गोव्याचे कॉस्ता ईस्ट बंगालचे प्रशिक्षक

ईस्ट बंगालने आगामी मोसमासाठी गोव्याच्या फ्रान्सिस्को जुझे ब्रुटो दा कॉस्ता यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. स्पेनच्या मारिओ रिव्हेरा यांची जागा कॉस्ता घेणार आहेत. रिव्हेरा यांच्या प्रशिक्षकपदाखाली ईस्ट बंगालने मागील मोसमात आय लीगचे उपविजेतेपद मिळवले होते.

२०१६च्या आयएसएस मोसमात कॉस्ता हे नॉर्थईस्ट युनायटेड संघाचे मुख्य प्रशिक्षक निलो विंगाडा यांचे साहाय्यक होते. वयाच्या विसाव्या वर्षी सालसेत एफसी पासून त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले होते. साळगावकर एससीच्या युथ डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. भारताच्या १४, १७, १९ वर्षांखालील संघांना तसेच एआयएफए एलिट अकादमीला प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

एएफली ‘अ’ प्रमाणपत्र तसेच एएफसी प्रो प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. आगामी मोसमात ईस्ट बंगालचा संघ आय लीगमध्ये की आयएसएलमध्ये खेळेल हे अजून निश्‍चित नाही.

कैस कॉर्पोरेशनसोबतचा करार संपल्यानंतर ईस्ट बंगालला त्यांचे क्रीडा अधिकार पुन्हा मिळाले आहेत. कोलकातामध्ये जन्मलेले व सिंगापूरस्थित उद्योजक प्रसून मुखर्जी यांच्यासोबत क्लबची बोलणी सुरू आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ‘रेड अँड गोल्ड’ म्हणून परिचित ईस्ट बंगालसाठी पुरस्कर्ते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.