गोव्याच्या कॅसिनोंसाठी नेपाळमध्ये नोकरभरती

>> वाल्मिकी नाईक यांचा आरोप

गोव्यातील कॅसिनोंसाठी नेपाळ येथे नोकर भरती केली जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे पणजी मतदारसंघातील उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

कॅसिनोंमुळे गोवा राज्य जुगाराचे मोठे केंद्र बनले आहे. राज्य सरकारचे कॅसिनोंवर कोणतेही नियंत्रण नाही. कॅसिनो मालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने कॅसिनोंबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.

राज्य सरकारकडून कॅसिनोंकडून महसूल आणि रोजगार निर्माण होत आहे, असा दावा केला जात आहे. परंतु, स्थानिकांना किती प्रमाणात रोजगार मिळतो याबाबत काहीच माहिती जाहीर केली जात नाही. कॅसिनोंवर केवळ परराज्यातील युवा वर्गाला जास्त प्रमाणात रोजगार मिळत आहे. मांडवी नदीतील एका कॅसिनोसाठी नेपाळ येथे नुकत्याच नोकर भरतीसाठी मुलाखती घेण्यात आल्या आहे. नोकर भरतीच्या जाहिरातीवर देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकाशी स्वतःही संपर्क साधला होता, असेही नाईक यांनी सांगितले.
कॅसिनोंकडून साधारणतः अडीच ते तीनशे कोटीच्या आसपास महसूल प्राप्त होत आहे. कॅसिनो मालकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. कॅसिनोकडून साधारण तीनशे ते चारशे कोटीचा महसूल मिळायला हवा होता. गेमिंग कमिशनरची नियुक्ती करण्यात अपयश आले आहे. कॅसिनो धोरण आणि गेमिंग कमिशनरची नियुक्ती करण्याचे आश्‍वासन हवेत विरले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

काणकोण, सत्तरी भागातील लोकांना रस्ता, पाणी सारख्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारकडे निधी नाही. तर, कॅसिनो मालकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध आहे, अशी टीका आपचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी केली.