गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी पर्रीकरांचा वारसा पुढे नेण्याची भाषा बोलू नये : भाजप

>> समाधी स्थळाचे पावित्र्यभंग केल्याचा आरोप

गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याची भाषा करू नये, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. स्व. पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम भाजप करणार असल्याचे सांगून कलंकित नेत्यांनी पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याची भाषा करणे हे योग्य नसल्याचे नाईक म्हणाले.

मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेणारे गोवा फॉरवर्ड कोण, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी केला पर्रीकर हे ज्या पक्षाचे नेते होते तो भाजप पर्रीकर यांचा चारित्र्यसंपन्न वारसा पुढे नेणार असल्याचे नाईक यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
मनोहर पर्रीकर यांच्या समाधी स्थळावर जाऊन नको ती भाषा करणार्‍या गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी त्या समाधी स्थळाच्या पावित्र्याचा भंग केला असल्याचा आरोपही यावेळी नाईक यानी केला.

मनोहर पर्रीकर यांचे १० मार्च रोजी निधन झाले होते. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेतले तेव्हा त्यांचे परत एकदा निधन झाल्याची जी भाषा या नेत्यांनी केली ती घाणेरडी भाषा असल्याचे नाईक म्हणाले.
…दडपण आणून
उपमुख्यमंत्रीपद कसे घेतले?
विजय सरदेसाई याना जर पर्रीकर यानी वचन दिले होते तर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यानी प्रमोद सावंत यांच्यावर दडपण आणून उपमुख्यमंत्रीपद आपल्या गळ्यात कसे काय घालून घेतले. हट्ट धरून वन खात्याचे वजनदार मंत्रीपद कसे मिळवून घेतले, असा प्रश्‍नही नाईक यांनी विचारला.

समाधी स्थळावर खाल्ले
चिकन, मटण
गोवा फॉरवर्ड पक्षाची सरकारमधून हकालपट्टी करण्यात आल्याने संतप्त झालेल्या गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी पर्रीकर यांच्या समाधी स्थळावर सभा घेऊन सदर समाधीचे पावित्र्य तर भंग केलेच, शिवाय सभेनंतर सर्वांनी तेथे चिकन, मटण खाऊन समाधी स्थळावर घाणही केल्याचे नाईक म्हणाले.
गोवा फॉरवर्डच्या बॅनरवर पर्रीकर यांचे चित्र लावण्याचा अधिकार या पक्षाच्या नेत्यांना कुणी दिला, असा प्रश्‍नही नाईक यानी यावेळी उपस्थित केला.