गोवा माईल्स ऍपला भाजपचा पूर्ण पाठिंबा

>> पत्रकार परिषदेत दामोदर नाईक यांची माहिती

गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवा प्रकरणी भाजपचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऍप आधारिक टॅक्सी सेवेबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे.

गोव्याची टॅक्सी सेवेच्या प्रश्‍नावरून देश-विदेश पातळीवर होणारी बदनामी टाळण्यासाठी ऍप आधारित टॅक्सी सेवा आवश्यक आहे, अशी प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाने गोवा माईल्स हा टॅक्सी ऍप तयार केला आहे. राज्य सरकारचे या ऍपवर पूर्ण नियंत्रण आहे. या ऍपखाली १४०० टॅक्सी चालकांनी नोंदणी केली आहे. या ऍप आधारित टॅक्सी सेवेमुळे राज्य सरकारला जीएसटीच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत आहे, असे नाईक यांनी सांगितले. या ऍपबाबत सामंजस्याच्या अभावामुळे काही जणांकडून विरोध केला जात आहे. ऍप आधारित टॅक्सी सेवेला नाहक विरोध केला जात आहे. ऍप आधारित टॅक्सी सेवेसाठी सरकारने एका समितीची नियुक्ती केली आहे.

तसेच सरकारने टॅक्सी चालकांना सुविधा देण्यासाठी वेल्फेअर फंड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या फंडात सरकारकडून १ रुपया आणि ऍप धारकांकडून १ रूपया जमा केला जाणार आहे. या फंडातून टॅक्सी चालकांकडून विविध योजना राबविण्यात येणार आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.