ब्रेकिंग न्यूज़

गोवा मुक्तिलढ्यातील क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी : मोहन रानडे

  • शंभू भाऊ बांदेकर

श्री. मोहन रानडे यांच्या निधनाने शापित, पीडित, दुर्बलांचा, महिलांचा, हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ कायमचा पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कार्यातून आम्हास प्रेरणा मिळो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्राप्त होतो, हीच परमेश्‍वरापाशी विनम्र प्रार्थना!

२५ जून रोजी पहाटे साडेपाच वा. मला स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे पदाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि भाई ताम्हणे यांचा मोहन रानडे यांची प्राणज्योत मालवल्याचा फोन आला. भ्रमणध्वनीवर त्यांचे नंबर दिसले आणि ते काही सांगण्याआधीच मला सारे काही कळून चुकले. आठवड्यापूर्वीच मी पुण्यास जाऊन त्यांची खबर घेतली होती. गोवा मुक्तिलढ्यातील त्या थोर स्वातंत्र्यसेनानीची कृश आणि निस्तेज देहयष्टी पाहून माझे डोळे अश्रूंनी भरून आले होते.

चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी विमलताई रानडे यांचे निधन झाल्यापासून ते एकाकी जीवन जगत होते. आजारपणामुळे त्यांच्या प्रवासावर बंधन आले होते खरे, पण घरात बसून ते स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे कार्य पाहत होते. पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करत होते. गेले सहा महिने ते विविध प्रकारच्या व्याधींनी त्रस्त होते, पण त्यांनी धीर सोडला नव्हता. संस्थेच्या कार्याबरोबरच त्यांचे वाचन व लेखन चालू होते. स्वा. सै. विश्‍वास देसाई, स्वा. सै. श्यामसुंदर कळंगुटकर आणि मी अधूनमधून त्यांच्या पुणे येथील वडगाव-बुद्रूकच्या निवासस्थानी जात असू. आम्हाला बघितल्यावर त्यांना आनंद होई. गोव्याबद्दल गप्पा रंगत. मी त्यांच्या गोवा मुक्तिलढ्यातील कार्याबद्दल बोलते केले की मनापासून सर्व विस्तृतपणे सांगत. आपण काय केले यापेक्षा इतरांनी आपल्याला कसे सहकार्य केले, इतरांनी कशी मर्दुमकी गाजवली यावर त्यांचा जास्त भर असे. तेलू मास्कारेन्हास, पीटर आल्वारीस, बाळकृष्ण भोसले, विश्‍वनाथ लवंदे, बाळा मापारी आणि डॉ. राम मनोहर लोहिया आदींच्या मुक्तिलढ्यातील हिंसक आणि अहिंसक कार्याबद्दल आदराने सर्वकाही सांगत. वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग हे त्यांचे आदर्श. त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने सर्वकाही सांगत. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील काही ज्वलंत प्रसंगांबद्दल, त्यांच्या पोर्तुगालमधील कैदेबद्दल, जुलमी राजवटीकडून त्यांचा झालेला छळ याबाबत ते अभावानेच बोलत. जास्तच आग्रह केला तर मी ‘सतीचे वाण’ यामध्ये ते सगळे लिहिले आहे, असे सांगत. माझी थोरली मुलगी सौ. शिल्पा विजयनाथ कवळेकर ही बार्देशमधील रेवोडा सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिका असताना माझ्या विनंतीवरून ते एकदा त्या शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे आपल्या जीवनातील, मुक्तिलढ्यातील प्रसंग जिवंत करून त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिकांना तर मंत्रमुग्ध केलेच; पण काही प्रसंगांचे तिर्‍हाईतपणे वर्णन करून उपस्थितांचे डोळे अश्रूंनी पाणावून सोडले होते. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपण अमुक केले, आपण तमुक केले यापेक्षा आपल्या सहकार्‍यांनी, सत्याग्रहींनी कशी मर्दुमकी गाजवली याबद्दल ते आस्थेने सांगत.

गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त झाला, पण त्यांची मुक्तता त्यानंतर सात वर्षांनी झाली. त्यांनी सुटून येऊन गोमंतभूमीत पदार्पण केले, त्यावेळी त्यांचे गोमंतकीयांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. गोव्यात आल्यावर त्यांनी येथील समाजकारण, राजकारण यात सक्रियपणे भाग घेतला. येथील शेतकर्‍यांचे प्रश्‍न, शिक्षकांचे प्रश्‍न हिरिरीने मांडले. शिक्षणसंस्था स्थापन करून आपल्या पत्नीच्या सहकार्याने शिक्षणक्षेत्रात भरीत कार्य केले. झोपडवस्तीतील गरीब आणि गरजू बालकांसाठी आपण राहत असलेल्या चिंबल येथे बालवाडी/अंगणवाडी चालवली. तसेच गरीब, विधवा, गरजू महिलांच्या रोजगारासाठी लघुउद्योग सुरू केला. त्या महिलांनी तयार केलेले पापड, लोणची, मसाले आदी वस्तू दुकानदारांपर्यंत स्कूटरने पोचवण्याचे कामही केले आणि हे सारे त्यांनी अत्यंत निरपेक्षपणे व नि:स्वार्थीपणे केले. गोव्यात आल्यावर त्यांनी वकिली सनद मिळवली व ज्या गोरगरीब बहुजन समाजावर अन्याय, अत्याचार, जुलूम झाले असतील त्यांच्या रक्षणासाठी काळा कोट घालून कोर्टाची पायरीही चढले. त्यासाठी अशिलाने न मागता काही दिले तर घेतले, नपेक्षा त्याची वाच्यता कधी केली नाही. गोवा सोडून ते पत्नीसह कायमच्या वास्तव्यासाठी पुणे येथे गेले. त्यांची पत्नी विमल जमदग्नी ही मूळ पुण्याची. तेथे गेल्यावर पत्नीच्या सहकार्याने त्यांनी कोणते काम प्रथम केले असेल तर स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेची स्थापना. स्वामी विवेकानंद हे त्यांचे एक आदर्श होते. ते स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल फार आदराने सांगत की, स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर सुपुत्र आहेत, सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. ते म्हणत आपल्या दरिद्री, दुर्बल, अशिक्षित अशा समाजबांधवांची सेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. आपल्या समाजबांधवांच्या अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्या आहेत; पण शिक्षणाच्या जादूने सुटणार नाही अशी एकही समस्या नाही. त्यांना खरेखुरे शिक्षण द्या. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार शिरोधार्य मानून त्यांनी २००१ साली पुणे येथे स्वामी विवेकांनद जीवनज्योत संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि ‘मला माझ्या बांधवांना मदत करू दे’ हे स्वामी विवेकानंदांचे वचन संस्थेचे बोधवाक्य ठरविले. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पैशांअभावी ज्यांचे शिक्षण अडले आहे अशा गरीब गरजू परंतु हुशार विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे. याशिवाय समाजातील आजारी, अपंग लोकांना वैद्यकीय उपचारांसाठी संस्था मदत करते तसेच निराधार, पीडित महिलांनादेखील पुनर्वसनासाठी मदत केली जाते. गेली १९ वर्षे हे काम अव्याहतपणे चालू आहे. ते संस्थेचे अध्यक्ष आहेत यातच सगळे आले, असे मानून आर्थिक मदतीचा ओघ सतत चालू असतो. ते स्वत: स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारे मानधन याच संस्थेसाठी सुरुवातीपासून खर्च करीत आलेले आहेत. शिवाय माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक यांच्याकडूनही आर्थिक मदतीचा हात दिलेला आहे.

आज त्यांच्या जाण्याने ही संस्था पोरकी झाली आहे हे खरे, पण संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री रमेशचंद्र जतकर (माजी संचालक माहिती व प्रसिद्ध खाते, गोवा), मधुकर देशपांडे, ऍड. एन. गणेश कुलकर्णी, भाई ताम्हणे आणि डी. पाटील, प्रा. सौ. सुचित्रा कुलकर्णी, प्रा. सौ. हेमलता कुलकर्णी यांच्या सहकार्याने ती संस्था जोमाने कार्य करील यात शंका नाही.

माझे सौभाग्य हे की या संस्थेतील माझ्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागामुळे श्री. रानडे यांचा संस्थेच्या २०१७ सालच्या स्नेहमेळाव्यात माझ्या हस्ते सन्मान करण्यात आला. आमच्या पूर्वाश्रमीच्या दलित संघटनेतर्फे (आणि आताची समाजोन्नती संघटना) गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव दिनी १९ डिसेंबर २०११ साली श्री. रानडे यांना तत्कालीन सभापती प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले होते. तसेच संघटनेतर्फे आयोजित आणखी एका कार्यक्रमात श्री. रानडे यांचा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. तसेच श्री. रानडे यांच्या हस्ते स्वा. सै. कांता घाटवळ व स्वा. सै. शारदाताई सावईकर यांचा सन्मान करण्यात आला होता.

कै. मोहन रानडे यांच्या निधनाने गोवा मुक्तिलढ्यातील एक जाज्वल्य क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानीला जसे आपण कायमचे मुकलो आहोत, त्याप्रमाणे आमची संघटना एका समर्थ मार्गदर्शनाला कायमची मुकली आहे. त्यांच्या निधनाने शापित, पीडित, दुर्बलांचा, महिलांचा, हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ कायमचा पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कार्यातून आम्हास प्रेरणा मिळो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्राप्त होतो, हीच परमेश्‍वरापाशी विनम्र प्रार्थना!