गोव्याच्या मुलांनी टेबल टेनिसमध्येही शिखर गाठावे

धेंपो उद्योगसमूहाने आपल्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीला आता टेबल टेनिसचीही जोड दिली असून अल्टिमेट टेबल टेनिस लीगमधील ‘गोवा चॅलेंजर्स’ या संघाची ९० टक्के मालकी प्राप्त केली आहे. यासंदर्भात ऑगस्टो रॉड्रिग्स यांनी धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्याकडून त्याविषयी अधिक जाणून घेतले, त्याचा हा गोषवारा –

‘गोवा चॅलेंजर्स’चे प्रणेते श्रीनिवास धेंपो यांची आकांक्षा

‘‘टेबल टेनिस हा धेंपो उद्योग समूहाशी जोडला गेलेला चौथा क्रीडाप्रकार ठरला आहे. आम्ही या खेळाची निवड काळजीपूर्वक केलेली आहे, कारण माझ्यासाठी क्रीडाक्षेत्राचे मोल केवळ व्यवसाय म्हणून नसून त्याच्याशी आमची आवड जडलेली आहे’’ अशा शब्दांत धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी आपल्या भावना नवप्रभेपाशी व्यक्त केल्या.

धेंपो उद्योगसमूहाने आजवर फुटबॉल, क्रिकेट आणि बुद्धिबळ या खेळांशी आपले नाते जोडले होते. ‘‘टेबलटेनिस या क्रीडाप्रकाराशी आम्ही प्रथमच जोडले जात आहोत आणि आमच्या त्याच्याशी जडलेल्या या बांधिलकीतून या खेळाविषयीची आवड आपल्या नव्या पिढीमध्ये निर्माण होईल’’ असा विश्वास श्री. धेंपो यांनी यावेळी व्यक्त केला.
एम्पावर्जी चॅलेंजर्समध्ये श्रीनिवास धेंपो यांनी ९० टक्के गुंतवणूक केली असून त्या संघाचे नाव ‘गोवा चॅलेंजर्स’ असे करण्यात आले आहे. यंदाच्या अल्टीमेट टेबल टेनिस (यूटीटी) स्पर्धेमध्ये हा संघ उतरणार आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.
भारतातील सहा राज्यांचे प्रतिनिधित्व सहा संघ या स्पर्धेमध्ये करीत असून गोवा, कोलकाता, चेन्नई, पुणे, दिल्ली व मुंबईचा त्यात समावेश आहे.
‘‘युवा क्रीडापटूंसाठी फुटबॉल आणि बॅडमिंटनमधील लीग स्पर्धांमुळे संधी उपलब्ध झाली. मला वाटते टेबलटेनिसमध्ये देखील ती आता उपलब्ध होईल कारण हा खेळ गोव्यातील सर्व शाळांमध्ये मुले खेळत असतात’’ असे श्री. धेंपो म्हणाले. आपल्या गोव्याच्या मुलांना याची एक दिवस मदत होणार असल्याने त्यात गुंतवणूक का करू नये? असे आपल्याला वाटल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘यूटीटी स्पर्धेमध्ये जगभरातील सर्वोत्तम टेबल टेनिस खेळाडू उतरत असतात. ही स्पर्धा यावर्षी दिल्लीत होणार आहे, परंतु मी आयोजकांना जेव्हा शक्य असेल तेव्हा ही स्पर्धा गोव्यात घेण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना सर्वोत्तम खेळ पाहण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल,’’ असे ते म्हणाले.

गोवा चॅलेंजर्सने जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या चेंग – चिंगला आपल्यात घेतले असून भारतातील तिसर्‍या आणि सातव्या क्रमांकावरील दोघा खेळाडूंचाही समावेश केलेला आहे. नामांकित भारतीय प्रशिक्षक अरुप बसाक हे गोवा चॅलेंजर्सच्या तांत्रिक संघाचा भाग असून एलिना टिमिना या नेदरलंडच्या प्रशिक्षकांचाही त्यात समावेश असल्याचे धेंपे यांनी सांगितले.

‘‘माझ्या गुंतवणुकीचा परतावा एका रात्रीत मिळणार नाही हे मला माहीत आहे, परंतु काही वर्षांत तरी आपण गोव्यातील खेळाडूंना आपल्या संघाचा भाग बनवू शकू’’ अशी आकांक्षा धेंपो यांनी व्यक्त केली. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू उतरतील अशी अपेक्षा असून त्यामुळे गोव्यामध्ये टेबलटेनिस बद्दल उत्साह वाढेल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘‘प्रत्येक संघामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि नंतरच्या टप्प्यामध्ये युवा गटातील खेळाडूंचा समावेश केला जाईल अशी अपेक्षा आहे. आपल्याला काही सर्वोत्तम खेळाडू लाभलेले आहेत आणि ते केवळ चांगली कामगिरी बजावतीलच असे नव्हे, तर गोमंतकीय खेळाडूंसाठीही ते प्रेरणास्थान ठरतील.ग़ोमंतकीय मुलांनी टेबलटेनिसमध्ये भव्यदिव्य कामगिरीचे शिखर गाठण्याची आकांक्षा धरावी’’ अशी अपेक्षाही श्री. धेंपो यांनी यावेळी व्यक्त केली.