ गटामध्ये दोन तृतियांश फूट पडल्याने गोव्यात आता कॉंग्रेसचे फक्त प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, रवी नाईक व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे पाचच आमदार उरले आहेत. या मोठ्या राजकीय घडामोडीचा सर्वांत मोठा फटका कॉंग्रेस पक्षाबरोबरच भारतीय जनता पक्ष प्रणित विद्यमान सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला बसणार असून त्या पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, तसेच त्यांच्यासमवेत मंत्रिपदे पटकावलेले विनोद पालयेकर व जयेश साळगावकर यांच्यावर आपली मंत्रिपदे गमावून बसण्याची पाळी येण्याची दाट शक्यता आहे.
गेले काही दिवस अशा प्रकारच्या मोठ्या पक्षांतराच्या हालचाली सुरू होत्या. काल दिवसभरात त्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अचानक ती रद्द केली, तसेच राज्यातील संपादकांना रात्री मुख्यमंत्र्यांच्या वतीने भोजन देण्यात येणार होते, तो बेतही रद्द झाला. अन्य नियोजित कार्यक्रमांनाही मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. वेगवान राजकीय घडामोडींमध्ये विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य नऊ कॉंग्रेस आमदारांनी काल संध्याकाळी गोवा विधानसभेत जाऊन सभापती राजेश पाटणेकर यांची भेट घेतली व आम्ही कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून भारतीय जनता पक्षामध्ये तो विलीन करीत असल्याचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही सभापती पाटणेकर यांना एक निवेदन देऊन भाजपाचे संख्याबळ आता २७ वर गेले असल्याचे त्यांना सूचित केले.
काल कॉंग्रेसमधून फुटून निघालेल्या दहा जणांच्या गटापैकी किती जणांना मंत्रिपदे मिळतील व त्यासाठी कितीजणांना मंत्रिपदांवर पाणी सोडावे लागेल हे आज स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. काल भाजपवासी झालेल्या कॉंग्रेसच्या दहा आमदारांपैकी किमान तीन ते चार आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेवढ्या जागा रिक्त कराव्या लागणार आहेत.
कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडण्यात उपसभापती व मंत्रिपदाचे इच्छुक मायकल लोबो यांनी पुढाकार घेतला होता. लोबो यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी गोवा फॉरवर्डच्या एका मंत्र्याला डच्चू दिला जाणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी पसरवले गेले होते. मात्र, गोवा फॉरवर्डचे प्रमुख व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी त्यासंबंधी प्रतिक्रिया देताना लोबो यांना मंत्रिपद मिळावे यासाठी आपण आपल्या पक्षाचे मंत्री विनोद पालयेकर यांचा बळी देऊ शकत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे लोबो व सरदेसाई यांच्यात तेढ निर्माण झाली होती. सरदेसाईंच्या या भूमिकेचा वचपा लोबोंनी बाबूश मोन्सेर्रात यांच्या मदतीने कॉंग्रेसच्या दहा आमदारांना पक्षात आणून घेतला असल्याची चर्चा आता रंगली आहे. लोबो यांच्या मंत्रिपदाचा मार्गही आता त्यामुळे सुकर झाला आहे.
बाबू कवळेकर यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपली छाप उमटवली होती. त्यामुळे तेच एक दिवस भाजपवासी होतील असे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. परंतु बाबू स्वतःतर कॉंग्रेसमधून बाहेर पडलेच, परंतु आपल्यासोबत कॉंग्रेसचे आणखी नऊ आमदार घेऊन बाहेर पडले व भाजपवासी झाले. कॉंग्रेसमधून फुटून निघून वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये विलीन होण्याचे सोपस्कार आटोपताच बाबू कवळेकर व त्यांच्या साथीदारांच्या चेहर्‍यावर हास्य विलसत होते. मोन्सेरात दांपत्य तर विशेष खूश दिसत होते. भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळ सदस्यांमध्ये मात्र चिंता निर्माण झाल्याचे दिसत होते.
काल विलीनीकरणाचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भाजपवासी झालेले सर्व दहा आमदार दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठी अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा गोव्याबाहेर होत्या, त्यांना गोव्यात परतण्याची विनंती करण्यात आल्याने त्या तातडीने गोव्याकडे रवाना झाल्या.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित असून नव्या मंत्र्यांचा शपथविधी आवश्यक असल्याने काही जुन्या मंत्र्यांना डच्चू द्यावा लागणार आहे.

विलीनीकरणास मान्यता ः सभापती
दहा जणांचा कॉंग्रेस विधिमंडळ गट कॉंग्रेसमधून फुटून निघून भाजपमध्ये विलीन झाला असल्याचे एक निवेदन बाबू कवळेकर यांनी आपल्याला दिले. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही भाजपचे संख्याबळ २७ वर गेले असल्याचे एक पत्र आपल्याला सादर केले आहे. त्यामुळे त्याला आपण मान्यता दिली असून विधिमंडळ सचिवांना येत्या विधानसभा अधिवेशनासाठी तशा प्रकारची आसन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली.

असुरक्षिततेपोटीच सरकारकडून बंडखोरांना थारा ः गिरीश
राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार असुरक्षित असल्याचे राजकीय घडामोडीमुळे उघड झाले आहे. भाजप आघाडी सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना सुध्दा कॉंग्रेस पक्षाचे १० आमदार फोडण्याचे अनैतिक काम केले, अशी टीका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केली.
भाजपच्या ब्लॅकमेलिंग व दबाव तंत्रामुळे कॉंग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करावा लागला आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर चालविला आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.

विजय सरदेसाईंची नाराजी
कॉंग्रेसमधून एक गट फुटून निघणार असल्याची कुणकुण लागताच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी दुपारी आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी म्हणजे माकडे असून ती मिळेल तेथे उडी मारण्याची संधीच शोधत आहेत’ असे ते उद्गारले होते. कॉंग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते असे विचारले असता ते त्या पक्षाच्या नेत्यांनाच विचारा असे ते उत्तरले होते. मात्र, तसे काही करताना आपल्यालाही विचारायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. आम्ही मनोहर पर्रीकर यांच्याशीच नव्हे, तर भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आता अशी कोणती समीकरणे बदलली आहेत की हे सगळे करावे लागते आहे असा सवाल त्यांनी केला.

गोमंतकीयांच्या भल्यासाठी पाऊल ः मुख्यमंत्री
आपले सरकार हे गोमंतकीयांचे व गोमंतकीयांच्या भल्यासाठी वावरणारे सरकार असून गोमंतकीयांना जो त्रास होत होता, तो होऊ नये यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. गोमंतकीयांना काय त्रास होत होता असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, ते तुम्हालाच ठाऊक असायला हवे. तुम्ही तसा सर्व्हे करायला हवा होता असे संदिग्ध उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी गुरुवारी निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डला मंत्रिमंडळातून वगळणार की काय याबाबत आपला काही निर्णय झाले ला आहे का असे विचारले असता अद्याप तसा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी किती वर्षे विरोधी पक्षात राहू? ः कवळेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्याबरोबरच मतदारसंघांच्या विकासासाठी कॉंग्रेस पक्षाच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा दावा चंद्रकांत कवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला. गेली कित्येक वर्षे केवळ विरोधात राहिल्याने मतदारसंघाचा विकास करू शकलो नाही. नव्याने निवडून आलेल्या आमदारांना सुध्दा विकासकामांसाठी त्रास सहन करावे लागत होते. मतदारसंघातील युवावर्गाला रोजगार मिळवून देऊ शकलो नाही. आणखी किती वर्षे विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील लोकांवर अन्याय करायचा? असेही कवळेकर उद्गारले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी कॉंग्रेसच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये रीतसर प्रवेश केल्याचे ते म्हणाले.

दहा आमदारांचा गट
अमित शहांच्या भेटीस
भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कॉंग्रेसच्या १० आमदारांचा गट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यासाठी मध्यरात्री नवी दिल्लीला रवाना होणार आहे, अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. भाजपचा सदस्य या नात्याने मुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याची आपली जबाबदारी आहे. केंद्रातील नेतृत्वाकडून मान्यता घेतल्यानंतर कॉंग्रेसच्या दोन तृतीयांश आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. १० कॉंग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढाकार घेतला. आपण केवळ साहाय्य केले आहे, असे लोबो यांनी सांगितले. आपल्याला मंत्रिपद देण्याबाबत मुख्यमंत्री, पक्ष संघटना निर्णय घेईल. मंत्रिपद मिळविण्यासाठी नव्हे तर मुख्यमंत्र्याचे हात बळकट करण्यासाठी कॉंग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

रवींचा कित्ता गिरवला
गोव्याच्या राजकीय इतिहासात सहकार्‍यांनिशी पक्षांतर करणारे बाबू कवळेकर हे दुसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. यापूर्वी रवी नाईक यांनी विरोधी पक्षनेते असताना अशाच प्रकारे पक्षांतर केले होते.

मोन्सेर्रात दांपत्य भाजपात
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर यांना पराभूत करून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बाबूश मोन्सेर्रात यांची कालच्या पक्षांतरामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात आहे. ते व त्यांची पत्नी व ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात आता भाजपवासी झाले आहेत!