ब्रेकिंग न्यूज़

गोवा मुक्ती लढ्याचे प्रेरणास्त्रोत

  • शंभू भाऊ बांदेकर

२३ मार्च रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांची १०८ वी जयंती. गोवा मुक्तीलढ्याचे प्रेरणास्त्रोत व समाजवादाची प्रेरक शक्ती असलेल्या डॉ. लोहियांविषयी…

डॉ. राममनोहर लोहिया यांचे गोवा मुक्तीलढ्याशी असलेले आतूर व प्रेरणादायी नाते लक्षात घेऊन स्वा. सै. नागेश करमली यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. लोहिया यांच्या जन्माला २३ मार्च २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण होत होती. त्यामुळे एक डॉ. राममनोहर लोहिया जन्मशती उत्सव समिती स्थापन करण्यात आली होती. मला या समितीवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी लाभली होती. या समितीतर्फे मडगाव येथील लोहिया मैदानावर आज २३ मार्च रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय वर्षभर अनेक तालुक्यांमध्ये नामवंत विचारवंतांना आमंत्रित करून लोहियांच्या जीवन व कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता.

आजही २३ मार्चला क्रांतिदिन समितीतर्फे मडगावच्या लोहिया मैदानावर डॉ. राममनोहर लोहिया यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी डॉ. लोहिया यांच्या क्रांतिकारी व परखड विचारांना उजाळा देण्यात येणार आहे. आनंददायी अशीच ही गोष्ट म्हणावी लागेल.
१९४५ साली डॉ. टी. बी. कुन्हा या स्वातंत्र्यसेनानींच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे ‘गोवा यूथ लीग’ची स्थापना करण्यात आली होती. ही एक लढाऊ संघटना होती. या संघटनेत काम करणारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गोवा मुक्तीच्या लढ्यात सक्रीय होते. गोव्याचा मुक्तीलढा हा भारताच्या स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व होते. गोवा मुक्त झाल्यानंतर खर्‍या अर्थाने संपूर्ण भारत स्वतंत्र झाला असता. या संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे असंख्य देशभक्त कार्यरत होते, त्यापैकी एक झुंजार सेनानी म्हणजे डॉ. राममनोहर लोहिया हे होते. १९४२ च्या क्रांतियुद्धात इंग्रज सरकारच्या नाकी नऊ आणणारे डॉ. लोहिया १९४६ च्या जूनच्या दुसर्‍या आठवड्यात विश्रांतीसाठी आपले गोमंतकीय मित्र डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्याकडे त्यांच्या केपे येथील निवासस्थानी आले होते.

यावेळी गोव्यातही मुक्ती चळवळीसाठी गुप्त बैठका घेणे, पत्रके वाटणे, मुक्तीसाठी लोकजागृती करणे इ. कामे सुरू होती. या कामात त्यावेळी पां. पु. शिरोडकर, विश्वनाथ लवंदे, पुरुषोत्तम काकोडकर, रामा हेगडे आदी आघाडीवर होते. गोव्यात त्यावेळी नागरिकांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते व यासाठी जाहीरपणे संघटनाही उभी करता येत नव्हती. डॉ. लोहिया यांच्या कानावर ही गोष्ट आली. मग कुठली विश्रांती? गोवा मुक्तीनंतर खरी विश्रांती असा चंग त्यांनी बांधला आणि ते बाहेर पडले. तो दिवस होता १८ जून १९४६. या दिवशी मडगावला भाषणबंदी मोडून सत्याग्रह करीत त्यांनी स्वतःला अटक करून घेतली आणि या त्यांच्या क्रांतिमय कार्यामुळे तो दिवस विमुक्त गोव्याच्या इतिहासात ‘क्रांतिदिन’ म्हणून मानला गेला.
जर डॉ. लोहियांनी हे धाडस केले नसते तर गोवा मुक्तीलढा अधिक तीव्र झाला नसता व १९६१ ची गोवा मुक्ती आणखी पुढे गेली असती. म्हणून गोवा सरकार आणि स्वातंत्र्य सैनिक संघटना १८ जून हा दिवस क्रांतिदिन म्हणून साजरा करतात व डॉ. लोहियांच्या कार्याला मानवंदना देतात.

डॉ. राममनोहर लोहिया यांचे गोवा मुक्तीलढ्याचे प्रेरणास्त्रोत म्हणून जसे देशाभिमानी गोव्यात कौतुक करतात व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, त्याचप्रमाणे एक समाजवादी नेते म्हणून त्यांनी देशात समाजवादाची बीजे खोलवर रुजावीत व देशातील दबलेल्या, छळलेल्या, पिडलेल्या लोकांना मुक्त श्‍वास घेता यावा म्हणून जे योगदान दिले आहे, तेही अत्यंत मोलाचे असे आहे. डॉ. लोहिया यांनी आपल्या देशात समाजवादाचा कार्यक्रम तपशिलात जाऊन मांडण्याचे काम केले. भांडवलदार कामगारांचे शोषण करतात. जमीनदार, सावकार यांच्याकडून गरीब, मजूर, कुळे, शेतकरी यांचे शोषण होते हे सारे मुळापासून थांबले पाहिजे व त्यासाठी आवश्यक त्या चळवळी चालवल्या पाहिजेत, अशी समाजवाद्यांची भूमिका होती. ही कामे संघटितपणे करता यावीत म्हणून त्याकाळी ज्या बत्तीस तरुणांनी ‘कॉंग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना केली त्यात डॉ. लोहिया यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी आपल्या इतर साथीदारांसमावेत तन, मन, धनाने कार्यरत राहून समाजवादाचा फायदा तळागाळापर्यंतच्या लोकांना मिळावा म्हणून अहर्निश प्रयत्न केले. समाजवादाची चळवळ उभारताना ‘समाजवाद’ म्हणजे तरी काय, याचे सोपे व सुटसुटीत उत्तर त्यांनी दिले होते, ते समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले होते, ‘समाजवाद म्हणजे समता व संपन्न समाजातील सर्व माणसांच्या प्राथमिक गरजा चांगल्या रितीने भागविता येतील इतके उत्पादन होत राहिले पाहिजे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा विवेकाने वापर केला गेला पाहिजे.

समाजवादाचा प्रचार आणि प्रसार करताना डॉ. लोहियांनी जे अहिंसेचे व शांततेचे तत्त्व अखेरपर्यंत आचरणात आणले, तेही समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणत असत, ‘आमची मते इतरांनी मान्य करावीत यासाठी शौर्याचा किंवा दंडशक्तीचा उपयोग करता कामा नये. जे काही करायचे ते शांततामय मार्गाने केले गेले पाहिजे. आवश्यकतेनुसार गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे आत्मक्लेशाचा मार्ग पत्करायचा, पण दुसर्‍यावर हात टाकायचा नाही.’

समाजवादात, जातीव्यवस्थेत जुलून, जबरदस्ती, अत्याचार यांना मुळीच थारा देता कामा नये. नपेक्षा समाजवादाच्या नावाखाली असमानता व विषमता फैलावेल, असा इशारा देताना डॉ. लोहिया म्हणाले होते, ‘भारतात चालत असलेल्या जन्माधारी जातीय व्यवस्थेला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.’ ही व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली गेली पाहिजे. ज्या जाती-जमातींना परंपरेने शिक्षण घेणे तसेच स्वतःच्या नावाने संपत्ती धारण करणे या सारखे मानवाधिकार नाकारण्यात आले होते त्यांना विकासासाठी विशेष संधी दिली गेली पाहिजे. इतकेच नव्हे तर समाजाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना निर्णायक स्थान म्हणजे सत्तास्थानातील साठ टक्के जागा त्यांना मिळतील अशी व्यवस्था केली पाहिजे, तर देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला असे म्हणता येईल.’
त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन!