गोवा डेअरीतील गैरव्यवहाराची निष्पक्षपणे चौकशी करणार

>> मुख्यमंत्री सावंत यांची विधानसभेत ग्वाही

गोवा डेअरीतील विविध गैरव्यवहार प्रकरणांची निःपक्षपाती चौकशी केली जाणार आहे. सुमुल डेअरीला दूध उत्पादक शेतकर्‍यांचा थकीत बोनस देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, सुमुल डेअरीला दुधाच्या तपासणीबाबतच्या प्रक्रियेबाबत दूध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची सूचना करण्याची आली आहे. दुधाच्या तपासणी प्रक्रियेसंबंधी निर्माण झालेले शेतकर्‍यांमधील गोंधळाचे वातावरण दूर करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
गोवा डेअरीतील गैरव्यवहार प्रकरणाची १० ऑगस्टपर्यत सर्व चौकशी पूर्ण केली जाणार आहे. या चौकशीमध्ये दोषी आढळून येणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांच्या जागी नवीन अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले. सुमुल सोसायटी म्हशीच्या दुधाला गोवा डेअरीपेक्षा २० रुपये जास्त दर देते. त्यामुळे सुमुल सोसायटीला अनेक शेतकरी म्हशीच्या दुधाची विक्री करतात. गोवा डेअरी म्हशीच्या दुधाला कमी दर का देते? याबाबत चौकशी केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना दुधापोटी दिल्या जाणारी आधारभूत किमतीचा लाभ राज्याबाहेर जाता कामा नये. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याची गरज आहे.
गोव्यातील दूध उत्पादकांच्या हितार्थ गोवा डेअरीच्या कारभारात सुसूत्रता आणण्ण्याची गरज आहे. गोवा डेअरीच्या कारभारात पूर्ण पारदर्शकता आणण्याची मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली.