ब्रेकिंग न्यूज़

गोवा माईल्सबाबत वाद चिघळण्याची शक्यता

गोवा पर्यटक टॅक्सी चालक व गोवा माईल्स टॅक्सी चालकांमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. काल बाणावली, कोलवा किनारपट्टी भागांतील व पंच तारांकित हॉटेल प्रवाशांची भाडी मारणार्‍या पर्यटक टॅक्सी मालकांनी आमदार चर्चिल आलेमाव यांची भेट घेतली.

चर्चेनंतर आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले, की काल गोवा माईल्स टॅक्सीपैकी एकही टॅक्सी कोलवा येथे फिरकली नाही. ते गोमंतकीय असल्यास येथे दिसले असते. गोवा सरकार गोव्याच्या सुपुत्रांवर अन्याय करीत आहे. तारांकित हॉटेलांच्या प्रवाशांची भाडी मारण्यास वाहतूक खात्याने अधिकृतपणे परवाना गोवा पर्यटक टॅक्सीना दिलेला आहे. असे असताना पर्यटन महामंडळ त्यांच्यावर अन्यया करते. गोवा सरकारने गोवा माईल्सना शहरात भाडी मारण्यास परवाना द्यावा, किनारपट्टी भागांत देवू नये असेही त्यांनी सांगितले.

येत्या शुक्रवार दि. ७ रोजी सायंकाळी ४ वाजता किनारपट्टी भागांतील पर्यटक टॅक्सी चालकांची बैठक होणार असल्याचे आलेमाव यांनी सांगितले. त्यावेळी पुढील कार्यक्रम ठरविण्यात येईल.