गोव्याच्या किनार्‍यांवर आढळणार्‍या डांबरगोळ्यांमागे तीन शक्यता : जावडेकर

गोव्याच्या किनार्‍यांवर आढळणार्‍या डांबरगोळ्यांमागे तीन शक्यता : जावडेकर

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर पावसाळ्यात आढळून येणारे काळे डांबरगोळे हे समुद्रतळातील नैसर्गिक प्रक्रियेमुळे, समुद्रातील तेल विहिरींमुळे किंवा समुद्रातून ये – जा करणार्‍या जहाजांमुळे आलेले असू शकतात, अशा शक्यता केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.
नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात दरवर्षी गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर हे डांबरगोळे आढळून येतात. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) गोव्यातील किनार्‍यांवर हे डांबरगोळे का येतात यासंबंधी अभ्यास केला आहे, असे जावडेकर यांनी नमूद केले. या संशोधनाअंती वरील तीन निष्कर्ष काढण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
डांबरगोळ्यांतील हायड्रोकार्बनमुळे सागरी संपत्तीला नुकसान पोहोचू शकते आणि किनार्‍यांवरील लोकांवरही परिणाम संभवू शकतो, अशी भीती या अभ्यासात व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या डांबरगोळ्यांचा परिणाम पश्‍चिम किनारपट्टीपासून वायव्य किनारपट्टीवर गुजरातपर्यंत आढळून येत असतो असे जावडेकर यांनी सांगितले. गोव्यात उत्तर गोव्यातील कळंगुट, सिकेरी आणि इतर किनार्‍यांवर व दक्षिण गोव्यातील वेळसांव, बेताळभाटी, कोलवा, बाणावली, वार्का, आगोंद या किनार्‍यांवर डांबरगोळ्यांचे प्रमाण मोठे असते असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रदूषणकारी घटकांचे मूळ शोधण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत अशी माहिती जावडेकर यांनी सभागृहाला दिली.

 

Leave a Reply