ब्रेकिंग न्यूज़

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यंदापासून अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार

>> कृतज्ञता पुरस्कार सुमित्रा भावे यांना जाहीर

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला यंदा १२ वर्षे पूर्ण झाल्याने आता महोत्सवानिमित्त काही पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ‘फक्त मराठी’ या वाहिनीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दरम्यान, दरवर्षी देण्यात येणारा कृतज्ञता पुरस्कारही देण्यात येणार असून प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यंदापासून चतुरस्त्र अभिनेता व अभिनेत्री, मराठी चित्रपट सृष्टीसाठी विशेष योगदान दिलेल्या व्यक्तीसाठी विशेष गौरव पुरस्कार, ‘फक्त मराठी’ या वाहिनीच्यावतीने अभिमान पुरस्कार व समाजासाठी योगदान दिलेल्या मराठी कलाकारासाठी समाजरत्न पुरस्कार तसेच कला गौरव पुरस्कार हे पुरस्कार देण्यात येतील. महोत्सवासाठीचे पॅनेल एकमताने या पुरस्कारांसाठीची निवड करतील.

तीन तासांचा मनोरंजन कार्यक्रम
यंदा ‘फक्त मराठी’ या मराठी वाहिनीतर्फे उद्घाटन सोहळ्याला जोडून तीन तासांचा धमाल असा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ‘फक्त मराठी’ या मराठी वाहिनीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे यंदा उद्घाटन सोहळ्यानंतर मराठी चित्रपट महोत्सवासाठीची ओपनिंग फिल्म दाखवण्यात येणार नसल्याचे व्हिन्सन वर्ल्डतर्फे बोलताना ज्ञानेश मोघे यांनी सांगितले.
महोत्सवात मुळशी पॅटर्न, बस्ता, मोगरा फुलला, होडी, भोंगा, इमागो, मिरांडा हाऊज, आरोव, पाणी, नाळ, म्होरक्या, कागर, दिठी, कत्ला बित्ला, सूरसप्ता, व्हेडिंगचा सिनेमा, अहिल्या, डोंबिवली रिटर्न्स, चुंबक तसेच पोस्टमार्टेम, गढूळ हे दोन लघुचित्रपट दाखवण्यात येणार आहेत.