गोवा मराठी चित्रपट महोत्सव… दहा पावलांचा प्रवास

– उदय नरसिंह महांबरे

‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करताना तारेवरची कसरत करावी लागते. सुरुवातीच्या काही वर्षांत जरी सरकारने थोडीफार मदत महोत्सवाला केली असली तरी आता या महोत्सवाचा भार प्रायोजकांच्या सहकार्याने स्वतः ‘विन्सन वर्ल्ड’ ही संस्था स्वतःच्या खांद्यावर पेलते. शासकीय मदतीविना सतत दहा वर्षे सलगपणे हा महोत्सव गोव्यात घडवून आणणारे संजय शेट्ये व त्यांचे बंधू श्रीपाद शेट्ये म्हणूनच अभिनंदनास पात्र ठरतात.

 

आजपासून दहा-बारा वर्षे मागे जाऊन जर आपण बघितले तर आपल्याला काय दिसून येईल? गोव्यात मराठी सिनेमा व नाटकांचे प्रेक्षक घरोघरी. गावागावांतील हौशी नाट्यप्रेमींनी सादर केलेल्या नाटकांव्यतिरिक्त मराठी रंगभूमीवरील आणि महाराष्ट्रातील प्रथितयश अशा संस्थांनी सादर केलेले व्यावसायिक नाट्यप्रयोगही पाहण्याची संधी इथल्या प्रेक्षकांना मिळत होती. परंतु चांगले तसेच नवीन मराठी सिनेमा पाहणे मात्र इथल्या रसिकांच्या नशिबात नव्हते. गोव्यातील चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होणे विरळाच होते. त्यामुळे ज्यांना शक्य असेल ते पुणे, कोल्हापूर किंवा मुंबईत जाऊन आपली हौस भागवत होते.
गोव्यात आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव साजरा होऊ लागल्यापासून काही मराठी सिनेमा या महोत्सवामध्ये प्रदर्शित होऊ लागले. त्यामुळे रसिक-प्रेक्षकांना दुधाची तहान ताकावर भागवणे शक्य होऊ लागले. या महोत्सवामुळे जरी पणजी, मडगावसारख्या शहरांत नवीन चित्रपटगृहे उभारण्यात आली तरीही त्यांत मराठी किंवा कोंकणी चित्रपटांना प्रदर्शित करण्याचे सौजन्य चित्रपटगृहांनी दाखवले नाही.
२००८ साली वास्कोतील तरुण उद्योजक आणि चित्रपटनिर्माता संजय शेट्ये यांनी आपल्या ‘विन्सन वर्ल्ड’ या संस्थेमार्फत पुढाकार घेऊन गोव्यात ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ सुरू केला. या महोत्सवाच्या आयोजनात दिग्दर्शक ज्ञानेश मोघे, नाट्यकर्मी परेश जोशी तसेच नामवंत अभिनेत्री आदिती देशपांडे व प्रतिभाशाली अभिनेता अमोल पालेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहाय्य केले.
‘विन्सन वर्ल्ड’ ही संस्था गेली पंचवीस वर्षे देशात तसेच विदेशात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नीटनेटके आयोजन करण्यात अग्रेसर आहे. आजवर त्यांनी कितीतरी मोठमोठ्या कंपन्या तसेच राज्य सरकारसाठी मोठमोठ्या कार्यक्रमांचे नियोजन आणि संयोजन यशस्वीरीत्या केले आहे.
‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करताना तारेवरची कसरत करावी लागते. सुरुवातीच्या काही वर्षांत जरी सरकारने थोडीफार मदत महोत्सवाला केली असली तरी आता या महोत्सवाचा भार प्रायोजकांच्या सहकार्याने स्वतः ‘विन्सन वर्ल्ड’ ही संस्था स्वतःच्या खांद्यावर पेलते. शासकीय मदतीविना सतत दहा वर्षे सलगपणे हा महोत्सव गोव्यात घडवून आणणारे संजय शेट्ये व त्यांचे बंधू श्रीपाद शेट्ये म्हणूनच अभिनंदनास पात्र ठरतात.
गोव्यातील मराठी तसेच कोंकणी चित्रपटरसिकांनीही या महोत्सवाला नेहमीच तुडुंब गर्दी करून प्रोत्साहन दिले आहे. रसिकप्रेक्षकांचा उत्साह आणि प्रतिसाद एवढा असतो की गोव्यातील काही लांबून येणारे प्रेक्षक दोन ते तीन दिवस अक्षरशः पणजीत मुक्काम ठोकून या महोत्सवाचा आस्वाद घेतात.
गेली दहा वर्षे हा महोत्सव गोव्यात पणजी शहरात कला अकादमी, आयनॉक्स व मॅकनिझ पॅलेसच्या दोन्ही चित्रपटगृहांत साजरा होतो. चारही चित्रपटगृहांची एकूण आसनव्यवस्था साधारण तेराशे आहे. तसेच उद्घाटनाचा दिवस सोडला तर इतर दिवशी दर चित्रपटगृहात दिवसाला चार या हिशेबाने साधारण बत्तीस खेळ दाखवले जातात. यात वेगवेगळ्या अठरा ते वीस नव्या-जुन्या चित्रपटांचा सहभाग असतो. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमा तर महोत्सवात आवर्जून दाखवले जातात. तसेच चित्रपट निवडताना कलात्मक तसेच नावीन्यपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटांचा सहभाग असेल याचीही काळजी घेतली जाते.
यंदाच्या चित्रपटांमध्ये ‘दशक्रिया’, ‘कासव’, ‘वेंटीलेटर’, ‘कंडिशन्स अप्लाय’, ‘डॉ. रखमाबाई’, ‘चि.सौ.कां.’, ‘नदी वाहते’, ‘भॉ’, ‘टेक केअर गूड नाईट’सारख्या उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तसेच तीन नव्याकोर्‍या चित्रपटांचा प्रिमियर शोदेखील या महोत्सवात होणार आहे.
गोवा मराठी चित्रपट महोत्सवात गोमंतकीय निर्माता तसेच कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात निर्माण झालेले मराठी सिनेमा तसेच कोंकणी सिनेमाही दाखवले जातात. तरुण गोमंतकीय दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य जांभळे यांनी निर्माण केलेला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुचित्रपट ‘अहो आबा, ऐकताय ना’ या सिनेमाचा खास शो ठेवण्यात आला आहे.
गोव्यातील उभरत्या निर्माता, कलाकार तसेच तंत्रज्ञांना वाव मिळावा, मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार तसेच निर्मात्यांकडे त्यांची गाठभेट घडवून आणावी यासाठीही या महोत्सवाचे आयोजक नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रत्येक महोत्सवामध्ये एखादा परिसंवाद, चर्चासत्र किंवा प्रदर्शन तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख घडवून आणणारी प्रात्यक्षिकेही या महोत्सवात सादर केली जातात.
या चित्रपट महोत्सवामध्ये आजवर नाना पाटेकर, अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. कलाकार तसेच दिग्दर्शकांकडे संवाद साधायला मिळणे ही तर या महोत्सवाची खासियत आहे. नामवंत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या मते तर बरेचसे कलाकार व दिग्दर्शक जे मुंबईत कामाच्या घाईगर्दीत एकमेकांना भेटू शकत नाहीत ते केवळ या महोत्सवामुळे एकत्र येतात. त्यांचे बरेचसे तारखांचे वगैरे प्रश्‍न इथेच सामोपचाराने सुटतात. तसेच कितीतरी नवीन चित्रपटांचे बीज याच महोत्सवामुळे रुजते.
महोत्सवाला आजवर नामवंत सिनेतारकांनी तर उपस्थिती लावली आहेच, त्याशिवाय मराठीतील नामवंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, उमेश कुलकर्णी, रवी जाधव, संजय जाधव, सचिन कुंडलकर, सुमित्रा भावे, सुनील सुखठणकर यांनीही हा महोत्सव नेहमी आपलाच मानून आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य केले आहे. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत चित्रपटनिर्माता संजय लिला भन्साळी तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, रमेश देव व सीमा देव, दिग्दर्शक सई परांजपे आदींनी याआधी महोत्सवाला हजर राहून या चित्रपटमहोत्सवाची शान वाढवली आहे.
मूळ गोमंतकीय असलेल्या आशालता वाबगावकर व वर्षा उसगावकर या दोन्ही कलाकारांना या महोत्सवात याआधी गौरवण्यात आले आहे.
२००८ साली जेव्हा पहिला महोत्सव आयोजित करण्यात आला तेव्हा हा महोत्सव केवळ मॅकनिझ पॅलेसमधील दोन चित्रपटगृहांत आयोजित करण्यात आला होता. परंतु प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे आता हा महोत्सव पणजीतच आयनॉक्स व कला अकादमीमध्येही आयोजित करण्यात येतो. यंदा तर दहावे वर्ष असल्याने महोत्सवातील एखादा सिनेमा माशेल, पेडणे व कुडचडे येथेही प्रदर्शित करण्याचा मानस आयोजकांनी बोलून दाखवला आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांनाही या महोत्सवाचा लाभ मिळावा हाच यामागचा उदात्त हेतू आहे.
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. नवीन प्रतिभावंत दिग्दर्शक नवनवे विषय मराठी सिनेमातून हाताळू लागले आहेत. दर्जेदार तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले मराठी सिनेमा निर्माण होत आहेत. मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्गही वाढत आहे. कान्स महोत्सवात मराठी सिनेमाचा झेंडा फडकू लागला आहे. महाराष्ट्रातही मराठी चित्रपट महोत्सव साजरे केले जातात. परंतु गोव्यातील मराठी चित्रपट महोत्सवासंबंधी मराठी कलाकार व निर्मात्यांना जास्त आपुलकी आहे. महाराष्ट्र हा मराठी प्रदेश असूनही महाराष्ट्रापेक्षा गोव्यातील हा महोत्सव त्यांना सरस वाटतो. कलाकारांची चोख व्यवस्था, उत्तम संयोजन आणि महोत्सवाचा भारदस्तपणा त्यांना भावतो. सहा महिने आधीच महाराष्ट्रातील निर्मात्यांकडून महोत्सव कधी आहे त्याची विचारणा व्हायला सुरुवात होते. महोत्सवाच्या तारखा पाहून शूटिंगच्या तारखा ऍडजस्ट केल्या जातात.
मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदा जागतिक पातळीवर साजरा करण्याचा मानही ‘विन्सन वर्ल्ड’ला जातो. यंदा एप्रिल महिन्यात संजय शेट्ये यांच्या या संस्थेने स्वीडन येथील स्टोकहोम येथे पाच दिवसांचा मराठी चित्रपट महोत्सव घडवून आणला. तिथे वेगवेगळ्या चार चित्रपटगृहांत वीस मराठी सिनेमांचे प्रदर्शन करण्यात आले. त्याला मराठी प्रेक्षकांबरोबरच स्वीडिश जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला. गोव्यातील एखाद्या संस्थेने परदेशात जाऊन मराठी चित्रपट महोत्सव घडवून आणणे ही मराठी चित्रपट जगतातील लोकांसाठी कौतुकाची बाब ठरली आहे व त्यांनी त्यासाठी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे खास आभार मानले आहेत.
यंदा हा महोत्सव १६, १७ व १८ जून रोजी पणजीत होत आहे. पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को आणि फोंड्यात तिकिटविक्री चालू आहे. एकूण अठरा सिनेमा प्रदर्शित होणार असून तीन चित्रपटांचा प्रिमियर शो होणार आहे. त्यात ‘दिशा’, ‘संचार’ आणि ‘देशपांडे चौकातला कुलकर्णी’ या चित्रपटांचा अंतर्भाव आहे. महोत्सवात चार लघुचित्रपटही दाखवण्यात येतील. तसेच दिग्दर्शक बिपिन खेडेकर यांच्या ‘आमिदाद’ या नवीन कोंकणी सिनेमाचा पोस्टर रिलीज होणार आहे.
दरवर्षी मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकाराला कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षी सचिन पिळगावकर यांना हा बहुमान देण्यात येईल. महोत्सव भर पावसाळ्यात होत असूनही दरवर्षी दर्दी रसिकांनी भरघोस पाठिंबा दिला आहे. यंदा या महोत्सवाचे दहावे वर्ष असल्याने महोत्सवाला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
खास आकर्षण
१० व्या गोवा मराठी चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे उद्घाटनाला ‘झी मराठी’वर गाजत असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा संपादित भाग सादर करणार आहेत भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुडके.